आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद चषक टी-20 स्पर्धेत शाॅर्ट सिरेचा दणदणीत विजय:कय्युमने झळकवले स्पर्धेतील पहिले शतक, सणसणीत चौकार षटकारांची खेळी

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नवल टाटा क्रीडासंकुलावर आयोजित आझाद चषक टी-20स्पर्धेत शॉर्ट सिरे संघाचा दणदणीत विजय झाला आहे. एमआर इलेव्हन संघावर विजयी संघाने 81 धावांनी मात करत सामना जिंकला. या सामन्यात अब्दुल कय्युम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. लकी क्रिकेट क्लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन झाले हाेते.

शॉर्ट सिरे संघाने नाणेफेक जिंकत 20 षटकांत 1 बाद 204 धावा उभारल्या. यात सलामीवीर मो. उमर अब्बासने 31 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचत 39 धावा काढल्या. त्याला कर्णधार शाहबाज खानने शेख सोहिलच्या हाती झेल बाद केले.

पहिले शतक झळकवले

कय्युमने स्पर्धेतील पहिले शतक झळकावले. मो. उमर अब्बास व अब्दुल कय्युम जोडीने 79 धावांची सलामी दिली. त्याने 63 चेंडूंचा सामना करताना 13 सणसणीत चौकार व 4 उत्तुंग षटकार खेचत नाबाद 106 धावांची खेळी केली.

अतिक नाईकवाडेने फटकेबाजी करत 29 चेंडूंत 4 चौकार लगावत नाबाद 38 धावांचे योगदान दिले. संघाला 21 धावा अतिरिक्त मिळाल्या. अतिक व कय्युम जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 124 धावांची अभेद्य शतकी भागीदारी रचली. इलेव्हनच्या गोलंदाजांना त्यांच्या फलंदाजांना रोखण्यात यश आले नाही. त्यांनी आठ गोलंदाज वापरले. सिद्दिकी तबरेज 43 धावा देत सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

अर्धशतकी खेळी व्यर्थ

प्रत्युत्तरात यंग एमआर इलेव्हन संघाचा डाव 19.5 षटकांत 123 धावांवर संपुष्टात आला. यात सलामीवीर तथा कर्णधार शाहबाज खान अवघ्या 4 धावांवर बाद झाला. शेहनाज खानने 14 धावा केल्या. तसिन अहमेदने 41 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचत 50 धावांची खेळी केली. मात्र संघ पराभूत झाल्याने त्याची ही अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. यष्टिरक्षक सिद्दिकी तबरेजने 14 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 22 धावा जोडल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. शॉर्टकडून शेख अल्ताफने 17 धावांत 3 बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...