आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोनामुळे आमच्या संसाराला दृष्ट, तुम्ही जबाबदारीने वागा; लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांत कोरोना संसर्गामुळे पती गमवावा लागलेल्या आयेशाची आर्त हाक

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमची मुलं पाेरकी झाली, इतरांवर ही वेळ येऊ नये

गोळेगावसारख्या छोट्या गावातून ११ वर्षांपूर्वी अस्लम शहा पत्नीसह औरंगाबादेत आले. चार वर्षांचा अली आणि १० महिन्यांचा माझ अशी दोन गोंडस मुले त्यांच्या संसाराच्या वेलीवर फुलली. ‘जुबेर भाई मैने एक घर देखा है. ३५ लाख का है. कर्जा निकाल के ले लेंगे…घर बहोत अच्छा है.’ असे भावाला सांगत अस्लमने स्वत:च्या घराची स्वप्नेही पाहिली. पण, नियतीला ते मंजूर नव्हते. कोरोनाने झडप घालून अस्लमला हिरावून नेले. त्यांची सगळी स्वप्ने अपुरी राहिली... आमच्या वाट्याला हे भीषण दुःख आलं. पण, आता आणखी संसार अर्ध्यावर राहू नयेत म्हणून सगळ्यांनी कोरोना नियमांचे पालन करा, अशी विनवणी २५ वर्षीय आयेशा अस्लम शहा हिने औरंगाबादकरांना केली आहे.

गेली ११ वर्ष स्टरलाइट कंपनीत काम करत असलेल्या अस्लम शहा (२९ वर्षे) याने एमजीएम रुग्णालयात १७ मे रोजी रात्री १ वाजून २० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. अस्लमप्रमाणेच अनेक तरुणांची दुसऱ्या लाटेत कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. ४५ वयाच्या आतील २३६ जणांनी जीव गमावला. अनेकांची मुले दहा वर्षांच्या आतील आहेत. यापैकी अनेकांनी नुकतीच घरे घेतली हाेती, त्याचे हप्ते सुरू आहेत.

अस्लमचे भाऊ जुबेर शहा सांगत होते की, ‘अस्लमच्या उपचारासाठी ९ लाखांचा खर्च झाला. कर्ज घेऊन हा खर्च भागवण्यात आला. काहीही करून अस्लमला वाचवायचे होते. पण, अवघ्या १५ दिवसांत होत्याचे नव्हते झाले. २ मे रोजी पहिल्यांदा अस्लमला त्रास जाणवला. लगेचच अँटिजन चाचणी केली. निगेटिव्ह आली, त्यामुळे निश्चिंत झालो. ईदनिमित्त अस्लमने सुटी टाकली होती. त्यामुळे तो गोळेगावला आला. ईद आटोपली की नवीन घर घेण्याचे फायनल करू अशी चर्चा झाली. पण ४ मे रोजी त्रास वाढला. मग सिल्लोडला अॅडमिट केले. मात्र, तब्येत आणखी खालावली म्हणून ६ मे रोजी औरंगाबादेत हलवले.

रात्रभर फिरून एकाही खासगी रुग्णालयाने अॅडमिट करून घेतले नाही. शेवटी घाटीत दाखल केले. दोन दिवस उपचार घेतल्यावर एमजीएम रुग्णालयात जागा झाल्याचे कळले. मग, तिथे नेले. ताे व्हेंटिलेटरवर होता. दररोज मृत्यूशी झुंज देत हाेता. मात्र हा लढा १७ मे रोजी थांबला.’ आयेशा म्हणाल्या, ‘मुलं लहान आहेत. उपचारात खूप मोठा खर्च झाला. कर्जही झाले. अनेक स्वप्नं आम्ही पाहिली होती. फक्त १५ दिवसांत सगळे हाेत्याचे नव्हते झाले.’ दाेन्ही मुलांसाेबत अस्लम शहा

आमची मुलं पाेरकी झाली, इतरांवर ही वेळ येऊ नये
अनलॉक झाल्यावर लोक बाजारात मुक्तपणे फिरू लागतात. औरंगाबादच्या रस्त्यावर तर जत्रा भरावी तशी गर्दी दिसते आहे. आता जर काळजी घेतली नाही, पथ्य पाळले नाही तर संकट भीषण होईल. आम्ही आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गमावला. आमची पोरं पोरकी झाली. तरुण विधवांवर उदरनिर्वाहाचा भार आणि कर्जाचे डोंगर उभे राहिले आहे. यातून सर्वांनी धडा घ्यावा. आता तरी सावरावे. अनलॉक झाले तर नियमांचे काटेकोर पालन करा. स्वतः सुरक्षित राहा, परिवाराला सुरक्षित करा...’ असे अश्रूंचे बांध राेखण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आयेशा काळजीच्या सुरात सर्व औरंगाबादकरांना सांगत हाेती.

बातम्या आणखी आहेत...