आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारात अनेक अडथळे:शोकाकुल कुटुंबीयांची जाचक अटींमुळे फरपट; मृतदेह ताब्यात घेण्यापासून ते स्मशानभूमीपर्यंतचे अनेक सोपस्कार पार पाडताना मनस्ताप

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घाटीत बळी वाढत असल्याने मृतदेहांचे व्यवस्थापन करताना कर्मचाऱ्यांना रोजच कसरत करावी लागते.

जीवघेणा काेराेना दरराेज अनेक कुटुंबे उद‌्ध्वस्त करताेय. अाज कुणाच्या डाेक्यावरील माता-पित्याचे छत्र हिरावले जातेय, तर उद्या कुठे झाेपेत धाेंडा घालावा तसा पुत्रशाेकाचा धक्का वृद्ध माता-पित्यांना सहन करावा लागताेय. मात्र केवळ एवढ्यानेच त्या शाेकाकुल कुटुंबीयांचे हाल थांबत नाहीत. रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यापासून ते पार्थिवावर अंत्यसंस्कार करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर फरपट हाेते.अडवणूक करून सहनशीलतेचा अंत पाहिला जाताे. ‘अडला हरी..’च्या भूमिकेत असलेला हा हतबल नातलग शाेकाकुल अवस्थेतही कसा भरडला, लुटला जाताेय त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण....परभणी जिल्ह्यातील चिलगरवाडी येथील बाबाराव चिलगर. कोरोनाची लागण झाली म्हणून औरंगाबादेत अाणले.

रोकडिया हनुमान कॉलनीतील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ६ एप्रिल रोजी भरती केले. मात्र दहा एप्रिल रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची बातमी त्यांच्या नातेवाइकांना कळवली. दु:खाचा डाेंगर काेसळलेला असताना दिवसभर विविध परवानग्या, रुग्णालयाचे बिल, रुग्णवाहिका, स्मशानभूमी, पीपीई किट हे सगळे साेपस्कार पूर्ण करता करता नातेवाईक पुरते वैतागले. बाबाराव यांची तिन्ही मुले कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे मृत्यूची बातमी कळाली तरी ते अाैरंगाबादेत येऊ शकले नाहीत. त्यांच्या जावयांनी औरंगाबादेत धाव घेतली. सकाळी ११ वाजेपर्यंत माेजकेच नातेवाईक जमले. रुग्णालयाने तब्बल ८८ हजार ५०० रुपये बिल भरायला सांगितले. अवघ्या चार दिवसांच्या उपचाराची ही रक्कम अधिक वाटल्याने नातेवाइकांनी बिल कमी करायला सांगितले. मात्र, रुग्णालयाने दाद दिली नाही.

वेळीच आयसीयू मिळाल्यास वाचतील प्राण
दुसऱ्या लाटेत इन्फेक्शन व रुग्णसंख्या वाढत अाहे. परिणामी बेड मिळणे त्यातल्या त्यात आयसीयू उपचार मिळण्यास माेठ्या अडचणी येत अाहेत. याच कारणामुळे कमी वयाच्या रुग्णाचे देखील मृत्यू होत आहेत. वेळेत उपचार आणि आयसीयू बेड मिळाला तर मृत्यूचे हे प्रमाण निश्चित कमी हाेऊ शकते. - डॉ प्रसाद पुंडे, काेविड युनिटप्रमुख, धूत हॉस्पिटल

अंत्यसंस्कारासाठी दोन परवानग्या
कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाणे आणि महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. हॉस्पिटल प्रशासनाने या दोन परवानग्या काढून आणायला सांगितले, तेव्हा चिलगर यांच्या जावयाने शहरातील एका नातेवाइकाला बोलावून घेतले. ते नातेवाईक महापालिका आणि पोलिस ठाण्यात गेले आणि अंत्यसंस्काराच्या परवानग्या घेऊन आले. या प्रक्रियेत दोन तास गेले. तोपर्यंत चिलगर यांची मुलगी, जावई, नातवंडे व इतर काही नातेवाईक हॉस्पिटलच्या बाजूला बसून होते.

रुग्णवाहिका, झेराॅक्ससाठी धावाधाव
कैलासनगर स्मशानभूमीत मृतदेह न्यावा लागेल असे सांगण्यात अाले. मग रुग्णवाहिकेची शाेधाशाेध सुरू झाली. दाेन हजार रुपयांमध्ये एका रुग्णवाहिकेने येण्यास सहमती दिली. अर्ध्या तासाने रुग्णवाहिका आली. महापालिकेने दिलेल्या परवानगीची झेरॉक्स द्या, असे रुग्णवाहिका चालकाने सांगितले. मग पुन्हा झेरॉक्स आणण्यासाठी दोन नातेवाईक शहरभर फिरू लागले. शनिवारी कडक लॉकडाऊन असल्याने झेरॉक्स मिळत नव्हती. शेवटी एका मेडिकलमध्ये झेरॉक्स मशीन असल्याने तिथे साेय झाली.

अंत्यसंस्कारासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करा
औरंगाबाद | कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलिस ठाणे, मनपा कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे त्रस्त झालेले नातलग व स्वयंसेवी संस्थांनी अंत्यसंस्कारासाठी एका खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी केली. ज्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचा आहे त्या हद्दीतील पोलिस ठाण्याची परवानगी अाधी घ्यावी लागते. नंतर मनपा कार्यालयात जाऊन तेथून वेगळी परवानगी घ्यावी लागते. ही कागदपत्रे घाटीतील शवविच्छेदन विभागात द्यावी लागतात. हे साेपस्कार केल्यानंतर मृतदेह ताब्यात दिला जातो. अगोदरच शाेकाकुल असलेल्या या कुटुंबीयांची त्रेधा उडते. लाॅकडाऊन असल्याने झेराॅक्सची दुकानेही बंद असतात त्यामुळे या प्रतीही काढता येत नाहीत. या शासकीय कामांसाठी नातलगांना इकडे तिकडे फिरावे लागते त्यामुळे त्यांना संसर्ग हाेण्याची भीतीही नाकारता येत नाही. ही गैरसाेय टाळण्यासाठी काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी पोलिस आयुक्तालय, मनपा कार्यालय किंवा घाटीत एक खिडकी योजना सुरू करावी. यात सर्व परवानग्या मिळाव्यात, अशी मागणी अधिष्ठान फाउंडेशनचे ललित सरदेशपांडे यांनी केली.

