आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:जमीन तुकडे नोंदणी रोखणारे राज्य शासनाचे परिपत्रक कोर्टाकडून रद्द, छोट्या प्लॉटधारकांना फायदा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध असल्याने खरेदीखत नोंदण्यापूर्वी मंजूर केलेला पोट विभाग किंवा रेखांकन खरेदी दस्तांसोबत जोडलेला नसल्यास नोंदणीसाठी स्वीकारण्यात येऊ नये, असे आदेश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी १२ जुलै २०२१ रोजी परिपत्रकाद्वारे काढले होते. हे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. डी. धानुका, एस. जी. मेहरे यांनी ५ मे रोजी रद्द केल्याने छाेटे प्लाॅटधारक आणि प्लॉटिंग व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्लॉटिंग व्यावसायिक गोविंद रामलिंग सोलापुरे, प्रकाश गडगूळ व कृष्णा पवार (रा. करोडी, औरंगाबाद) यांनी अॅड. रामेश्वर तोतला यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकार, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक, सह जिल्हा निबंधक, औरंगाबाद यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, त्यांनी विकलेल्या प्लॉट, रोहाऊसेस इत्यादीबाबत खरेदीखत नोंदणीसाठी ते औरंगाबादेतील पाच दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते. शासनाची स्टॅम्प ड्यूटी भरूनही दुय्यम निबंधकांनी खरेदीखत न नोंदवता परत दिले. महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ व १२ जुलै २०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र आणल्याशिवाय खरेदीखत नोंदवण्यात येणार नाही, असे या निबंधकांनी सांगितले होते.

खरेदीखत नोंदणीस नकार दिल्याने आव्हान
खरेदीखत नोंदवण्यास नकार दिल्याने सोलापुरेंसह तिघांनी रिट याचिकेद्वारे १२ जुलै २०२१ चे परिपत्रक व नियम ४४ (१) (आय), महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ ला आव्हान दिले. परिपत्रक तसेच नियम ४४ (१) (आय) नोंदणी कायद्याविरुद्ध असल्याने रद्द करावे, अशी विनंती केली. प्रतिवादी महाराष्ट्र शासन व नोंदणी महानिरीक्षक व इतरांतर्फे लेखी म्हणणे सादर झाले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर खंडपीठाने निकाल दिला. प्रतिवादींची कृती नोंदणी कायद्यातील कलम ३४ व ३५ च्या विरुद्ध आहे. त्यामुळे १२ जुलै २०२१चे परिपत्रक व नियम ४४ (१) (आय) रद्द ठरवले. नोंदणी अधिकाऱ्यांनी नोंदणीसाठी आलेले दस्त नाकारू नये, असा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रामेश्वर तोतला यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. राहुल तोतला, अॅड. रिया जरीवाला, अॅड. स्वप्निल लोहिया, अॅड. रजत मालू, अॅड. गणेश यादव व अॅड. अंजली धूत यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...