आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिलासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह रोखला:बिलासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह रोखला; आधी 1 लाख मागितले, नंतर 40 हजार रुपयांत तडजोड; नातेवाइकांचा आरोप

वाळूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 49 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषावर बजाजनगरातील ममता हॉस्पिटलमध्ये 3 मेपासून उपचार सुरू होते.

सिडको वाळूज महानगरातील ४९ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषावर बजाजनगरातील ममता हॉस्पिटलमध्ये ३ मेपासून उपचार सुरू होते. २४ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर बिल न भरल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह देण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. तर बिल भरून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक पुढे न आल्याने विलंब झाल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. या प्रकरणात स्थानिक नेते व पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर सायंकाळी नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले.

कोरोनाची लागण झाल्याने रुग्णास नातेवाइकांनी ममता मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ३ मे रोजी दाखल केले. रुग्णाचे सीटी स्कॅन केल्यानंतर स्कोअर २१ आला होता. पहिल्या दिवसापासूनच त्रास सुरू असल्याने त्यास अाधी ऑक्सिजनवर व नंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सलग २१ दिवस उपचार करूनही सोमवारी दुपारी ११.५९ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईक व हॉस्पिटल प्रशासनामध्ये थकीत १ लाख १९ हजार रुपयांच्या बिलापोटी शाब्दिक चकमक उडण्यास सुरुवात झाली. मृताचे नातेवाईक, मित्रांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वीय सहायकास फोन करून याची माहिती दिली होती. त्यानंतर १ लाख १९ हजार रुपयांचे बिल कमी करून ८० हजार करण्यात आले. ही रक्कमसुद्धा भरण्यासाठी नातेवाइकांनी असमर्थता दर्शवली.

थोड्याच वेळात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या फौजदार प्रीती फड, सहायक फौजदार रामदास गाडेकर आदींनी रुग्णालयात धाव घेतली. बिल भरण्यास पुरेसे पैसे नव्हते तर रुग्णाला शासकीय रुग्णालयात का हलवले नाही, अशी विचारणा फड यांनी केली. मृतदेह देण्यास नकार दिला व त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद डॉ. सुदाम चव्हाण यांना दिली. अखेर बजाजनगर-वडगाव कोल्हाटीचे सरपंच सचिन गरड, भगवान ढेरंगे, भाऊसाहेब पवार आदींनी पुढाकार घेतला. शेवटी नातेवाइकांनी ४० हजार रुपये भरण्याची तयारी दर्शवल्यानंतर प्रकरण निवळले.

नियमानुसार बिल अाकारले
बिल भरण्याची परिस्थिती असूनही रुग्णांचे नातेवाईक व मित्रांनी राजकारणी व पोलिसांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार बिल घेतले. असे प्रकार घडत असतील तर गंभीर आजारी रुग्णांवर उपचार कसे करावेत? - डॉ. सुदाम चव्हाण

बातम्या आणखी आहेत...