आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेराेना:औरंगाबादेत ‘लपवले’ल्या 12 काेराेना बळींची अचानक नाेंद, गुरुवारी 108 रुग्ण, दाेन मृत्यू; एकूण मृतांचा आकडा वाढवला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधीचे आकडे अपडेट नव्हते : जिल्हाधिकारी

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात काेराेना रुग्णांची व मृतांची संख्या हळूहळू कमी हाेत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला हाेता. प्रशासनाच्या आकडेवारीवर विश्वास ठेवत संसर्गाची तीव्रता कमी हाेत असल्याचे समाधानही अनेकांनी करून घातले. मात्र प्रशासन दरराेज जाहीर करत असलेल्या रुग्णांच्या आकडेवारीत दाेन दिवसांपासून घाेळ घातला जात आहे. दाेन दिवसांपूर्वी एकूण अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा लपवला हाेता. आता गुरुवारी मृतांची एकूण संख्या अचानक १२ ने वाढवण्यात आली. त्यामुळे या आकडेवारीवरच आता संशय व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४०,८४७ झाली. मंगळवारी जिल्ह्यात एकूण बळींचा आकडा १०७८ हाेता. त्यात बुधवारी ७ तर गुरुवारी २ मृत्यू वाढले. दाेन दिवसांचे हे नऊ मृत्यू गृहीत धरले तर एकूण बळींची संख्या १०८७ हाेणे अपेक्षित हाेते. मात्र बळींचा आकडा १०९९ दाखवला. हे वाढीव १२ बळी आले कुठून, असा प्रश्न आहे. याबाबत आराेग्य खाते, मनपाच्या आराेग्य अधिकारी यांच्याकडे ‘दिव्य मराठी’ने विचारणा केली असता यापैकी एकही अधिकारी उत्तर देऊ शकला नाही. दाेन दिवसांपूर्वी प्रशासनाने याच पद्धतीने डिस्चार्ज आणि अॅक्टिव्ह रुग्ण यांची आकडेवारीही लपवण्याचा प्रयत्न केला हाेता. आता तिसऱ्या दिवशी बळींच्या आकड्यात तफावत आल्याने काहीतरी ‘गाैडबंगाल’ असल्याचा संशय व्यक्त हाेत आहे.

५० जण काेराेनामुक्त, ७०८ रुग्णांवर उपचार
दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातील ५० रुग्ण काेराेनामुक्त झाले. त्यामुळे आता एकूण काेराेनामुक्तांची संख्या ३९,०४० झाली. सध्या ७०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी मृत्यू झालेल्या दाेन रुग्णांमध्ये पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील ८० वर्षीय पुरुष आणि सातारा परिसरातील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

आधीचे आकडे अपडेट नव्हते : जिल्हाधिकारी
रुग्णांचे काही आकडे पोर्टलवर अपडेट नव्हते. अनेक ठिकाणांवरून डाटा अपडेट केला जात आहे. आढावा घेऊन प्रशासनाने आता ही आकडेवारी दिली आहे. त्यामुळे १०९९ बळी हा आकडा बराेबर आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. मात्र हे वाढीव १२ मृत्यू कुठले आणि कधीचे हे त्यांनाही सांगता आले नाही.