आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भयावह स्थिती:रेमडेसिविरचा जिल्ह्यातील साठा संपला; ‘एफडीए’ नॉट रिचेबल; खासगी हॉस्पिटल, मेडिकल चालक, नातेवाइकांची धावाधाव

औरंगाबाद13 दिवसांपूर्वीलेखक: नामदेव खेडकर
  • कॉपी लिंक
  • शहरातील 85 रुग्णालयांना मिळाले नाही इंजेक्शन

अतिगंभीर कोरोना रुग्णांना लवकर बरे होण्यास उपयुक्त असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यातील पूर्ण साठा संपला. हॉस्पिटलसह मेडिकल चालक आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी शनिवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय व अन्यत्र धावाधाव केली. मात्र, हे इंजेक्शन मिळालेच नाही. जवळपास ७०० रुग्णांचा रेमडेसिविरचा ‘मेंटेनन्स डोस’ हुकल्याने त्यांची प्रकृती बरी होण्यास उशीर लागू शकतो. एकीकडे ही परिस्थिती असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थापन केलेल्या कक्षाचे कर्मचारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे सर्वच अधिकारी ‘नॉट रिचेबल’ होते. केवळ सकाळी व्हॉट्स अॅप ग्रुपवर ‘आज साठा संपला आहे, कुणीही जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ नये, नवा स्टॉक आल्यावर कळवू,’ एवढा मेसेज टाकून औषध निरीक्षकांनी फोन बंद केला.

मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात रेमडेसिविरचा तुटवडा सुरू आहे. गुरुवारी ९६०, तर शुक्रवारी २०० व्हायल मिळाल्या. शनिवारी एकही व्हायल मिळाली नाही. त्यामुळे ज्या रुग्णांना ‘लोडिंग डोस’ दिलेले आहेत त्यांचे पुढील मेंटेनन्स डोस हुकले. शनिवारी फक्त घाटी, एमजीएम, धूत, बजाज, सुमनांजली, सिटी केअर या रुग्णालयांतच रेमडेसिविर उपलब्ध होते. बाकीच्या ८५ रुग्णालयांना एकही इंजेक्शन मिळू शकले नाही.

रुग्णांच्या फाइल घेऊन २० जण जिल्हाधिकारी कार्यालयात
जिल्हाधिकारी कार्यालयाने रेमडेसिविर नियंत्रण कक्ष स्थापन केला असून येथे जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक आणि औषध निरीक्षक नेमलेले आहेत. या कक्षाने जिल्हाभरातील कोविड रुग्णालये आणि मेडिकल चालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवलेला आहे. या ग्रुपवर सकाळीच औषध निरीक्षक बजाज यांनी ‘आज रेमडेसिविरचा स्टॉक नाही, त्यामुळे कुणीही येऊ नये. नवीन स्टॉक आल्यावर कळवू,’ असा हा मेसेज टाकला. तरीही रेमडेसिविर मिळेल या आशेने जवळपास २० जण रुग्णांच्या फायली घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. आलेल्या एकाचाही अर्ज नियंत्रण कक्षाने स्वीकारला नाही. ‘जेव्हा स्टॉक येईल तेव्हाच अर्ज स्वीकारू, तुम्ही आता निघून जा,’ असे कक्षातील कर्मचारी प्रत्येकाला सांगत होते. मात्र, तरीही आलेले लोक आशेने दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले. परंतु, सायंकाळपर्यंत थांबूनही पदरी निराशाच आल्याने माघारी फिरले.

उशिरा स्टाॅक येण्याच्या आशेने तरुण थांबला
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सिल्लोड येथील मेडिकल चालक साई ढसाळ हा विशीतला तरुण थांबला होता. तो म्हणाला, ‘मी सकाळी १० वाजताच आलाे. नियंत्रण कक्षाने आज स्टॉक नसल्याचे सांगितले. पण, काल जसा उशिरा स्टॉक आला तसा आजही येईल या आशेने थांबलोय. जर उशिरा स्टॉक आला तर पुन्हा सिल्लोडवरून येण्यापेक्षा इथेच बसतो,’ असे त्याने सांगितले.

पुढाऱ्यांना फाेन करूनही उपयाेग नाही
जिल्हाधिकारी कार्यालयात काही नातेवाईकदेखील आले होते. काहीही करून रेमडेसिविर द्या, अशी विनवणी करत होते. मात्र, स्टॉकच नाही, आम्ही कुठून देणार, असे त्यांना सांगण्यात येत होते. काही जण परजिल्ह्यांतील ओळखीच्या व्यक्तींना, राजकीय पुढाऱ्यांनाही फोन करत होते. मात्र, कुठेच इंजेक्शन उपलब्ध नसल्याने आल्यापावली जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.

आमच्या हाती रेमडेसिविर हेच एकमेव आयुध
रेमडेसिविरने रुग्णाचा जीव वाचतो असे काही संशोधन नाही. मात्र, आमच्या हाती कोरोनावर इलाज करण्यासाठी दुसरे काहीही औषध नाही. रेमडेसिविरने रुग्ण लवकर बरा होतो हे माझे निरीक्षण आहे. रेमडेसिविर संपल्याने अतिगंभीर रुग्णांना बरे होण्यास वेळ लागेल. रेमडेसिविरचा परिपूर्ण डोस मिळाला असता तर रुग्ण लवकर बरे झाले असते. - डॉ. संजय पटणे, जेजे हॉस्पिटल

डोस पूर्ण होणे आवश्यक
रेमडेसिविर हे अँटिव्हायरल ड्रग आहे. डब्ल्यूएचओने कोरोनासाठी हे इंजेक्शन्स तितके प्रभावी नसल्याचे म्हटले आहे. मात्र, भारतात या इंजेक्शन्सचा आऊटकम चांगला आढळतोय. संसर्ग कमी करण्यास उपयुक्त ठरत आहे. या इंजेक्शनचे रुग्णाला एकूण सहा डोस आवश्यक असतात. त्यात पहिल्या दिवशी ‘लोडिंग डोस’ म्हणजे एकाच वेळी दोन इंजेक्शन्स द्यावे लागतात, तर पुढील सलग चार दिवस ‘मेंटेनन्स डोस’ म्हणून रोज एक याप्रमाणे द्यावे लागतात. जर लोडिंग डोस दिला आणि मेंटेनन्स डोसमध्ये खंड पडला तर संसर्ग तातडीने आटोक्यात येत नाही. अतिगंभीर रुग्णांसाठी रेमडेसिविर हे एक महत्त्वाचे औषध आहे. आता तुटवड्यामुळे मेंटेनन्स डोस हुकल्याने रुग्ण बरे होण्यास जास्त काळ लागेल. - डॉ. नारायण सानप, सानप हॉस्पिटल

मागणी २७०० व्हायलची, आल्या केवळ ९३
शनिवारी रेमडेसिविरच्या २७०० व्हायलची मागणी असताना केवळ ९३ अाल्या. मात्र, इंजेक्शनचे वाटप करण्यात आले नाही, असे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी सांगितले. रुग्ण गंभीर असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी एमजीएमने इंजेक्शनची मागणी केली होती. त्यांना यातील २५ इंजेक्शन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...