आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षभरात काेराेनाने जिल्ह्यातील अनेकांचे बळी घेतले अाहेत. यात अनेक कर्ते पुरुषही गमावले अाहेत, एवढेच नव्हे, तर गेल्या अाठवड्यात सहा महिन्यांच्या चिमुकलीलाही अाईच्या कुशीतून हिरावून नेले. मात्र, अनेकांनी काेराेनावर मातही केली अाहे, यात अंबड रोडवरील जामखेड येथील सर्वांत लहान म्हणजेच नऊ महिन्यांच्या अथर्व मंडलिकने चार दिवस व्हेंटिलेटरवर राहून काेराेनाशी झुंज देत त्यावर मात केली अाहे. अथर्वला मंगळवारी डिस्चार्ज देण्यात अाला. डॉक्टरांनी उपचार करून अामचे बाळ सुखरूप पदरात दिल्याचे अथर्वच्या वडिलांनी या वेळी सांगितले. आजवर ८० बालकांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात घाटी प्रशासनाला यश आल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून समाेर अाले अाहे.
मास्क लावूनच बाळांना घ्या
बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे म्हणाल्या, वर्षभरात ७ बालके दगावली आहेत. त्यामागील कारणांची मिमांसाही महत्त्वाची आहे. आम्ही १ दिवस ते १२ वर्षांच्या बालकांवर उपचार केले. वर्षभरात ८७ पैकी ७ मुले दगावली. मात्र, त्यांना हृदयविकार, आतड्यावर सूज, किडनीचे विकार होते. याशिवाय उशिरा दाखल केले. बालकांना पालकांकडून कोरोनाचा संसर्ग होतो. त्यामुळे स्वतः मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. बालकांना जवळ घेताना हाताची स्वच्छता ठेवा. शक्यतो घरातही मास्क लावूनच बाळांना जवळ घ्या. चालणारी-फिरणारी मुले असतील, तर त्यांना मास्क आणि अंतराचे महत्त्व पटवून द्या. त्यामुळे संसर्ग हाेणार नाही, असे डाॅ. खैरे यांनी सांगितले.
हजारात एखाद्यास होते लागण
बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र खडके म्हणाले, गेल्या मार्चपासून कोरोनाची सुरुवात झाली. पण, बालकांना धोका नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेत परिस्थिती बदललेली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत ३० ते ४० टक्के बालकांना कोरोनाची लागण झाली. अर्थात हा अाजार बालकांमध्ये गंभीर स्वरूप धारण करत नाही. हजारात एखाद्या बालकाला या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. शिवाय बालकांमध्ये बरे होण्याचे प्रमाणही ९० ते ९५ टक्के आहे. ज्या बाळांना इतर आजार आहेत, त्यांनाच काहीसा त्रास जाणवतो. ज्याप्रमाणे रुग्णांच्या उपचारासाठी वेगळी औषधी वापरावी लागतात, तशी गरज बालकांना पडत नाही. कोरोना लहान बाळांमध्ये गंभीर रूप धारण करत नसला, तरी मोठ्या प्रमाणात संक्रमण करत आहे.
घरातील सर्वांना होऊन गेल्यानंतर मुलांमध्ये लक्षणे
बालकांना कोरोना झाल्यास बरे होण्याची गती सर्वाधिक आहे. क्वचित एखाद्या बाळाला मल्टी ऑर्गन डिसफंक्शन किंवा पेडियॅक्ट्रिक इन्फ्लेमेशन मल्टी ऑर्गन सिंड्रोम होतो. मुलांमुळे घरात कोरोना येतो. घरातील सर्वांना होऊन गेल्यावर मुलांमध्ये १५ दिवसांनंतर डोळे लाल होणे, जीभ लाल होणे किंवा सतत ताप येण्याची लक्षणे दिसून येतात. १८ वर्षांवरील सगळ्यांना लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना संपणार नाही. मात्र, त्याचे गंभीर परिणाम नक्कीच कमी हाेतील.
डॉक्टरांनी बाळ सुखरूप पदरात दिले
आम्ही अंबड रोडवरील जामखेडला राहतो. बाळाला २६ मार्चला ताप आला. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी औरंगाबादले आणले. खासगी रुग्णालयात दाखवले अाणि चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह येताच २७ मार्चला घाटीत दाखल केले. दहा दिवसांच्या उपचारानंतर आमचे बाळ पूर्णपणे बरे झाले. यातील चार दिवस बाळ व्हेंटिलेटरवरही होते. पण, डॉक्टरांनी बाळ सुखरूप पदरात दिले. आम्हाला सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे. दुसरी लाट भयंकर आहे. त्यामुळे एक दिवसाचाही विलंब आम्ही केला नाही, असे बाळाचे वडील संतोष मंडलिक यांनी सांगितले. घाटीच्या बालरोग विभागातून अथर्व मंडलिक या ९ महिन्यांच्या बाळाला उपचार केल्यानंतर निरोप देण्यात आला. या वेळी विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे व त्यांची टीम.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.