आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:24 तास आरोग्यसेवेने घाटीतील नर्सही थकल्या; फक्त तिघींवर 50 रुग्णांच्या सेवेचा भार

औरंगाबाद16 दिवसांपूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक
  • आपत्तीमुळे कुणालाही रजा देत नाही. केवळ वैद्यकीय कारण आणि गरोदर माता असेल तरच सुटी मिळते.

घाटीत गेल्या वर्षभरात काेराेना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली अाहे. त्या तुलनेत नर्सची संख्या कमी अाहे. त्यामुळे सध्या कार्यरत नर्सेसवर कामाचा ताण वाढला अाहे. सलग सहा तास पीपीई किटमध्ये राहावे लागत असल्याने असह्य उकाडा सहन करावा लागताे. किमान ४० ते ५० इंजेक्शन द्यावे लागतात. त्यामुळे कधी एकदाची ड्यूटी संपवून घरी जाऊन पाठ टेकवते, असे वाटते... हा अनुभव माधुरी नागरगोजे, ब्रदर प्रवीण गायकवाड अशा अनेक जणांचा अाहे.

वर्षभरापासून सतत काम करत असल्याने अाराेग्य कर्मचाऱ्यांवर शारीरिक, मानसिक ताण येताे. घाटीत सध्या ७५० बेड आहेत. गेल्या वर्षभरात ११,२०६ रुग्ण भरती झाले. यातील ६,३२५ पॉझिटिव्ह होते. मेडिसिन विभाग, सुपरस्पेशालिटी, नेफ्रॉलॉजी आणि इतर वाॅर्डात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू अाहेत. सध्या ५० बेडसाठी एका शिफ्टमध्ये तीन ते चार नर्स तर आयसीयूमध्ये पाच बेडमागे एका नर्सला काम करावे लागते, अशी माहिती अधिसेविका विमल केदारे यांनी दिली. इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या धोरणानुसार तीन बेडमागे एक नर्स असणे आवश्यक आहे.

आयसीयू बेडमध्ये नियमानुसार एका रुग्णामागे एक नर्स असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या चार ते पाच रुग्णांमागे एक नर्स काम करत आहे. घाटीत १२० आयसीयू बेड आहेत. गेल्या वर्षभरात २५० नर्सना काेराेनाची बाधा झाली. सध्या १४ जणी पॉझिटिव्ह अाहेत. रुग्णसेवा करताना मागील वर्षभरात २५० जणी कोरोना पाॅझिटिव्ह, पाच आयसीयू रुग्णांमागे फक्त एक नर्स; संख्या वाढवण्याची मागणी

वर्षभरात सुट्याही रद्द
केदारे म्हणाल्या, गेल्या वर्षभरात सर्व अर्जित रजा रद्द केल्या आहेत. आपत्तीमुळे कुणालाही रजा देत नाही. केवळ वैद्यकीय कारण आणि गरोदर माता असेल तरच सुटी मिळते. सध्या कायमस्वरूपी ६९४ नर्स आहेत. त्यापैकी आठवड्याची सुटी, अाजारी रजा गृहीत धरल्यास रोज सहाशे नर्स काम करतात. सध्या १५० कंत्राटी नर्सची नियुक्ती करण्यात अाली अाहे.

रुग्णांना जेवणही भरवावे लागते
सध्या एक नर्स दररोज किमान ४० ते ५० इंजेक्शन देते. तसेच रुग्णाला गोळ्या, त्यांच्या जेवणाकडे लक्ष द्यावे लागते. गंभीर रुग्णाला जेवता येत नाही. तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेल्यांना नाकाच्या नळीतून लिक्विड स्वरूपात जेवण द्यावे लागते.

नर्सची पदभरती तातडीने करावी
रुग्ण वाढत असल्याने कामाचा ताण वाढला अाहे. त्यामुळे नर्सची पदभरती तातडीने करावी. म्हणजे रुग्णसेवा करताना ताण कमी हाेईल. - विमल केदारे, अधिसेविका, घाटी

कंत्राटी तत्त्वावर नर्सची भरती
नर्सची संख्या कमी असल्याने आम्ही कंत्राटी तत्त्वावर नर्सची भरती करत अाहाेत. पहिल्या दोन टप्प्यांत १४७ नर्स घेतल्या. अाणखी नर्सची भरती केली जाईल. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

बातम्या आणखी आहेत...