आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद शहर गेल्या काही वर्षांत मेडिकल हब (वैद्यकीय सेवेचे मोठे केंद्र) होत आहे. येथे मराठवाड्यातील आठ तसेच विदर्भातील बुलडाणा, वाशिम, अकोला तसेच अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या १४ जिल्ह्यांचे रुग्ण येत आहेत. विविध पॅथींचे ३ हजार ५५० हॉस्पिटल रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. हृदय प्रत्यारोपणापासून अनेक सुविधा आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठ असलेल्या नाशिकमध्ये आठ तर औरंगाबादमध्ये १४ मल्टिस्पेशालिटी रुग्णालये असून प्रत्येकात शंभरपेक्षा अधिक खाटा आहेत.
मराठवाड्याच्या राजधानीचे शहर मानल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये घाटी आणि एमजीएम ही वैद्यकीय महाविद्यालये आहेत. घाटीमुळे मराठवाड्यातील गोरगरीब रुग्ण मोठ्या संख्येने औरंगाबादला येतात. शिवाय काही खासगी हॉस्पिटलमध्ये उच्च दर्जाच्या उपचार सुविधा असल्याचाही परिणाम होत आहे. आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर म्हणाले की, मुंबई - पुण्याच्या तुलनेत उपचाराचा खर्च कमी असल्यानेही रुग्ण वाढत आहेत. गुडघ्यावरील शस्त्रक्रिया हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. सुमारे एक हजार रुग्णांमागे एक डॉक्टर असा निकष आहे. औरंगाबादमध्ये १७ लाख लोकसंख्येमागे १७०० डॉक्टरांची गरज आहे. त्यापेक्षा दुपटीने डॉक्टर आहेत.
नाशिकमध्ये ८, औरंगाबादला १४ मल्टिस्पेशालिटी रुग्णालये
रोबोटिक सर्जरीही शक्य
२०१० पर्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी मराठवाड्यातील रुग्णांसाठी मुंबईचाच पर्याय होता. सिग्माचे सीईओ डॉ. अजय रोटे म्हणाले की, जागतिक पातळीवर सर्वात अवघड मानली जाणारी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया औरंगाबादेत होते. रोबोटिक सर्जरी, यकृत प्रत्यारोपण केली जाते. सिग्मात ८ देशांतील रुग्ण येतात.
अशी आहे शहराची स्थिती
बॉम्बे नर्सिंग अॅक्टअंतर्गत ५३३ रुग्णालयांची नोंद असून त्यातील ५५ बाल तर २१७ प्रसूती रुग्णालये आहेत, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा म्हणाले.
सरकारी, खासगींची संख्या वाढतेय
मराठवाड्यात सर्वाधिक रुग्णालये औरंगाबादेत आहेत. आसपासच्या जिल्ह्यांतील, प्रांतांतील रुग्ण मोठ्या संख्येने येतात. शहरात सुमारे ५५० तर तालुकास्तरावर २४६ खासगी रुग्णालये नोंदवली गेली आहेत.- डॉ. सुनीता गोलाईत, आरोग्य उपसंचालक
मल्टिस्पेशालिटीची संख्या सर्वाधिक
शहरात या हॉस्पिटलची संख्या १४ असून ही हॉस्पिटल शंभर बेडपेक्षा अधिक आहेत. औरंगाबादमध्ये सरकारीसह सर्वच रुग्णालयात चांगले उपचार मिळत असल्यामुळे औरंगाबादसह इतर जिल्ह्यांतले रुग्ण शहरात मोठ्या संख्येने येत आहेत.
- डॉ. पारस मंडलेचा, मनपा आरोग्य अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.