आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून सचिन तालेवार यांनी बुधवारी (7 डिसेंबर) कार्यभार स्वीकारला. परिमंडळ वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा करून ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याचे मोठे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.
मूळचे नागपूर जिल्ह्यातील सचिन तालेवार यांचे शालेय शिक्षण छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे झाले आहे. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केली आहे. तसेच गुरुग्राम येथील (MDI) मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधून एनर्जी मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम 2007-08 मध्ये पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे महावितरणकडून त्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली होती. तालेवार हे 1997 मध्ये तत्कालिन विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून एचव्हीडीसी 500 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र चंद्रपूर येथे रुजू झाले. याच ठिकाणी पदोन्नतीनंतर सहाय्यक अभियंता म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर सरळसेवा भरतीमध्ये तालेवार यांची 2006 ला कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली.
या पदावर त्यांनी वर्धा, नागपूर व जालना येथे काम केले आहे. 2016 मध्ये सरळसेवा भरतीत त्यांची अधीक्षक अभियंतापदी निवड झाली. लातूर येथे या पदावर त्यांनी काम केले. 2018 च्या सरळसेवा भरतीत तालेवार यांची मुख्य अभियंतापदी निवड झाली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी नोव्हेंबर-2022 पर्यंत यशस्वीरीत्या काम केले. नुकतीच त्यांची औरंगाबाद परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी बदली झाली. बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारला. याआधी औरंगाबाद परिमंडलात कार्यरत असलेले मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांची मुंबई येथील सांघिक कार्यालयात बदली झाली आहे.
औरंगाबाद परिमंडलातील सर्व वीजग्राहकांसाठी वेगवान प्रशासकीय कामकाजाची तसेच आधुनिक ग्राहकसेवेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल. वीजबिलांच्या थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रीत करून वाणिज्यिक हानी आणखी कमी करण्यासाठी व सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.