आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:औरंगाबाद अन् दख्खनी भाषेमुळेच उर्दू शायरीला चार चाँद ;शायरा लता हया यांचे प्रतिपादन

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद अन् दख्खनी भाषेमुळे उर्दू शायरीला चार चाँद लागले आहेत. उर्दू ही मूळ भारताची भाषा आहे. तिला केवळ मुस्लिमांची भाषा मानून दुय्यम दर्जा न देता ती जगवणे व वाढवण्याची खरी गरज आहे. ही जबाबदारी शायर, लेखक, चित्रपट अभिनेते, गीतकार यांची आहे. त्यांना उर्दूमुळेच सर्वकाही मिळाले आहे. त्यांनी उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी पुढे यावे, असे मत उर्दू शायरा लता हया यांनी व्यक्त केले. लता आणि सुनीलकुमार डंक आयजे फेस्टअंतर्गत आयोजित मुशायऱ्यासाठी शनिवारी शहरात आले होते. त्यानिमित्त औरंगाबादचे प्रसिद्ध शायर खान शमीम खान यांनी खास “दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी या दाेघांशी संवाद साधला.

मूळ उर्दू शायरीमध्ये काळानुरूप काही बदल होत आहे का? सुनीलकुमार डंक : उर्दू शायरी काळानुरूप बदलत आहे. शायरीतील अरबी, फारसी शब्द कमी होत आहेत. त्यात इंग्रजी व इतर भाषांचे शब्द जोडले जात आहेत. त्यात काही गैर नाही. परंतु शायरी करताना शायरीचा स्तर अबाधित राहिला पाहिजे. अनेक ठिकाणी शायरीच्या नावाखाली केवळ विनोद सांगण्याचे प्रकार वाढले आहेत.

शायरीद्वारे सत्तेच्या विरोधात बोलण्याची ताकद राहिली नाही का? नाही, असे नाही. परंतु सामाजिक, राजकीय किंवा प्रशासकीय स्तरावर एखाद्या गोष्टीवर टीका करायची असेल तर त्यातही तारतम्य बाळगण्याची गरज आहे. उर्दू भाषेला अदब असे संबोधले जाते. हेच उर्दू शायरीच बलस्थान आहे.

दख्खनी शायरीबद्दल काय वाटते? शायरीचा इतिहास लिहिताना औरंगाबादला विसरता येणार नाही. मी अनेक वर्षांपासून हैदराबाद, औरंगाबादला मुशायऱ्यात येतो. औरंगाबाद व दख्खनी शायरीचे महत्त्व माेठे आहे.

कोणते बदल चिंतेचे वाटतात? लोकांच्या भावनांशी खेळणे म्हणजे शायरी नव्हे. काही कवी वीररच्या नावाखाली वाटेल ते बोलतात. शायरीच्या प्रत्येक शब्दातून एक संदेश दिला जाताे. त्यामुळे समाज, व्यवस्थेवर बोलायचे असेल तर काही गाेष्टींचे भान ठेवावे.

उर्दू भाषेला पुन्हा गतवैभव मिळून देण्यासाठी नेमके काय करावे लागेलॽ लता हया : मुस्लिमांची मुलंच उर्दूपासून दूर जात असल्याचे दिसून येत आहे. मुस्लिम मुले आता इंग्रजी व इतर भाषेत शिक्षण घेत आहेत. ते घरात किंवा इतर ठिकाणी बोलताना त्यांच्या भाषेत तलफ्फुज (शब्दोच्चार) चांगल करत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात उर्दू बाेललीच पाहिजे.

उर्दू कोणाची भाषा आहे? शायर, चित्रपट अभिनेते, लेखक, गीतकार, राजकीय नेत्यांनी शायरी, गीत-संगीताच्या माध्यमातून नाव आणि पैसा कमावला. परंतु उर्दू भाषा जगवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. काहींना उर्दू मुस्लिमांची भाषा वाटते. ती हिंदुस्तानची भाषा आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आज उर्दू भाषा मागे पडत असली तरीही ती संपणारी नाही, असा मला विश्वास वाटतो.

बातम्या आणखी आहेत...