आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंजेक्शनचा तुटवडा कायमच:मेडिकल चालक- साहेब, 15 रुग्ण क्रिटिकल आहेत; औषध निरीक्षक- फक्त तीनच रेमडेसिविर मिळतील

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात गरज 1300 व्हायलची, प्रत्यक्षात शुक्रवारी दिवसभरात मिळाल्या फक्त दोनशेच

रेमडेसिविरचा काळाबाजार राेखण्यासाठी नियंत्रण कक्षामार्फत थेट रुग्णालयांनाच इंजेक्शनचे वाटप करण्याचा निर्णय नुकताच प्रशासनाने घेतला. मात्र, अावक कमी व मागणी जास्त असल्यामुळे शुक्रवारी अनेक खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी म्हणून रुग्णालयांशी संलग्न मेडिकल चालक जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून हाेते. सकाळच्या सत्रात संपूर्ण जिल्ह्यासाठी केवळ २०० व्हायल मिळाल्या होत्या. अजून व्हायल मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आवश्यक साठा कुठेच मिळाला नाही. अखेर २०० व्हायल थोड्या थोड्या करून वाटप करण्यासाठी औषध निरीक्षक दुपारी साडेतीन वाजता अाले. तोपर्यंत ८२ मेडिकल चालक जमले होते.

औरंगाबाद किडनी हॉस्पिटलचा पहिला नंबर लागला. या हॉस्पिटलची १५ रुग्णांची यादी होती. औषध निरीक्षक म्हणाले,’ केवळ तीनच इंजेक्शन मिळतील.’ यावर रुग्णालयाच्या प्रतिनिधीने ‘साहेब, १५ रुग्ण क्रिटिकल आहेत, तीन घेऊन काय करावं?’ यावर औषध निरीक्षक म्हणाले, ‘माझ्याकडे केवळ २०० इंजेक्शन आहेत. तुम्हीच सांगा कसे वाटप करू? हे तीन घेऊन जा. उद्याचं उद्या बघू,’ असे म्हणत निरीक्षकांनी अर्ज निकाली काढला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने या नियंत्रण कक्षात थांबून संपूर्ण परिस्थिती पाहिली. या प्रक्रियेचा हा लाइव्ह वृत्तांत.

बड्या रुग्णालयांना कंपन्यांकडून सप्लाय
जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाल्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ८४ रुग्णालयांनी रेमडेसिविरसाठी अर्ज केले होते. त्यांना रेमडेसिविर मिळण्याचा अन्य कुठलाच मार्ग नव्हता. तर एमजीएम, कमलनयन बजाज, धूत हॉस्पिटल, सुमनांजली, लाइफलाइन सिटी केअर व अन्य एका खासगी हॉस्पिटलला थेट कंपन्यांकडून सप्लाय सुरू आहे. शुक्रवारी या रुग्णालयांमध्ये ५०० व्हायल उपलब्ध होत्या. या पुरवठ्यावर आणि वापरावर अन्न व औषधी प्रशासनाचे नियंत्रण असल्याचे औषधी निरीक्षक बजाज म्हणाले.

मनपाने मागवले दहा हजार रेमडेसिविर
मनपाने अाता १० हजार इंजेक्शन मागवले अाहेत. मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाते. त्यासाठी अाधी १० हजार इंजेक्शन खरेदी केले होते. घाटीसह इतर ठिकाणी तुटवडा जाणवत असल्याने मनपाने त्यांना इंजेक्शन दिले. मनपाकडील साठा संपत आला असून १० हजार इंजेक्शनची मागणी केली अाहे, अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

असे होते वितरण : निरीक्षकांच्या मंजुरीनंतर स्टाॅकिस्टकडून मिळते इंजेक्शन
रेमडेसिविरची गरज असलेला रुग्ण जिथे अॅडमिट आहे, त्या हॉस्पिटलने रुग्णाचे नाव, पॉझिटिव्ह आल्याचा दिनांक, रुग्णांचा अथवा नातेवाइकांचा नंबर एका कागदावर लिहायचा. या माहितीसोबत एक लेखी मागणीपत्र तयार करून मदत कक्षात जायचे. या कक्षातील कर्मचारी सदर माहितीची खातरजमा करून त्या अर्जावर ‘मंजूर’, अशी नोट टाकून तो अर्ज औषध निरीक्षकांना देतील. निरीक्षक सर्व अर्जांतील मागणी आणि उपलब्ध साठा पाहतील. साठा कमी असल्यास अति गंभीर रुग्णांची क्रमवारी ठरवली जाते. कोणाला आणि किती व्हायल द्यायच्या, हे निश्चित झाल्यावर ती यादी खासगी स्टॉकिस्टकडे जाते. त्यानंतर हॉस्पिटल प्रतिनिधी शहरातील स्टॉकिस्टकडे जाऊन व्हायल विकत घेतात आणि प्रत्यक्ष रुग्णापर्यंत देतात.

