आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपासवरील गांधेलीजवळ दुर्घटना:​​​​​​​कारच्या धडकेत आई व मुलाचा जागीच मृत्यू; लग्न लावून गावाकडे येत होते परत; कारचालकही जखमी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड बायपासवरील गांधेली गावाजवळील अपघातात कार व दुचाकीचे माेठे नुकसान झाले.

भावाच्या मुलाचे लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या महिलेचा व तिच्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने समाेरून जाेराची धडक दिल्यामुळे डाेक्याला जबर मार लागून दाेघांनी जागीच प्राण साेडला. रविवारी सायंकाळी ५ वाजता गांधेली शिवाराजवळ हा अपघात झाला. कौशल्याबाई किशन धोत्रे (४८) आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर धोत्रे (२५, दोघेही रा. राजपिंप्री) अशी मृतांची नावे आहेत. कौशल्या व ज्ञानेश्वर मुळे हे गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथील रहिवासी होते. कौशल्या यांचा भाऊ वाळूज परिसरात राहताे. त्यांच्या मुलाचे रविवारी लग्न होते. या लग्नासाठी काैशल्याबाई व ज्ञानेश्वर हे दुचाकीवर आले हाेते.

रविवारी दुपारी चार वाजता ज्ञानेश्वर व आई कौशल्या दुचाकीने (एमएच २३ व्ही १८६२) पुन्हा आपल्या गावी राजपिंप्रीकडे जाण्यास निघाले. शहरालगतच्या नवीन बायपासवरून जात असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गांधेली शिवाराजवळ समोरून सुसाट वेगात आलेल्या कारचालकाने (एमएच २० ईई ७४५५) ज्ञानेश्वरच्या दुचाकीला जोरात धडक दिली. कारचा वेग खूप असल्याने दुचाकीवरील आई व मुलगा दूरवर फेकले गेले. त्यामुळे दोघांच्या डोक्याला जबर मार लागला होता.

घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार काशीनाथ लुटे, संतप राठोड, सोपान डकले, संतोष टिमकीकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. या अपघाताची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातात कारचालक रावसाहेब बाबूराव मदगे (रा. एकोड पाचोड) हे देखील जखमी झाले. त्यांना देखील रुग्णालयात दाखल केल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...