आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्सिजन आणीबाणी:शंभर रुग्णांचे जीव टांगणीला; नातेवाइकांची धावाधाव, दोन खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन संपला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गंभीर अवस्थेतील रुग्ण हलवण्याच्या सूचना, इतरत्रही मिळेना बेड
  • रोकडिया हनुमान कॉलनीतील कृष्णा हॉस्पिटलच्या बाहेर सोमवारी रात्री उशीरापर्यंत रुग्णांचे चिंताग्रस्त नातलग उभे होते.

काेराेनाच्या विळख्यात अडकलेल्या अाैरंगाबादमध्ये अाॅक्सिजनचा माेठा तुटवडा अाहे. साेमवारी राेकडिया हनुमान काॅलनीतील कृष्णा व सिडकाेतील मेडिकव्हर या रुग्णालयांतील अाॅक्सिजन या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने येथील रुग्ण स्थलांतरित करावे, असे बाेर्डच दुपारी लावले. त्यामुळे रुग्णांचे नातलग हवालदिल झालेे. सरकारी, खासगी रुग्णालयांचे त्यांनी उंबरठे झिजवले. मात्र कुठेही बेड शिल्लक नव्हता. त्यामुळे या सर्वांचे जीव टांगणीला लागलेे. अखेर रात्री उशिरा दाेन्ही रुग्णालयांत थाेडासा अाॅक्सिजन साठा उपलब्ध झाला. मात्र ताे सकाळपर्यंतच पुरेल, असा अंदाज असल्याने मंगळवारीही पुन्हा हे संकट उद‌्भवण्याची शक्यता अाहेच.

कृष्णा व मेडिकल हाॅस्पिटलमध्ये प्रत्येकी ५० काेराेनाग्रस्त रुग्ण अाॅक्सिजनवर अाहेत. सोमवारी सायंकाळी या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर व्यवस्थापनाच्या वतीने ‘ऑक्सिजन संपत आला आहे, आपल्या रुग्णांना दुसरीकडे हलवा’ अशी नोटीस लावण्यात अाली. अाधीच नातलगांच्या प्रकृतीच्या काळजीत असलेले नातलग या नाेटिसीमुळे अधिकच चिंतेत पडले. रुग्णालयासमाेर ते जमा झाले. इतर रुग्णालयांत कुठे अाॅक्सिजन बेड मिळताे का, याचीही चाचपणी केली. मात्र सर्वत्र बेड फुल्ल असल्याने त्यांची निराशा झाली. कृष्णा हाॅस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप बेंजरगे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटले. ऑक्सिजन पुरवठादाराशीही ते संपर्कात होते. मात्र, संध्याकाळपर्यंत तोडगा निघाला नाही. शिवसेना आमदार अंबादास दानवेंनीही रुग्णालयात जाऊन डाॅक्टरांशी चर्चा केली व ऑक्सिजन मिळेल असे आश्वासन दिले. रात्री दाेन्ही रुग्णालयांना थाेडासा अाॅक्सिजन पुरवठा झाला. मात्र ताे मंगळवारपर्यंत पुरेल इतकाच असल्याने रुग्णांसमाेरील अडचणी कायम हाेत्या.

कुठेच मिळाला नाही बेड
माझी भावजयी सहा दिवसांपासून कृष्णा हाॅस्पिटलमध्ये अाहे. दुपारी अचानक आम्हाला फोन करून ऑक्सिजन संपणार असल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून आम्ही अनेक रुग्णालयांत बेडसाठी फिरलाे, मात्र कुठेच जागा नाही. काय करावे कळतच नाही. -भगवान जगताप, रुग्णाचे नातेवाईक

लसीचीही अाणीबाणी : कोविशील्डचे फक्त १२०० डाेस
शहरात लसीचाही तुटवडा जाणवत आहे. सोमवारी दिवसभरात ६,३८० लसीकरण झाले. त्यामुळे मनपाकडे अाता कोविशील्डच्या फक्त १२०० तर काेव्हॅक्सिनच्या ५ हजार लसी शिल्लक आहेत. काेविशील्डचा साठा एक दिवसही पुरणार नाही. गेल्या आठवड्यात एक लाख लसींची मागणी केली होती, पण ५० हजार डोस मिळाले, ते संपत आहेत. मनपाकडून कोविशील्ड लसच दिली जाते, त्यामुळे काेव्हॅक्सिनचा साठा असला तरी त्याचा उपयाेग करता येणार नाही. मंगळवारी काेवीशील्डचे डाेस संपतील. नवीन डाेस लवकरच मिळतील, असे आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या.

हवे तर मी व्हेंटिलेटर देतो, पण रुग्ण दुसरीकडे हलवावेत
५० रुग्ण अायसीयूत आहेत. यापैकी १८ व्हेंटिलेटरवर आहेत. दररोज ७ हजार लिटर ऑक्सिजन लागतो. मंगळवारी सकाळी १० वाजेपासून प्रयत्न सुरू होते. १२५ सिलिंडर आणले. संध्याकाळी ६ वाजता १ टन टँकर आले. मात्र, हा साठा मध्यरात्रीच संपेल. रात्री रात्री आणखी साठा मिळेल असे एफडीएचे सहआयुक्त संजय काळेंनी सांगितले, पण ताे सकाळपर्यंतच पुरेल. अामचे रुग्ण दुसरीकडे हलवा, हवे तर मी व्हेंटिलेटर देतो असे मी प्रशासनाला सांगितले अाहे. - डॉ. प्रदीप बेंजरगे, कृष्णा हाॅस्पिटल

अजून संकट टळलेले नाही
दिवसाला आम्हाला १७० सिलिंडर लागतात. मात्र, पुरवठा सुरळीत नाही. आम्हीदेखील रुग्ण हलवण्यासाठी नाेटीस लावली हाेती. मात्र सायंकाळी ऑक्सिजन मिळाला. अर्थात, अजून संकट टळलेले नाही. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत नसेल तर परिस्थिती गंभीर हाेऊ शकते. - डॉ. विजय पठाडे, मेडिकव्हर रुग्णालय

अाणखी अाॅक्सिजन मिळवून देऊ
दाेन्ही रुग्णालयांना साठा मिळण्यासाठी अामचे प्रयत्न सुरू अाहेत. सध्या १ टन ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. लवकरच आणखी ऑक्सिजन मिळेल. - मिलिंद काळेश्वरकर, सहायक अायुक्त, अन्न व औषध प्रशासन

पैसा माेजूनही रुग्णाचे जीव वाचवणे कठीणच
सध्या सगळीकडेच ऑक्सिजनचा तुटवडा आहे, हे बातम्यांतून कळत होते. पण रुग्णालयातील ऑक्सिजन संपला तेव्हा ‘यम’च समाेर दिसला. पैसे माेजूनही रुग्ण वाचवणे किती कठीण झाले आहे ते आज अनुभवाला आले. - योगेश बनकर, रुग्णाचे नातेवाईक

वडील घाटीत, आई इथे
माझे वडील घाटीत तर आई कृष्णा रुग्णालयात दाखल आहे. मी एकटाच मुलगा आहे. लॉकडाऊनमुळे आधीच अामचे दुकान बंद, त्यात दवाखाना आणि आता हे तिसरे संकट. ऑक्सिजन संपला तर काय, हा विचार करून थरकाप झाला होता. दीपक बाहेती, रुग्णाचे नातेवाईक

बातम्या आणखी आहेत...