आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा विळखा:14 महिन्यांत जिल्ह्यात 18 वर्षांखालील 9,116 मुलांना बाधा, 14 जणांचा मृत्यू; तिसऱ्या लाटेसाठी शहरात सरकारी, खासगी रुग्णालयांत 1 हजार बेडची तयारी

औरंगाबाद16 दिवसांपूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक
  • तज्ज्ञ म्हणाले : पालकांकडूनच मुलांना संसर्ग होईल, काळजी घेतल्यास कमी बाधा

मार्च २०२० पासून औरंगाबाद शहर, जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. तेव्हापासून मे २०२१ अखेर म्हणजे १४ महिन्यांत १८ वर्षांखालील ९१६६ मुलांना कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यात त्यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला. त्यातील किती जण औरंगाबाद शहरातील आहेत, याची आकडेवारी आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध नाही. दरम्यान, तिसऱ्या लाटेत मुलांभोवती कोरोनाचा विळखा वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने औरंगाबादमध्ये सरकारी, खासगी रुग्णालयांत एक हजार बेडची तयारी सुरू आहे. दरम्यान, पालकांकडूनच मुलांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आई-वडिलांनी पूर्ण काळजी घेतली तर कमीत कमी मुलांना बाधा होईल.

घाटी रुग्णालयात आत्तापर्यंत ११० कोरोनाबाधित मुलांवर उपचार झाले. त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला. ते औरंगाबादशिवाय इतर जिल्ह्यांतीलही होते. १४ महिन्यांत प्रसूती झालेल्या २१० बाधित मातांच्या अर्भकांची तपासणी झाली. तेव्हा १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. जन्मल्यानंतर २४ तासात अँटिजन चाचणी केली जाते. त्यात निगेटिव्ह आल्यावर पाचव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी होते, असे घाटीतील नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.

गरवारे, घाटीत तयारी सुरू
तिसऱ्या लाटेसाठी लहान मुलांकरिता घाटीत ५० बेडची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये न्यूओनेटॉलाजीमध्ये दहा बेड करण्यात येणार आहेत. तर सुपरस्पेशालिटीमध्ये २० बेडचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. आयसीयूचे २० बेड तयार करण्यात येणार आहेत, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. गरवारे कंपनीमध्ये गरवारे कंपनीच्या आवारात लहान मुलांची मानसिकता लक्षात घेऊन १०० ते १५० बेडचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात येत आहे. ऑक्सिजन प्रकल्पही उभारला जाईल, अशी माहिती गरवारेचे प्रेसिडेंट (ऑपरेशन ) श्रीकृष्ण आमलेकर यांनी दिली. याशिवाय एमजीएमध्ये ६० बेड तयार करण्यात येत आहेत. त्यातील २० आयसीयू असतील, असे बालरोग विभागप्रमुख डॉ. विनोद इंगळे यांनी सांगितले.

शहरातील रुग्णांची स्थिती
वयोगट बाधित
० ते ५ १३८८
५ ते १८ ७७७८
१८ ते ५० ५२५२१
५० प्लस २४४७८
एकूण ८६१६५

पाच वर्षांच्या आतील १३८८ मुले सापडली विळख्यात
औरंगाबादमध्ये एक जूनपर्यंत ८६१६५ लोक बाधित झाले. त्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील १३८८ तर ५ ते १८ वयोगटात ७७७८ मुले बाधित झाली. यातील ८० टक्के दुसऱ्या लाटेतील असावीत, असा प्राथमिक अंदाज आहे.

पालकांना होऊ शकते बाधा
घाटीच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेत केवळ बालकांनाच कोरोना होणार, अशी चर्चा होत आहे. मात्र, हा फक्त अंदाज आहे. या लाटेत मुलांसोबत पालकांनाही बाधा होऊ शकते. पालकांकडून मुलांना संसर्ग होईल, हे गांभीर्याने समजून घेतले पाहिजे. मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे अशा सवयी लावल्या पाहिजेत. डॉ. इंगळे यांच्या मते मुलांनाच कोरोना होईल याला कुठलाही आधार नसून त्याबाबत मतांतरे आहेत. मुलांना लस नसल्यामुळे ते बाधित होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पालकांनी सुरक्षा पाळली तर कमीत कमी मुले बाधित होऊ शकतात.

मेल्ट्रॉन, जिल्हा रुग्णालय, घाटीत ३०० बेडची व्यवस्था
मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, मेल्ट्रॉन, जिल्हा रुग्णालय, घाटीत मिळून ३०० बेडची व्यवस्था होत आहे. खासगी आणि सरकारी यंत्रणेद्वारे एक हजार बेड तयार होतील.

पालकांनी लस घ्यावी
तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, लहान मुले असलेल्या १८ ते ४५ वयोगटातील पालकांनी लसीकरण करून घ्यावे. ताप आल्यानंतर मुलाला लगेच दवाखान्यात दाखवणे गरजेचे आहे. डॉ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख घाटी

लस नसल्यामुळे परिणाम
तिसऱ्या लाटेत मुलांना खूप मोठी बाधा होणार याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. लहान मुलांना लस नाही. तसेच गरोदर, स्तनदा मातांना लस घेता येत नाही. त्यामुळे लहान मुले बाधित होऊ शकतात, असा केवळ अंदाज आहे. दुसऱ्या लाटेत बाधित मुलांमध्ये कोरोनानंतरची लक्षणे पाहायला मिळाली. एल. एस. देशमुख, नवजात शिशू विभागप्रमुख, घाटी

गर्दीत जाणे टाळावे
अनलॉकचा पहिला टप्पा सुरू होताच लोकांनी बाजारात तुफान गर्दी सुरू केली आहे. ती टाळली पाहिजे. कारण पालकांकडूनच मुलांना संसर्ग होऊ शकतो. डॉ. नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...