आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्या राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आङे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाउन किंवा नियम कडक करण्यात आली आहेत. परंतु, दुसरीकडे लसीकरणानेही वेग घेतला आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. पण, यात आता कोरोनाची लस घेतलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबादमधील एका पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना लस घेतल्यानंतरही मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी लसीचा पहिला डोस घेतलेले बेगमपुरा पोलिस ठाण्यातील कर्मचारी भास्कर शंकर मेटे (52, रा. मयूर पार्क, हर्सूल परिसर) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मेटेंसोबत बेगमपुरा पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही लस घेतली होती. तीन दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जळगाव रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने एमजीएममध्ये दाखल केले होते. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिस अंमलदार नीळ तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या मनातील लसीविषयीची भीती दूर करण्याची जबाबदारी उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षकांना दिली जाणार आहे, असे डॉ. निखिल गुप्ता म्हणाले.
लग्नसोहळ्यात 50 पेक्षा अधिक वऱ्हाडी असतील तर कारवाई
आज फेब्रुवारीमधील (माघ) शेवटचा मुहूर्त रविवारी (21 फेब्रुवारी) आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात सुमारे 200 विवाह सोहळे होणार आहेत. त्यातील काही खुल्या मैदानात होत आहेत. कोरोनाचा पुन्हा फैलाव होत चालल्याने मंगल कार्यालयातील गर्दी रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने पथके स्थापन केली आहेत. 50 पेक्षा अधिक वऱ्हाडी असतील तर कारवाई होणार आहे. त्यामुळे संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...तर रिक्षा जप्त होणार
शहरात 35 हजार रिक्षाचालक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. मास्क नसलेल्या चालकाची रिक्षा जप्त करण्याची कारवाई लवकरच हाती घेत आहोत, असे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले. शनिवारी गुप्ता यांच्यासह पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपायुक्त मीना मकवाना यांनी जिल्हा रुग्णालयात लस घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या वेळी डॉ. पाडळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी उपस्थित होते.
आता थेट कोविड सेंटरमध्येच होणार रुग्णांची भरती
तीन महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी मिळाली होती. मात्र, आता रुग्णसंख्या वाढत चालल्याने ती परवानगी रद्द करण्यात आली असून रुग्णांना थेट मनपाच्या कोविड सेंटरमध्येच भरती व्हावे लागणार आहे. मेल्ट्रॉन (300 रुग्ण), पदमपुरा कोविड सेंटर (50) पूर्ण क्षमतेने भरले आहे. म्हणून 400 रुग्ण क्षमतेचे किलेअर्क, एमजीएम येथील सेंटर पुन्हा सुरू केल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
शनिवारी 144 रुग्ण, दोन मृत्यू
जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 144 रुग्ण आढळले तर दाेघांचा मृत्यू झाला. अाता एकूण रुग्णांची संख्या 48,437 झाली अाहे. मनपा अाणि ग्रामीण हद्दीतील 57 जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46,399 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1251 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 787 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.