आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांना ‘मीस’चा धोका:लहान मुलांवर उपचारासाठी तयारी, रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांवर; कोरोनातून बरे झालेल्या १३ मुलांना ‘मीस’ने ग्रासले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक
  • घाबरू नका... 2 महिन्यांत 100 जणांना बाधा, सुदैवाने एकही जण दगावला नाही

कोरोना होऊन गेलेल्या लहान मुलांना मल्टिसिस्टिम इफ्लेमॅटरी सिंड्रोम (मीस) आजाराची लागण होत आहे. सध्या १३ जण घाटीत दाखल आहेत. दोन महिन्यांत या आजाराने ग्रासलेल्या १०० मुलांवर शहराच्या विविध रुग्णालयांत उपचार झाले. सुदैवाने एकही जण दगावला नाही. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९३.६२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे दुसरी लाट नियंत्रणामध्ये येण्याची चिन्हे आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेत मुलांना धोका असल्याची भीती व्यक्त हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लहानांच्या उपचारात महत्त्वाच्या असलेल्या इम्युनोग्लोबिलिन औषधाची जमवाजमव होत आहे.

कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा झाला. त्याचा फायदा घेत अनेकांनी काळाबाजार केला. एका इंजेक्शनची किंमत २५ ते ३५ हजार रुपयांपर्यंत गेली. याच काळात कोरोना रुग्णांवर म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने हल्ला केला. त्यावर उपचारासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या अॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचाही सध्या तुटवडा आहे. त्याच्याही किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांसाठी औषधींची कमतरता पडू नये असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. बालरोगतज्ज्ञांनी सांगितल्यानुसार इम्युनोग्लोबिलिन औषधीचा साठा मिळवण्यासाठी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आखणी सुरू केली आहे. अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळेंनी या औषधीचा साठा असून पुढील काळासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती दिली.

उपचारात इम्युनोग्लोबिलिन प्रभावी
बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खडके म्हणाले की, सर्वच रुग्णालयात मीसचे दोन ते तीन रुग्ण दाखल होत आहेत. दोन महिन्यांत सुमारे शंभर जणांवर उपचार झाले. यात आयव्ही इम्युनोग्लोबिलिन उपयुक्त ठरते. एक किलो वजनाच्या मुलासाठी दोन ग्रॅम इंजेक्शन लागते. एक ग्रॅम इंजेक्शनची किंमत १५०० रु. आहे. ते एकदाच द्यावे लागते. सध्या ते उपलब्ध आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत तुटवडा पडू नये याची आताच काळजी घ्यावी लागेल. एमजीएमचे बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद इंगळे म्हणाले, ‘अामच्या रुग्णालयात सध्या पाच मुलांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २५ जणांवर उपचार झाले.’

एक टक्का मुलांमध्ये शक्यता
घाटी बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितले की, कोरोना होऊन गेलेल्या मुलांमध्ये मीस (मल्टिसिस्टिम इफ्लेमॅटरी सिंड्रोम) नावाचा आजार आढळत आहे. केवळ एका टक्का मुलांना हा धोका आहे. यात दुसऱ्या आठवड्यापासून ते तीन महिन्यांपर्यंत केव्हाही इम्युनोग्लोबिलिन इंजेक्शनची गरज पडू शकते.

५० पेक्षा अधिक खाटा असतील तर ऑक्सिजन निर्मिती बंधनकारक करा

  • जिल्हाधिकारी कार्यालय साेमवारी झालेल्या लाेकप्रतिनिधींच्या अाढावा बैठकीत आमदार अतुल सावेंनी यांनी ५० पेक्षा अधिक खाटांच्या रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करणे बंधनकारक करावे अशी सूचना केली. आमदार हरिभाऊ बागडे, प्रा. रमेश बोरनारेंनी लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा जास्तीत जास्त उपयोग करावा. गर्दी हाेणाऱ्या विवाह समारंभांवर पोलिसांनी नजर ठेवावी, अशी सूचना केली.
  • अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणेंनी सांगितले की, बाधिताचा दर १२.८५, तर मृत्युदर २.१८ टक्के आहे. म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी अॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन पुरेसे मिळावेत अशी मागणी रोज राज्य शासनाकडे केली जात आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय म्हणाले की, गरवारे कंपनीच्या मदतीने लहान मुलांसाठी कोविड सेंटर सुरू होत असून मनपाच्या बालरोगतज्ज्ञांना घाटीत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे, तर ग्रामीण भागात पालक, मुलांमध्ये व्हिडिओद्वारे जनजागृतीचे नियोजन सुरू असल्याची माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावलेंनी दिली.

अॅम्फोटेरिसिनचे 80 इंजेक्शन आलेच नाहीत
म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारात प्रभावी ठरणाऱ्या अॅम्फोटेरिसिन या इंजेक्शन्सचा सध्य माेठ्या प्रमाणावर तुटवडा भासत अाहे. औरंगाबादला सोमवारी हे ८० इंजेक्शन मिळणार हाेते. त्याचे वाटप करण्याची तयारी संध्याकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाने केली हाेती. मात्र, रात्री उशिरापर्यंत हे ८० इंजेक्शन आलेच नाहीत. त्यामुळे अाता मंगळवारी त्याचे वाटप करण्यात येणार अाहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ही आहेत मीस आजाराची लक्षणे
घाटी बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितले की, काेरोना हाेऊन गेल्यानंतर काही लहान मुलांमध्ये इतर अाजाराचे लक्षणे दिसून येत अाहेत. त्यात डोळे लाल होणे, अंगावर सूज, पूरळ येणे, तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असल्यास ‘मीस’ अाजार असण्याची शक्यता असते. अशा वेळी हे अाजार अंगावर न काढता पालकांनी अापल्या मुलांना तत्काळ डॉक्टरांना दाखवावे. त्यांना मास्क घालून डिस्टन्सिंग पाळण्यास सांगावे.’

बातम्या आणखी आहेत...