भीतीमुळे मदतीलाही काेणी येत नाही
ज्या कुटुंबातील सदस्य कोरोनामुळे दगावतो. त्या कुटुंबाच्या मदतीला खूप कमी लोक असतात. त्यात घरात जर पुरुष व्यक्ती नसेल तर महिलांची खूपच गैरसेाय हाेते. काेराेना संसर्गाच्या भीतीही या काळात मदतीलाही कुणी पुढे येत नसल्याची खंत मृताचे नातेवाईक नितीन चांदणे यांनी व्यक्त केली. अनेक वेळा मृताचे संपूर्ण कुटुंबीयच क्वाॅरंटाइन असते. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनाच पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे घाटीतच पोलिस, मनपाच्या परवानग्या मिळाल्या, तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास नातेवाइकांचा त्रास कमी होईल, असे मत अनाथ मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या सूर्योदय परिवाराचे सोमनाथ बोंबले यांनी म्हटले.
दिव्य मराठी लाइव्ह रिपाेर्ट }रुग्णालयांपासून स्मशानभूमीपर्यंत लूट; परवानगीसाठी दाेन कार्यालयात फेऱ्या

नेत्यांच्या फाेननंतर २८ हजारांची सूट
चारच दिवस उपचार घेतले, रुग्ण मृत झाला. त्याचे ८८ हजार का द्यावे, असा नातेवाइकांचा सवाल होता. अखेर जावयाने आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना फोन केले. शिवाय बिल याेग्य लावले अाहे की नाही हे तपासण्यासाठी महसूलच्या ऑडिटरलाही फोन केला. एक तासाने डॉक्टरांनी बोलावले तेव्हा ‘मला खैरे, दानवेंचे फोन आले होते, तुम्ही ८८ ऐवजी ६० हजार रुपये भरा’ असे सांगितले. जावयाने पैसे भरले. हॉस्पिटलने ‘आमची काहीही तक्रार नाही’ असे जावयाकडून लिहून घेतले आणि मृतदेह ताब्यात दिला.

डिझेल, लाकडासाठी जास्तीचे ८०० रुपये वसूली
अाधीच दु:ख त्यात वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याने त्रस्त नातेवाइकांची स्मशानभूमीतही अडवणूक झाली. ५ लिटर डिझेल आणि अधिकचे एक क्विंटल लाकडासाठी स्मशानजोगीने ८०० रुपयांची मागणी केली. पालिकेकडून तीनच क्विंटल लाकडे मिळतात, त्यात मृतदेह व्यवस्थित जळत नाही. तुम्हाला एक क्विंटल अधिकची लाकडे घ्यावी लागतील’, असा स्मशानजोगीचा धोशा होता. अखेर नाइलाजास्तव नातलगांनी तेही पैसे माेजले. अन‌् सकाळी आठ वाजता मृत्यू झालेल्या बाबाराव चिलगर यांच्यावर सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार झाले!

महसूल विभागाच्या ऑडिटर्सचे ‘वरातीमागून घाेडे’
पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिकाही आली होती. आता स्मशानभूमीकडे निघायचे, तेवढ्यात महसूलचे ऑडिटर आले व तक्रारीबाबत विचारणा केली. मात्र, ‘आम्ही बिल भरले, अाता तक्रार नाही’ असे नातेवाइकांनी सांगितले. तरीही अाॅडिटरने बिल पाहिले अन‌् म्हणाले, ‘उगीच बिल भरण्याची घाई केली. रुग्णालयाने बिलात पैसे जास्त लावले. अाणखी १७ हजार कमी झाले असते,’ असे सांगून ऑडिटर रुग्णालयात गेले. मात्र, आता बिल तर भरले, अन‌् वेळ वाया चालला म्हणून वैतागलेले नातलग ‘अाणखी झंझट नकाे’ म्हणून अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले.

काेराेनाचा पहिला बळी ५ एप्रिल राेजी गेला, त्याला एक वर्ष पूर्ण झाले अाहे. एकूण बळींचा विचार करता ५ एप्रिल ते एक मार्च या ११ महिन्यांत जिल्ह्यात १२७१ बळी गेल्याची नाेंद अाहे. मात्र नंतरच्या फक्त ४० दिवसांतच त्यापेक्षा निम्मे म्हणजे ६८१ जणांचे मृत्यू झाले. घाटीतच सर्वाधिक मृत्यूची झालेत. त्यातही मार्च महिना फारच वाईट ठरला. या महिन्यात घाटीत १८१६ रुग्ण भरती हाेते. पैकी ८०३ बरे झाले तर ३४९ जणांचा मृत्यू झाला. २९ मार्च रोजी ३५ जणांचे मृत्यू या एकाच रुग्णालयात झाले. २२ आणि २३ मार्च रोजी सलग दोन दिवस २३ मृत्यूची नाेंद झाली. काेराेनाचे ११ महिन्यांत १२७१ मृत्यू, पुढील ४० दिवसांतच ६८१ बळी

बातम्या आणखी आहेत...