आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:​​​​​​​कोरोनाचे 365 दिवसांत 5,869 बळी, पाच एप्रिल 2020 रोजी औरंगाबादेत पहिला मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांवर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड : गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत एकाच वेळी अनेक कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. - Divya Marathi
नांदेड : गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत एकाच वेळी अनेक कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त मृत्यूंची नोंद; सव्वादोन लाखांवर रुग्ण झाले बरे
  • भयावह : दुसऱ्या लाटेत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत कोरोनाबाधितांचा आकडा वाढता

मराठवाड्यात ५ एप्रिल रोजी पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर वर्षभरात मराठवाड्यात कोरोनामुळे तब्बल ५,८६९ जणांचे मृत्यू झाले. यात ५ एप्रिलपर्यंत सर्वाधिक मृत्यू एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १८१४ झाले आहेत. सर्वात कमी मृत्यू हिंगोली जिल्ह्यात १०२ इतके झाले आहेत. विभागात आतापर्यंत २ लाख ९७ हजार ९२७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. २ लाख २५ हजार ८९० रुग्ण बरे झाले अाहेत. तर, ४६ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यात रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे रुग्णांना विशेषत: गंभीर रुग्णांना आयसीयू बेड मिळण्याची अडचण निर्माण झाली आहे. आरोग्य सुविधा तोकडी पडत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण गंभीर झाल्यानंतर औरंगाबादमध्ये धाव घेत आहेत. मराठवाड्यात घाटीत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. घाटीत वर्षभरात ११ हजार २२७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर, अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले की, ४ एप्रिलपर्यंत ३०२७ रुग्ण दाखल झाले. त्यात २७१८ जणांना डिस्चार्ज तर ३०९ जणांचा मृत्यू झाला. तर नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेडमध्ये २७११ रुग्ण भरती करण्यात आले होते. तर १८९९ डिस्चार्ज (१९५ रेफर केले)आहेत. तर ५८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण व मृत्यू : मरावाड्यात हिंगोली जिल्ह्यात तुलनेने आरोग्याच्या सुविधा कमी आहेत. मात्र कोरोनाच्या काळात जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत ७,४०७ कोरोनाचे रुग्ण अाढळले. ६,४१३ रुग्ण बरे झाले आहेत, तर १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात सर्वात कमी मृत्यू हिंगोलीत झाले आहेत. त्यामुळे सुविधा कमी असतानाही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत संसर्ग आणि मृत्यू कमी असल्याचे पाहायला मिळत आहेत.

उशिराने येण्यामुळेच सर्वाधिक मृत्यू
घाटीत येणारा रुग्ण हा गंभीर झालेला असतो. तसेच रुग्णांची ऑक्सिजनची पातळी २५ पर्यंत आलेले रुग्णही घाटीत भरती होतात. त्यामुळे फुप्फुसाला संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला असतो. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. घाटीत येणाऱ्या ५० पेक्षा अधिक वयाच्या रुग्णांना मधुमेह, हायपरटेन्शन तसेच विविध आजारांचे लोक उशिराने भरती होतात. -डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता घाटी.

भरती केल्यानंतर २४ तासांत घाटीत २४२ जणांचा मृत्यू
वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांचे येण्याचे प्रमाण सर्वात शेवटी असते. मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यानंतर रुग्ण भरती होतात. एकट्या घाटीत गेल्या वर्षभरात झालेल्या मृत्यूंमध्ये २४२ जणांचा मृत्यू भरती केल्यानंतर अवघ्या २४ तासांत झाला आहे. तर १५४ जणांचा एक ते दोन दिवसांत तर दोन ते तीन दिवसांत १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भरती केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ५२२ जणांचा मृत्यू झाला.

सर्वत्र उपचार घेऊन रुग्ण येतो
आमच्याकडे येणारा रुग्ण हा सर्वत्र उपचार घेऊन त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात भरती होतो. काही रुग्ण खासगीत उपचार घेतात, त्यानंतर काही दिवस घरी थांबतात व त्यानंतर पुन्हा आमच्याकडे येतात. गेल्या काही दिवसांत मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. - डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महा. व रुग्णालय, नांदेड.मरणाची भीती अन्...

पाॅझिटिव्ह अालेल्या शेतकऱ्याने शेतात घेतला गळफास
उमरगा : तालुक्यातील बोरी येथील शेतकऱ्याने कोरोनाच्या भीतीने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सुभाष इंगळे (४५) हे गृह विलगीकरणाची मागणी करून स्वतःच्या शेतात राहत होते.
बोरी येथील सुभाष यांना सर्दी, खोकल्याच्या त्रासाने कणकण वाटत असल्याने शनिवारी उमरग्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आले होते. तेव्हा त्यांची अँटिजन चाचणी करण्यात अाली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून अाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांनी गृह विलगीकरणाची मागणी केल्याने प्रशासनाच्या चौकशीनंतर त्यांना सोमवारी (दि.५) रुग्णालयातून पाठवून दिले. ते पायी चालत स्वतःच्या शेतात गेले त्यांचा भाऊ अाणि मुलांनी सुरक्षितरीत्या शारीरिक अंतरावरून त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था सुरू केली होती. सोमवारी रात्री १० वाजता त्यांनी सर्वांना घराकडे पाठवले. त्यानंतर झाडाच्या खाली स्टूल ठेवून गळफास घेतला. मंगळवारी सकाळी हा प्रकार नातेवाइकांच्या समोर आला. पोलिस पाटील बालक मदने यांनी याची माहिती तहसीलदार व पोलिस ठाण्याला दिली. नाईचाकूर प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया टिके यांच्यासह कर्मचारी, पोलिस कर्मचारी व मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पीपीई किट घालून पंचनामा करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...