आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा पाणीप्रश्न:शहराच्या 60 टक्के भागाला तीन दिवसाआड आणि 40 टक्के भागाला सहा दिवसाआड पाणी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शहराचा पाणी पुरवठा तीन दिवसाआड आणि पाच दिवसाआड या प्रमाणे 60 आणि 40 टक्के भागाला करण्यास सुरूवात झाली आहे. परंतु, वेळापत्रक माहिती न होणे, शेवटच्या घरापर्यंत पाणी न पोहचणे, पाण्याची वेळ कमी झाली या स्वरुपाच्या तक्रारी येत असल्यातरी रोटेशनुसार पाणी सोडण्याची माहिती लाईनमन, पर्यवेक्षक आणि कनिष्ट अभियंता हे संबंधित भागात जाऊन देत आहे. महिनाभरात प्रत्येक नळ कनेक्शनधारकाला सहा वेळा पाणी मिळणार आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी दिली.

शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, सर्वाना समान पाणी मिळावे यासाठी उच्च न्यायालयाने महापालिकेला तीन दिवसाआड आणि पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन तयार करून सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाने शहराच्या 60 टक्के भागाला तीन दिवसाआड आणि 40 टक्के भागाला सहा दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे.

1 जानेवारीपासून या प्रमाणे पाणी पुरवाठा सुरू करण्यात आला आहे. सुरूवातीला 60 टक्के भागाला तीन दिवसाआड पाणी देण्यात येत असून 40 टक्के भागाला सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. हा पाणी पुरवठा करताना संबंधित भागातील लाईनमन, पर्यवेक्षक आणि कनिष्ट अभियंता यांनी आपआपल्या भागात जाऊन पाणी येणार असल्याची माहिती द्यावी, अशी सूचना केली आहे.

नागरिकांच्या तक्रारींचा ओघ

परंतु, लाईनमन, पर्यवेक्षक आणि कनिष्ट अभियंता यांच्याकडून नागरिकापर्यंत ही माहिती देण्यात आली नसल्यामुळे नागरिकांकडून पाण्याचे वेळापत्रक माहिती नाही, शेवटच्या घरापर्यंत पाणी येत नाही, पाण्याच्या वेळेत कपात करण्यात आल्याच्या तक्रारी येत आहे. या तक्रारींचे देखील निरासन केले जाईल, असेही काझी यांनी सांगितले.

दर 15 दिवसांनी वेळपत्रकात बदल

महापालिकेने महिनाभराचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार 60 टक्के आणि 40 टक्के भागाला पाणी देण्याचे नियोजन केले आहे. अगोदर 60 टक्के भागाला तिन दिवसाआड पाणी दिले जात आहे. या पाण्याचे तीन रोटेशन झाल्यानंतर वेळापत्रकात बदल होईल. 40 टक्के भागाला दर तीन दिवसाआड आणि 60 टक्के भागाला पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.

जेल-बेल अ‍ॅपवरून पाण्याची माहिती देणार

स्मार्ट सिटीने तयार केलेल्या जेल-बेल अ‍ॅपवरून कोणत्या भागाला कधी पाणी येणार याबद्दलची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये जेल-बेल अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे. अ‍ॅपवरून एक दिवस अगोदर पाण्याची माहिती मिळणार असल्याचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...