आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:जि.प.च्या नवीन इमारत बांधकामासाठी विशेष सर्वसाधारण सभेत मान्यता, दीड ते दोन वर्षात संपूर्ण इमारत उभी राहणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो रवि खंडाळकर यांनी काढला आहे. - Divya Marathi
फोटो रवि खंडाळकर यांनी काढला आहे.
  • कार्यारंभाचे आदेश, उद्यापासून पाडापाडी सुरु होणार तर तर जुन्या इमारतीत हेरिटेज

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीची निविदेच्या दरसुचीला सोमवारी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी मान्यतेचा ठराव मंजूर केला. या ठरावाला मान्यता मिळाल्याने तत्काळ कार्यारंभ करण्याचे आदेश बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी दिले असून, मंगळवार पासून नियोजित जागेवरील जुन्या इमारतींची पाडापाडी सुरु होणार आहे. तसेच इमारत भूमिपुजनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजिक बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असून, १७ सप्टेंबर अथवा त्यापूर्वीच भूमीपूजन केले जाईल असेही ते म्हणाले.

शहरातीली औरंगपुरा परिसरात असलेली जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत जीर्ण आणि धोकादायक झाल्याने नव्याने इमारत बांधकामाला मान्यता देण्यात आली आहे. तर नवीन इमारतीच्या कार्यारंभासाठी सोमवारी जि.प. अध्यक्ष मीना शेळके यांच्या अध्यक्षेतेखाली विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, बांधकाम सभापती किशोर बलांडे, आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे, मुख्यकार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष कवडे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, महिला व बालविकास सभापती अनुराधा चव्हाण, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समान्य प्रशासन शिरीष बनसोडे यांची उपस्थिती होती.

बलांडे म्हणाले, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्ता यांच्या पाठपुराव्यामुळे उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली. तसेच महिनाभरात दुकान गाळे आणि शॉपिंग सेंटरसाठी निविदा मागविण्यात येतील. अजिंठा वेरुळच्या धरतीवर इमारतीचे स्ट्रक्चर असल्याचेही ते म्हणाले. जि.प. सदस्य मधुकर वालतुरे यांनी किती निविदा आल्या किती मंजुर याची माहिती सदस्यांना स्पष्ट करावी तसेच महिलांसाठी स्वतंत्र कक्ष नव्या इमारतीत असा अशी मागणी केली. तसेच जेव्हढे सदस्य आहेत. त्यांची नावे कोनशिलेवर असावी अशीही मागणी केली. तर किशाेर पवार यांनी जुन्या इमारतीचे हेरिटेज करुन यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ग्रंथालय अथवा आर्ट दालन सुरु करण्यात यावे अशी मागणी केली. तर मुख्यकार्यकारी अधिकारी गटणे म्हणाले की, नवीन इमारतीसाठी कोणताही विलंब प्रशासकीय पातळीवर होणार नाही. याची काळजी घेण्यात येईल. तसेच सध्या सर्व विभाग वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले आहेत. त्यांना पुन्हा एकत्र करण्यासाठी जुन्या इमातरीच्या दुरुस्तीलाही सुरुवात करण्यात येईल.

महिलांसाठी स्वतंत्र कक्ष -
यावेळी महिला व बालविकास सभापती अनुराधा चव्हाण यांनी सांगितले की, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जि.प.च्या दुर्लक्षित जागा आहेत त्यांचा विकास करण्यात यावा असेही त्या म्हणाल्या.

अशी असेल नवीन इमारत -
१४ जानेवारीला ४७ कोटी ३३ लाख रुपयांच्या बांधकाम, विद्युतीकरण व इमारतीची जागा मोकळी करण्याच्या कामाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. ३४ कोटी ८३ लाखांची तांत्रिक मान्यता २६ मार्चला मिळाली. नव्या इमारतीसाठी १० हजार ८३८ चाैरस मिटरच्या क्षेत्रफळात तळमजल्यासह चार मजली इमातीच्या बांधकामाचे नियोजन केले आहे. सध्या पाच कोटी रुपये मिळालेले असून ग्रीन इमारतीची संकल्पना असून जिल्ह्यातील एेतिहासिक वारश्याचे प्रतिबिंब या इमारतीवरुन उमटवण्याचा प्रयत्न आहे. निविदेत बांधकामाची मुदत अधीक असली तरी पुढील दीड ते दोन वर्षात बांधकाम पुर्ण करण्याचा मानस आहे. तळमजल्यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, आरोग्य सभापती, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, स्थायी समिती हाॅल, गोडाऊन महिला, पुरुष, अपंगासाठी स्वच्छतागृह, पहिल्या मजल्यावर आरोग्य, वित्त, महिला व बालकल्याण, पाणी पुरवठा, बांधकाम, सर्व शिक्षा अभियान, निरंतर शिक्षण विभागाची कार्यालये, दुसर्या मजल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, बैठक हाॅल, वित्त विभाग पेन्शन, कृषी, पंचायत, यांत्रिकी विभागांचे कार्यालये, व्हिडीओ काॅन्फरन्स हाॅल, तिसर्या मजल्यावर स्वच्छ भारत मिशन, मग्रारोहयो, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, मोठे सभागृह, व्हिआयपी रुम अशी व्यवस्था असणार आहे. मंजूर रक्कमेशिवाय संरक्षण भिंतीसाठी ८० लाख, पार्किंगसाठी ५० लाख, अंतर्गत ड्रेनेजलाईनसाठी ५० लाख, सोलर पॅनल १ कोटी अशी ५ कोटी १५ लाखाची अतिरिक्त निधी लागणार असल्याचे बलांडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...