आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक ड्रायरव्हरला मारहाण:चाकूचा धाक दाखवत 20 हजार रुपये लुबाडले; माजी सैनिकांसह एकाला 15 जूनपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद कन्नड येथून हैदराबादला जाणाऱ्या कांद्याच्‍या ट्रकला अडवून ट्रकचालकासह वाहकाला मारहाण तसेच चाकूचा धाक दाखवून 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून दुचाकीवर पसार झालेल्या चोरट्यांना दुसऱ्या एका ट्रक चालकांना लुटमार करताना चिकलठाणा पोलिसांनी अटक केली.

श्रीकांत गोरखनाथ वाघमारे (25, रा. माजी सैनिक कॉलनी पडेगाव) आणि शेख मोहम्मद निसार शेख मोहम्मद नुर (35, रा. अन्‍सार कॉलनी) अशी आरोपींची नावे असून त्‍यांना 15 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी. एम. भांडे यांनी दिले.

प्रकरणात महेगाव (ता. कन्नड) येथे राहणारे बाळू श्रावण गित्ते यांनी फिर्याद दिली. त्‍यानुसार, फिर्यादी हे जावेद मिर्झा यांच्‍या ट्रकवर (क्र. एमएच-20-जीसी-3786) चालक म्हणून काम करतात. 5 मे रोजी फिर्यादी व आणखी एक ट्रक चालक शेख फैसल शेख अफजल (रा. नारेगाव) हे कन्‍नड येथून कांद्याचे भाडे घेवून ट्रकने हैदराबादकडे निघाले होते. फुलंब्री बायपासने पीसादेवी चौफुली येथून केंब्रीज रोडने जात होते. त्यावेळी रात्री दहा वाजेच्‍या सुमारास ट्रकसमोर चार जण अचानक साखळी करून उभे राहिले. त्‍यामुळे फिर्यादीने ट्रक थांबवली. त्‍यानंतर चौघांपैकी दोन जण फिर्यादीच्‍या बाजूने तर दोनजण शेख फैसलच्‍या बाजूने ट्रकमध्‍ये चढले. त्‍यांनी दोघांना मारहाण केली. व चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्‍या खिशातील 500 रुपये आणि फैसलच्‍या खिशातील 20 हजारांची रोख रक्कम घेवून तेथून दुचाकीवर पसार झाले. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

12 जून रोजी चिकलठाण पोलिस ठाण्‍याचे उपनिरीक्षक एन. ए. पाटवदरक हे पथकासह परिसरात गस्‍त घालत होते. त्‍यावेळी बीड-बायपास हायवे वरील गांधेली फाट्याजवळ दोन व्‍यक्ती ट्रक अडवून लुटमार करित असताना त्‍यांना जमावाने पकडल्याची माहिती त्‍यांना मिळाली. त्‍यानुसार पथकाने वरील दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या. त्‍यांची चौकशी केली असता त्‍यांनी वरील गुन्‍ह्याची कबुली दिली.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपींच्‍या साथीदारांना अटक करायची आहे. गुन्‍ह्यातील ऐवज हस्‍तगत करायचा आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा तपास करायचा आहे. तसेच गुन्‍ह्यात आरोपींना आणखी मदत केली काय याचा देखील तपास बाकी असल्‍याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...