आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसार भारतीच्या 'एक राज्य, एक आकाशवाणी केंद्र’ या नवीन धोरणाचे परिणाम औरंगाबाद केंद्रावर जाणवू लागले आहेत. जनरल शिफ्ट बंद केल्यामुळे २५ नैमित्तिक उद्घोषकांचे मानधन अर्ध्यावर आले आहे. यामुळे आकाशवाणीच्या भरवशावर वाहन, गृह आणि अन्य लहानसहान कर्ज घेतलेल्या उद्घोषकांना हप्ते खोळंबण्याच्या भीतीने ग्रासले आहे. या निर्णयामुळे ‘आत्मनिर्भर भारत’च्या स्वप्नांनाच खीळ बसल्याची त्यांची भावना आहे. विशेष म्हणजे यात महिलांची संख्या लक्षणीय आहे.
आकाशवाणी केंद्राचे कामकाज पहाटे ५ ते दुपारी १२:३०, सकाळी १० ते सायंकाळी ५:२० आणि दुपारी ४ ते रात्री ११:३० अशा तीन शिफ्टमध्ये चालते. सर्व प्रायमरी रेडिओ स्टेशन्सनी १ फेब्रुवारीपासून सकाळी ११ ते दुपारी ३:२० पर्यंत केवळ मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करावेत, असा आदेश प्रसार भारतीच्या अपर महानिदेशकांनी शुक्रवार, २८ जानेवारी रोजी काढला. राज्यातील औरंगाबादसह ७ प्रायमरी केंद्रांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. ३१ रोजी नवीन महिन्याचा ड्यूटी चार्ट लागल्यावर उद्घोषकांना नेहमीपेक्षा अर्ध्याच ड्यूट्या लागल्याचे पाहून धक्का बसला.
स्थानिक कार्यक्रम बंद
नवीन नियमामुळे सकाळी ११ ते ३:२० वाजेदरम्यान प्रसारित होणारे स्थानिक कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत. यामध्ये महिलांविषयक कार्यक्रम जसे वनिता मंडळ, बालसभा, लोकजागर, युवावाणी, आरोग्यधन, पर्यावरण आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याऐवजी आता सकाळी ११ ते २:३० वाजेदरम्यान मुंबईचे सहक्षेपण होईल, तर दुपारी २:३० ते ५:५५ वाजेदरम्यान विविध भारतीचे कार्यक्रम सादर करण्यात येतील.
नवोदित कलाकार अडचणीत
आकाशवाणीच्या जनरल शिफ्टमध्ये नवोदित कलाकारांचे सादरीकरण असते. आकाशवाणीच्या व्यासपीठावरून अनेक दिग्गज कलावंत घडले आहेत. आता ही शिफ्टच बंद झाल्याने हे कलाकारही अडचणीत आले आहेत.
महिलांचे मोठे नुकसान
सर्वच आकाशवाणी केंद्रांवर बहुतांश नैमित्तिक उद्घाेषक महिला आहेत. घर सांंभाळून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी कौशल्याच्या जोरावर त्या आकाशवाणीत सेवा बजावतात. आमची निवड ही कडक चाचण्यातून झाली आहे. महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या सरकारने शिफ्ट बंद करण्याचा निर्णय मागे घेऊन महिलांना आधार द्यावा. नैमित्तिक उद्घोषक, आकाशवाणी औरंगाबाद, केंद्र
तीन वर्षांत दुसरा धक्का
तीन वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या लोकल रेडिओ स्टेशन्सवरील जनरल शिफ्ट बंद करण्यात आली होती. त्याऐवजी दुपारी १२ ते ५ वाजेदरम्यान विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित होत होते. त्यापाठोपाठ आणि प्रायमरी केंद्रावरही आता जनरल शिफ्ट बंद करण्याचा निर्णय झाला. हळूहळू सर्वच शिफ्ट बंद करून राज्यासाठी केवळ एकच केंद्र राहील, अशी भीती उद्घोषकांना वाटतेय.
२५ उद्घोषकांचा प्रश्न
आकाशवाणीतील एका उद्घोषकाला महिन्याकाठी सात तास २० मिनिटांच्या सहा ड्यूट्या मिळतात. एका ड्यूटीसाठी त्यांना १६०० रुपये मानधन मिळते. एक शिफ्ट बंद झाल्यामुळे आत २५ उद्घोषकांच्या ड्यूट्या अर्ध्यावर आल्या आहेत. त्यांना ६ ऐवजी आता ३ ड्यूट्या मिळतील. औरंगाबादसह पुणे, परभणी, जळगाव, रत्नागिरी, सांगली आणि नागपूर केंद्रात अशीच स्थिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.