आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मृत्यूपुढे हतबल सारे...धडधडणाऱ्या चितांच्या ज्वाळांत तुटून चालली घरे; दहा दिवसांत कोरोनाने घेतले 89 जणांचे बळी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टर म्हणाले : पुढील १५ दिवस अधिक धोक्याचे

सहा महिन्यांनी परतून आलेल्या कोरोनाचा औरंगाबादवरील विळखा हळूहळू घट्ट होत आहे. ९ ते १८ मार्च कालावधीत ८९ कुटुंबांवर या आजाराने निर्दयी घाव घातला आहे. सात-आठ तासांत १५ पेक्षा अधिक मृतदेह येत असल्याने स्मशानभूमीतही हलकल्लोळ उडाला आहे. कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारी असलेल्या पंचशील बचत गटाचे कार्यकर्तेही तणावात काम करत आहेत. रात्र सूर पेरुनी अशी हळूहळू भरे समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे या कवी ग्रेस यांच्या ओळीप्रमाणे ‘धडधडणाऱ्या चितांच्या ज्वाळांत तुटून चालली घरे’असा अनुभव रुग्णांचे नातेवाईक घेत आहेत. कोरोनाने दुसऱ्या टप्प्यात हैदोस घातला आहे. गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या हजारावर गेली आहे. रुग्णालयातील खाटा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी एकाच वेळी कॉल आल्याने यंत्रणेची धावपळ सुरू आहे. अंत्यसंस्कार करणाऱ्या संस्थांनी गाड्यांची संख्या व मनुष्यबळ वाढवले आहे. सुरुवातीला अंत्यसंस्कारांसाठी नातेवाइकांना उपस्थित राहू नये, असा नियम होता. आता तो नसल्याने नातेवाईक पीपीई किट घालून अंतिम निरोप देत आहेत.

बुधवारी मृतांची संख्या १८ वर गेली. गुरुवारी १६ जणांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अंत्यसंस्काराची जबाबदारी असलेल्या औरंगाबादेत पंचशील महिला बचत गट, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांना एकाच वेळी पाच कुटुंबांचे कॉल आले. प्रत्येकाला तातडीने अंत्यसंस्कार करायचे होते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी मृतदेह नेण्यासाठी वाहने, मनुष्यबळ वाढवून चार तासांत १२ जणांवर अंत्यसंस्कार केले.

दहा दिवसांत कोरोनाने घेतले 89 जणांचे बळी
गेल्या नऊ मार्चपासून शहरात कोरोनाचा कहर वाढला आहे. रुग्ण व मृत्यूचा आकडा दररोज वाढतच आहे. १७ मार्चला आतापर्यंतचे सर्वाधिक १८ बळी गेले.

मास्क वापरा, वाफ घ्या
पूर्वीपेक्षा आता कोरोनाची तीव्रता प्रचंड आहे. पुढील १५ दिवस धोक्याचे आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दोन मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बीच्या गोळ्या घ्या. दिवसातून दोन वेळा वाफ घ्या आणि कोरोनावर मात करा. डॉ. उन्मेष टाकळकर, संचालक, सिग्मा रुग्णालय

दोन दिवसात अनेक कॉल
कोरोनाने मृत्यू झालेल्यांना अखेरचा निरोप देण्याचे काम आम्ही सेवा म्हणून स्वीकारले आहे. सलग दोन दिवस काही तासांतच अनेक कॉल आल्याने धावपळ झाली. परंतु तत्काळ यंत्रणा उभी करून विविध स्मशानभूमींत अंत्यसंस्कार केले. आशा मिलिंद म्हस्के, अध्यक्ष, पंचशील महिला बचत गट

प्रख्यात कवी यशवंत देव यांच्या
अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
या ओळींची आठवण व्हावी, असे वातावरण स्मशानभूमींमध्ये आहे. मृतांचे नातेवाईक पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करत आहेत.

नातेवाईक करतात विधी
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मृतांच्या नातेवाइकांना रुग्णालयात बोलावण्यात येत होते. तेथे अंत्यदर्शन केल्यानंतर एकाच नातेवाइकाला पीपीई किट घालून स्मशानात जाण्याची परवानगी होती. आता तो नियम लागू नसल्याने जवळचे नातेवाईक स्मशानात जाऊन विधी पूर्ण करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...