आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:औरंगाबादेत कोरोनाचे बळी 219 नव्हे 347! राज्य सरकारने लपवलेल्या 1409 कोरोना मृतांपैैकी 128 औरंगाबादचे

औरंगाबाद (शेखर मगर/रोशनी शिंंपी)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सारीचे सर्वाधिक बळी एप्रिल तर कोरोनाचे जूनमध्ये

आैरंगाबादेत कोरोनाने आतापर्यंत २१९ मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. ‘सारी’ने त्यापेक्षा अधिक म्हणजेच २४१ जणांचा मृत्यू झाला आहेत. त्यातील १२८ मृत्यू कोरोनाचेच असल्याचे आरोग्य प्रशासन म्हणते आहे. त्यामुळे कोरोना मृतांची अधिकृत संख्या ३४७ झाली आहे. तर तज्ञांच्या मते सारीच्या उर्वरित ११३ मृतांपैकी १०० बळी देखील कोरोनाचेच आहेत. त्यामुळे कोरोना मृतांची संख्या ४४६ पेक्षा अधिक होते. विशेष म्हणजे, सरकारने लपवलेल्या १४०९ कोरोना मृतांपैकी औरंगाबादेतील १२८ मृत्यू आहेत. ‘दिव्य मराठी’च्या तपासणीत ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

९० दिवसांपेक्षा अधिक लॉकडाऊन होऊनही औरंगाबादेत कोराेनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. आतापर्यंत ४ हजार ७८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २ हजार १३६ जणांवर यशस्वी उपचार झाले आहेत. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत २१९ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने बुधवारी जाहीर केले.जिल्ह्याची आकडेमोड दिशाभूल करणारी असल्याची माहिती ‘दिव्य मराठी’च्या हाती लागली आहे. कारण सिव्हियर अॅक्टुट रिस्परेटरी ईलनेस अर्थात ‘सारी’चे मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात १ हजार ९३६ रूग्ण आढळले. त्यांच्यापैकी ७९६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची अधिकृत संख्या ४ हजार ७८ नसून ४ हजार ८७४ असल्याचे प्रशासनानेच दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. मृतांचे जाहीर केलेले सर्व आकडे फसवे आणि लपवलेले असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. ‘सारी’च्या उपचारा दरम्यान कोरोनामुळे बळी गेलेले एकूण १२८ रूग्ण असल्याचे प्रशासन अधिकृतपणे सांगते आहे. मृतांचा हा आकडा मात्र २१९ कोरोना बळींमध्ये समाविष्ट केला जात नाही. ‘दिव्य मराठी’ टीमने यासंदर्भात सखोल चौकशी केली असून त्यातून प्रशासनाचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे.

सारीचे सर्वाधिक बळी एप्रिल तर कोरोनाचे जूनमध्ये
मार्चमध्ये कोरोनाचा एकही बळी नव्हता, तर सारीचे मात्र ८ होते. एप्रिलमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या ७ होती तर ‘सारी’ने ५० जणांचा मृत्यू झाला होता. मेमध्ये कोरोनाचे ७१ तर सारीमुळे ८४ जणांचा मृत्यू झाला. जूनमध्ये सारीमुळे ९९ जणांचा बळी गेला. सारीचे एकूण बळी २४१ असून त्यात कोरोनाच्या १२८ बळींचाही समावेश आहे. कोरोनाने जूनपर्यंत २१९ जणांचे प्राण घेतले. पण उर्वरित ११३ ‘सारी’मृतांमधील ८० ते ९० टक्के मृत्यू कोरोनाचे आहेत. त्यांची कोविड-१९ तपासणी निगेटिव्ह असली तरी मृत्यूपूर्वी लक्षणे कोरोनाचीच असतात. त्यामुळे सरकार यांना ‘सारी’चे मृत्यू म्हणत असले तरी महामारीच्या काळात ११३ पैकी किमान १०० जणांचा कोरोनामुळेच बळी गेला असे म्हणण्यास पूर्णपणे वाव आहे, असे तज्ञ डॉक्टरांनी म्हटले आहे.

मार्च, एप्रिल, मे आणि जून दरम्यान ‘सारी’आणि ‘कोरोना’ बळींची तुलना करताना धक्कादायक वास्तव समोर
२१९ कोरोना बळींमध्ये सारीतील कोरोनामुळे बळी गेलेल्या १२८ जणांचा समावेश केलाच जात नाही. जर १२८ जणांचा मृत्यू कोरोनाचेच झाल्याचे प्रशासन मान्य करत आहे, तर दोन्ही आकड्यांची बेरीज करून आकडे जाहीर करायला काहीच हरकत नाही. पण प्रशासन केवळ मृतांचा आकडा लवपण्यासाठी कोरोनाच्या बळींची संख्या सारीतील बळी म्हणून दाखवते आहे. ‘दिव्य मराठी’ने मात्र कोरोना बळींची खरी आणि अधिकृत संख्या ३४७ असल्याचे शोधून काढले आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून दरम्यान ‘सारी’आणि ‘कोरोना’ बळींची तुलना करताना धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

जिल्हाधिकारी चौधरींचा दावा
मृतांचे आकडे एकत्रित सांगतो

आजवर आपण आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच मृत्यू जाहीर केले आहेत. ही केंद्र सरकारच्या अधीनस्थ काम करणारी संस्था आहे. त्यामुळे सर्व राज्यात त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम चालते. राज्यात वेगळे काम सुरू नाहीये. सारीचे कोविड मृत्यू हे दैनंदिन मृत्यूंत समाविष्ट केलेले असतातच. त्याची बेरीज करूनच मृत्यू जाहीर केले जातात, असा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केला.

‘सारी’चे रुग्ण कोरोनाचेच
‘सारी’चा रुग्ण हा शक्यतो कोविडचाच पॉझिटिव्ह असतो. संशयित कोरोना रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतात. पण त्यांना विषाणू संसर्ग असतो. म्हणून त्यांना कोरोनाचाच रुग्ण म्हटले जाते. उपचारादरम्यान ‘सारी’ रुग्णाचा मृत्यू झाला अन् त्याचा कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तरीही ‘सारी’चाच जाहीर केला जातो. ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असतो त्यांच्यापैकी ‘सारी’तील ८० ते ९०% मृत्यू कोरोनाचेच असतात . -डॉ. संजय पाटणे, फिजिशियन

लक्षणे कोरोनासदृशच
श्वसनाच्या त्रासाशी संबंधित गंभीर तक्रारीचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले की सर्वप्रथम कोविड-१९ ची तपासणी करण्यात येते. रिपोर्ट निगेटिव्ह आला तरीही उपचार मात्र कोविड-१९ च्या प्रोटोकॉलचे दिले जातात. दोन्ही वेळा निगेटिव्ह आला तर ‘सारी’चा रुग्ण म्हणून ट्रीट केला जातो. त्यामुळे सारीच्या मृतांमधील ९० टक्के मृत्यू कोरोनाचेचआहेत. -डॉ. मानव पगारे, फिजिशियन

सोलापुरात कोरोनाचे ४३ मृत्यू लपवले
सोलापूरमध्येही गेल्या दोन महिन्यांत कोरोनामुळे झालेले ४३ मृत्यू लपवल्याचा गंभीर प्रकार नुकताच समोर आला आहे. हे आकडे लपवणाऱ्या रुग्णालयांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

...तर तज्ञांच्या मते
सारीच्या उर्वरित ११३ पैकी १०० मृत्यूही कोरोनाचेच, त्यामुळे कोरोना मृतांची संख्या ४४६

बातम्या आणखी आहेत...