आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजनांची गरज:तेरा किलोमीटरच्या बीड बायपासवर तीनच ठिकाणी रस्ता ओलांडण्याची असेल साेय

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: नामदेव खेडकर
 • कॉपी लिंक
 • मनपाने सर्व्हिस रोडची कामे केली नाहीत तर ‘मृत्यूचा महामार्ग’ हा ठपका कायम

पैठण रोडवरील महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा या बीड बायपास राेडचे सहा पदरीकरण सुरू झाले आहे. हा रस्ता पूर्ण सिमेंट काँक्रीटचा असेल. मात्र १३ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यात अवघ्या तीनच ठिकाणी रस्ता ओलांडण्याची सोय असेल. त्यामुळे जिथे अर्धा किलोमीटर अंतर जायचे, तिथे तब्बल पाच किलोमीटरचा ‘यूटर्न’ घेऊन जावे लागण्याची शक्यता आहे. असे झाले तर अधिकाधिक वाहनधारक पुन्हा ‘राँगसाइड’चा मार्ग पत्करतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल. ज्या उद्देशाने ३७९ कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे काम सुरू झाले आहे, तो उद्देशही सफल होणार नाही. यावर उपाय म्हणजे महापालिकेने आतापासूनच रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोडचे काम हाती घायला हवे.

मागील दहा वर्षांत बीड बायपासवर हजारावर नागरिकांचे अपघातात बळी गेले. अरुंद रस्ता, रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेल्या निवासी वसाहती आणि रस्त्यावरील अवजड वाहतूक, राँग साइडचा प्रवास यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले. या अपघातांना आळा घालण्यासाठी सर्व्हिस रोडची गरज होती. मात्र, महापालिकेने भूसंपादन केलेच नाही. त्यामुळे आता बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाने या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.

या सहा पदरीकरणामुळे फायदा निश्चित होईल. मात्र, हा रस्ता ओलांडण्यासाठी केवळ तीनच ठिकाणी जागा असणार आहे. नवीन बीड बायपासचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. जुलैअखेर अवजड वाहतूक नवीन बायपासवरून जाईल. परिणामी सध्याच्या बायपासवरील वाहतूक कमी होईल. मात्र, वाहतूक कमी झाली तरी रस्ता ओलांडण्यासाठी दाेन ते पाच किलोमीटर अंतराचा यूटर्न घेण्याचा मनस्ताप बायपासवासीयांना कायम सतावेल.

एकही सिग्नल नसेल, पैठण राेड ते झाल्टा फाटा विनाअडथळा प्रवास

 • एमआयटी चौक, संग्रामनगर आणि देवळाई चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल असतील. उड्डाणपुलांखाली गार्डनिंग आणि सुशोभीकरण असेल. पुलावरील पाण्याचे फेरभरण होईल.
 • सर्व पथदिवे सोलारपासून तयार झालेल्या विजेवर चालतील.
 • रस्त्याच्या दुतर्फा १.२ मीटर रुंदीची बांधीव, बंदिस्त गटरलाइन, यावरच फुटपाथ असेल.
 • या रस्त्यावर एकही सिग्नल नसेल. शिवाय चार प्रमुख लेनला एकही अडथळा नसेल. म्हणजे पैठण रोडवरून निघालेले वाहन झाल्टा फाट्यापर्यंत विनाअडथळा पोहोचेल.
 • एकूण ६ पदरी १३ किमी सिमेंट काँक्रिटीकरण, तीन उड्डाणपूल बांधणीचे कंत्राट २९२.६ कोटी रुपयांना ‘जीएआय इन्फ्रा’ला देण्यात आले.
 • उड्डाणपुलांशेजारी स्लिप रोडसाठी भूसंपादन, मोठ्या नाल्यांवरील पुलांसाठी भूसंपादन, सध्या रस्त्याच्या हद्दीत असलेले विद्युत खांब आणि जलवाहिन्या हटवणे (युटिलिटी शिफ्टिंग) या कामांसाठी ६० कोटी खर्च केले जाणार आहेत.

यूटर्नसाठी लांबलचक प्रदक्षिणा
कमलनयन बजाज हॉस्पिटलपासून ४०० मीटर अंतरावर एमआयटी चौक आहे. एखाद्या व्यक्तीला बजाज हॉस्पिटलपासून एमआयटीला जायचे असेल तर त्याला थेट पैठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चाैकात जाऊन यूटर्न घ्यावा लागेल. अशीच परिस्थिती पटेल लॉन्स, रेणुका माता कमान, अयप्पा मंदिर कमान, छत्रपतीनगर कमान, सूर्या लॉन्स, नाईकनगर भागात राहणाऱ्यांची होईल. एवढे लांबलचक यूटर्न घेऊन जर जावे लागणार असतील तर त्यापेक्षा बहुतांश लोक जीव धोक्यात घालून राँग साइड जाण्याला प्राधान्य देतील. परिणामी पुन्हा अपघातांचा धोका कायम राहील.

सर्व्हिस रोड गरजेचाच
बीड बायपासचे काम पूर्ण झाल्यानंतर तो दिसायला शहरातील सर्वात सुंदर रस्ता ठरणार आहे. मात्र, रस्ता ओलांडण्याची सोय नसल्याने तो प्रचंड गैरसोयीचा देखील ठरेल. त्यामुळे महापालिकेने आतापासूनच जर विकास आराखड्याप्रमाणे सर्व्हिस रोडची तयारी सुरू केली तरच हा रस्ता बीड बायपास भागातील रहिवाशांसाठी सोयीस्कर ठरेल.

या तीन ठिकाणी उड्डाणपूल, तिथेच रस्ता ओलांडण्याची असेल साेय

 • एमआयटी चौक
 • देवळाई चौक
 • संग्रामनगर चौक
बातम्या आणखी आहेत...