आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील भाजप, राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत:मातोश्रीवर पक्षप्रवेश, उद्धव ठाकरे म्हणाले - गद्दारांना येत्या निवडणुकीत घरी बसवणार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेला शिंदे गटाने मोठा धक्का दिल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या औरंगाबादेत शिवसेनेत मेगा भरती सुरू झाली आहे. यात भाजपसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले आहे.

उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन

औरंगाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री येथे शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परिवारात स्वागत केले.

यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख डॉ विनोद घोसाळकर उपस्थित होते.

कोण कोण गेले ठाकरे गटात?

प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अ‌ॅड. प्रतापराव पाटील निंबाळकर, (तालुका अध्यक्ष पंचायत समिती), प्रतापराव पाटील धोर्डे, सभापती, (कृ. उ. बा. स.) यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पैठणमध्ये भाजपला खिंडार

  • भाजपचे पैठणचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ. पांडुरंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज भाजपला धक्का देत शिवबंधन हाती घेतले.
  • गंगापूर तालुक्यातील माजी सरपंच प्रदीप निरफळ यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

हजारो कार्यकर्त्यांचा होणार जाहीर प्रवेश

या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत हजारो कार्यकर्त्यांचा औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. आज शिवबंधन हाती घेतलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व गद्दारांना येत्या निवडणुकीत घरी बसवणार असल्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

बातम्या आणखी आहेत...