आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत दुसऱ्यांदा दंड:माजी सैनिकाची पोलिसांना मारहाण, दोघांच्या बोटांना चावा; बाबा चौकातील घटनेनंतर वेदांतनगर पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाबा पेट्राेल पंप चाैकात उड्डाणपुलाजवळ पाेलिसांशी हुज्जत घालताना माजी सैनिक भगवान सानप.
  • दुसऱ्या छायाचित्रात सानप याने जाेरात चावा घेतल्यामुळे एका पाेलिसाच्या बाेटाला जखम झाली.

लाॅकडाऊनमध्ये नाकेबंदीदरम्यान पाेलिसांनी अडवून दंड ठाेठावल्याचा राग आल्याने एका माजी सैनिकाने वाहतूक पोलिसांना हेल्मेटने मारहाण केली. तसेच एक फाैजदार व हवालदाराच्या बोटाला कडकडून चावा घेतला. छावणीचे पाेलिस उपनिरीक्षक संजय बनसोड व हवालदार दिलीप माळे यांच्या बोटाला खोलवर जखम हाेऊन टाके पडले. सात ते आठ पोलिसांना माजी सैनिक आवरला जात नव्हता. अखेर वेदांतनगर पोलिसांनी त्यास अटक केली. भगवान कृष्णाजी सानप (३५, रा. मुकुंदवाडी) असे त्याचे नाव आहे.

छावणीचा वाहतूक विभाग, वेदांतनगर पोलिस नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळपासून बाबा पेट्राेल पंप चाैकात कर्तव्यावर होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास भगवान सानप दुचाकीवरून क्रांती चौकाकडून आले. सहायक फौजदार करीम यांनी त्यांना अडवले व कागदपत्रे व लायसन्सबाबत विचारपूस केली. त्यावर सानप यांनी माजी सैनिकाचे कार्ड दाखवले तर पाेलिसांनी त्यांना जाण्यास सांगितले. परंतु ‘तुम्ही मला अडवलेच कसे, तुमचा हा प्रकार नेहमीचाच झाला आहे,’ असा जाब विचारून सानप याने वाद घालण्यास सुरुवात केली. पाेलिसांनी त्यांना शांत करत निघून जाण्यास सांगितले, मात्र सानपने शिवीगाळ सुरू केली, पाेलिसांच्या अंगावर धावून गेले. मग पाेलिसांनीही त्यांना १२०० रुपये दंडाची पावती दिली. त्यानंतर काही वेळ थांबून सानपही निघून गेले.

नंतर दीड वाजण्याच्या सुमारास सानप पुन्हा बाबा चौकात गेले. तेव्हा उपनिरीक्षक बनसोड यांच्याकडे जात ‘तुम्ही मला १२०० रुपयांची पावती का दिली?’ म्हणून पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातातील ई-चालान मशीन घेतले व जमिनीवर आदळले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करताच त्यांनी हेल्मेट भिरकावले. बनसोड यांनी पकडले तर सानपने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला कडकडून चावा घेतला. खोलवर जखम होत मोठा रक्तस्राव झाल्याने इतर कर्मचाऱ्यांनी सानप यांना राेखण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी माळी यांच्याही बोटाचा चावा घेतला. १५ मिनिटे गाेंधळ घालणाऱ्या सानप याला आवरणे तेथील पाेलिसांना कठीण जात हाेते. अखेर काही स्थानिक व पोलिसांनी मिळून त्याला पकडून वेदांतनगर पोलिस ठाण्यात नेले. बनसाेड व माळी यांच्या बोटाला टाके घालण्यात आले. बनसोड यांच्या फिर्यादीवरून सानप यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

प्रत्यक्षदर्शी म्हणतात, नाहक वाद वाढवला
दोन दिवसांपूर्वीच सानप यांना पाेलिसांनी विनाहेल्मेट व विनाकारण फिरत असल्याच्या कारणावरून दंड ठाेठावला हाेता. बुधवारी पुन्हा पाेलिसांनी अडवले व नंतर पावती दिल्याने सानप याचा राग अनावर झाला हाेता. मात्र बुधवारी पाेलिसांनी त्यांना सुरुवातीला साेडून दिले हाेते, त्यांनी नाहक वाद वाढवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यापूर्वी चेलीपुरा चौकात दोन तरुणांनी नाकेबंदीदरम्यान पाेलिसांना मारहाण केली होती.

बातम्या आणखी आहेत...