आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेल्या वर्षी एखादा रुग्ण आढळला तर लगेचच तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून वेगळा केला जात होता. एवढेच नाही तर परिसर सॅनिटाइज करून पाठोपाठ कुटुंब आणि संपर्कातील व्यक्तींची चाचणीही केली जात होती. मात्र, फेब्रुवारी २०२१ पासून अचानक रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. तरीदेखील ना कुटुंबाची चाचणी होतेय, ना संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली जातेय. यामुळे रुग्णसंख्येचा स्फोट होताना दिसत आहे. शासकीय माहितीनुसार एक रुग्ण किमान २२ जणांना संक्रमित करतो. काँटॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तर नागरिक म्हणतात, ‘आम्हाला कुणीच विचारले नाही. काँटॅक्ट ट्रेसिंग सुरू असते तर रुग्णसंख्या आणखी वाढलेली दिसली असती...’ कोरोनाचा उद्रेक वाढलेला असताना प्रशासकीय यंत्रणेच्या सुविधा तोकड्या असल्याचे डीबी स्टार पाहणीत आढळले आहे.
१५ मार्च २०२० रोजी शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. ही महिला रुग्ण कार्यरत असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट संस्थेतील ४५० विद्यार्थी आणि संपर्कातील जवळपास ३० जणांची एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा तपासणी करण्यात आली होती. त्या वेळी सुदैवाने कुणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. त्यानंतर हळूहळू कोरोनाने शहरात पाय पसरले आणि कोरोनाचा उद्रेक वाढतच गेला. त्यामुळे १२ मे २०२० रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टास्क फोर्सची स्थापना करण्याच्या सूचना दिल्या. सप्टेंबर २०२० पर्यंत ही टीम युद्धपातळीवर काँटॅक्ट ट्रेसिंग करतही होती. ४५० ते ५०० रुग्ण असताना काँटॅक्ट ट्रेसिंगमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात बऱ्यापैकी यश आले. आज शहरात दररोज १७०० च्या घरात रुग्ण सापडत आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली तर किमान ३४ हजारांची चाचणी व्हायला हवी. यातील किमान १७ ते २० हजार पॉझिटिव्ह येऊ शकतात. मात्र, काँटॅक्ट ट्रेसिंग बंद असल्याने बाधितांची संख्या कमी दिसत आहे. ट्रेसिंग सुरू असेल तर रुग्णसंख्या २० पट अधिक दिसण्याची भीती आहे.
विभागातील रुग्णसंख्या (२९ मार्चपर्यंत)
औरंगाबाद जिल्हा : एकूण ८११८१, सध्या उपचार घेत असलेले : २१२८२
जालना जिल्हा : २२५९५ (एकूण), ५९५ (उपचार घेणारे)
हिंगोली जिल्हा : ६६३२ (एकूण), १६८२ (उपचार घेणारे)
परभणी जिल्हा : १३३०९ (एकूण), ३९४७ (उपचार घेणारे)
काँटॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे
टास्क फोर्स विसर्जित केला असला तरीही काँटॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. बाधितांच्या संपूर्ण कुटुंबाची तपासणी केली जात आहे. संपर्कातील व्यक्तींनाही चाचणीसाठी बोलावले जात आहे. आशा सेविका आणि शिक्षक त्यासाठी काम करत आहेत. - डॉ. बाळकृष्ण राठोडकर, प्रभारी आरोग्य अधिकारी, मनपा
या आहेत मार्गदर्शक सूचना
एक रुग्ण २० ते २२ जणांना संक्रमित करतो. साधारणतः ५ दिवसांत संपर्कातील व्यक्तींना लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे ३ ते ५ दिवसांनी त्यांची चौकशी किंवा चाचणी करायला हवी.
डीबी स्टार चमूने विविध भागांतील रुग्णांशी संपर्क केला असता प्रत्येक जण काँटॅक्ट ट्रेसिंग झाली नसल्याचे सांगत होता.
सर्व नावे बदललेली आहेत...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.