आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा वकिल संघाच्या वतीने जवळपास 15 वर्षानंतर अॅव्होकेट राज्यस्तरीय टी-20 क्रिकेट स्पर्धेचे 23 ते 30 डिसेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्याला तिसऱ्यांदा या स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे. स्पर्धेत 94 संघ सहभागी होत असल्याची माहिती जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. कैलास बगनावत व सचिव अॅड. योगेश फाटके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बगनावत म्हणाले की, औरंगाबाद तिसऱ्यांदा या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत आहे. यापूर्वी 1998 व 2007 मध्ये आम्ही स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. स्पर्धेत औरंगाबादचे 4 संघ खेळणार आहेत. तसेच खेळाडूंमध्ये वकिलांसोबत काही न्यायाधीश देखील मैदानात खेळताना दिसतील. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 94 संघांची 32 गटात विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवली जाईल. प्रत्येक दिवशी एका मैदानवर 2 सामने होतील. सर्व संघ कलर ड्रेसवर असतील. खेळाडूंच्या निवास, प्रवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विजेत्या संघांना रोख व चषक देण्यात येणार आहे. उपांत्य व अंतिम सामना गरवारे क्रीडा संकुलावर खेळवला जाईल. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मैदानावर एमजीएम वैद्यकिय महाविद्यालयातर्फे रुग्णवाहिका आणि प्रत्येकी 2 वैद्यकिय कर्मचारी उपस्थित राहतील.
शुक्रवारी स्पर्धेचे उद्घाटन
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर 23 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त निखील गुप्ता व मुख्य जिल्हा सरकारी वकिल अविनाश देशपांडे यांची उपस्थिती राहिली. स्पर्धेचा समारोप गरवारे स्टेडियमवर पार पडेल.
16 मैदानावर होणार सामने
अॅड. संजय डोंगरे यांनी म्हटले की, या स्पर्धेतील सामने एकूण 16 मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत. शहरात प्रथमच एकाच स्पर्धेसाठी जवळपास सर्व मैदानांवर सामने होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. यात गरवारे क्रिकेट स्टेडियम, एमआयटी स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल, बजाज मैदान (वाळूज), बिडकीन क्रिकेट मैदान, एचएसजे क्रिकेट स्टेडियम, पाल (फुलंब्री), देवगिरी महाविद्यालय, पीईएस महाविद्यालय, एमएसएम मैदान, साई मैदान, विद्यापीठ मैदान, नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा संकुल (कांचनवाडी), मौलाना आझाद महाविद्यालय, एमजीएम स्टेडियम, झालानी मैदान, ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या देवगिरी मैदानावर एकूण 8 टर्फ व 8 मॅटच्या खेळपट्टीवर सामने पार पडतील.
स्पर्धा नियोजन समिती :
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा कमिनशन अॅड. संजय डोंगरे, सुरेश काळे, ज्योती पत्की, भगवान दळवी, नितिन ताठे, बाळासाहेब वाघमारे, सचिन सुदामे, संदीप देगावकर, रवींद्र जाधव, श्रीनिवास तलवार, आशितोष मिश्रा यांची नियोजन समिती तयार करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.