कंपनीकडून थेट खरेदी, तरी पुन्हा मागणी
सुमनांजली हॉस्पिटलने गुरुवारी कंपनीकडून ४७ व्हायल अाणल्या हाेते. तरीही या हॉस्पिटलने नियंत्रण कक्षात रेमडेसिविरसाठी अर्ज केला. यावरही बजाज यांनी आक्षेप घेतला. थेट रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून, ‘असे करू नका, शिल्लक असताना मागता कशाला?’ असे सुनावले.

स्कोअर नऊ तर मग रुग्ण सीरियस कसा?
गंगापूरमधील गायकवाड हॉस्पिटलची यादी निरीक्षकांनी पाहिली. एका रुग्णाचा स्कोअर ९ असताना ताे आयसीयूमध्ये अॅडमिट केल्याचे दाखवले. यावर औषध निरीक्षकांनी आक्षेप घेऊन स्कोअर ९ असताना रुग्ण सीरियस कसा, असा सवाल केला.

आयसीयूत उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिले प्राधान्य
लासूर स्टेशनच्या शिवना रुग्णालयाची १३ रुग्णांची यादी होती. सोबत सर्वांचे एचआरसीटी देखील होते. मात्र, १५ पेक्षा अधिक स्कोअर व आयसीयूमध्ये अॅडमिट असलेल्या रुग्णांनाच व्हायल दिल्या जातील, असे औषध निरीक्षक बजाज यांनी सांगितले. त्यानुसार शिवना हॉस्पिटलसाठी ३ व्हायल देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षात रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीसाठी दिवसभर रुग्णालयांचे प्रतिनिधी व मेडिकल चालक ठिय्या देऊन बसले हाेते.

डाॅक्टरांनी घेतली कक्षात धाव
जिल्हाधिकाऱ्यांचे पीए व औषध निरीक्षक हा मदत कक्ष सांभाळतात. रेमडेसिविर मिळवण्यासाठी केवळ हॉस्पिटलशी संलग्न मेडिकल चालकच नव्हे, तर त्यांच्यासोबत काही डॉक्टर्स अाले होते. मोठ्या हॉस्पिटलमधील अन्य कर्मचारीही अर्ज घेऊन येत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिविरसाठी आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य माणसे नव्हती.

खाेटे माहिती देणाऱ्यांना इशारा
एक-एक अर्ज निकाली काढत असताना औषध निरीक्षक बजाज यांनी सर्वांना सुनावले. ‘जर खोटे स्कोअर, खोटी माहिती सादर केली तर फौजदारी करू. आम्ही रँडमली तपासणी करणार आहोत. आम्ही कागद मागतोय, म्हणून काहीही आणायचे, असे चालणार नाही,’ असे त्यांनी सर्वांना सुनावले.

साठा मिळवण्यासाठी प्रशासनाची धडपड
गुरुवारी १३०० व्हायलची गरज असताना जालना येथील स्टॉकिस्टकडून ९६० व्हायल मिळाल्या होत्या. शुक्रवारी केवळ दोनशेच आल्या. ८० रुग्णालयांनी १३०० व्हायलची मागणी केलेली होती. तुटवडा दूर करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन आणि जिल्हाधिकारी विविध कंपन्यांसह परजिल्ह्यात रेमडेसिविरसाठी चाचपणी करत होते. ज्या जिल्ह्यात रेमडेसिविर मुबलक आहे, त्या जिल्ह्याकडून उसनवारी तत्त्वावर रेमडेसिविरच्या व्हायल मिळवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू होती. मात्र आवश्यक तेवढा साठा मिळू न शकल्याने दुपारी ३.३० वाजता आहे तेवढ्याच वाटप केल्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णालय प्रतिनिधींना वाटप सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...