आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धेची पाच ग्रॅमची पोत लंपास:‘पुढे दंगा सुरू आहे’ असे म्हणतवृद्ध महिलेची सोनसाखळी लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पुढे दंगा सुरू आहे, मोठा राडा झाला आहे. त्यामुळे तुम्ही अंगावरचे दागिने काढून माझ्याकडे द्या,’ अशी थाप मारून मुला-मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या वृद्धेची पाच ग्रॅमची पोत चोराने लांबवली. ही घटना सोमवारी (१४ फेब्रुवारी) रोजी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास औरंगपुरा भागात घडली. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिटी चौक पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

कडूबी रज्जाक शेख (६५, रा. लहुगाव, ता. पैठण) या शेतमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. त्यांना रऊफ व आरेफ ही दोन मुले आणि एक मुलगी बिल्कीस अशी अपत्ये आहेत. रऊफ हा गंगापूर येथे तर आरेफ हा अंबरहिल, जटवाडा रोड येथे राहताे. मुलगी बिल्कीस हिचे लग्न झालेले असून ती तिचे पती रोजाबाग ईदगाह परिसरात राहतात. सोमवारी कडूबी या मुलगा आरेफ व मुलगी बिल्कीस यांना भेटण्यासाठी लहुगाव येथून औरंगाबाद येथे दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास आल्या. त्यानंतर आरेफला भेटून त्या दुपारी दीडच्या सुमारास मुलगी बिल्कीस हिला भेटण्यासाठी अंबरहिल येथून रिक्षाने रोजाबाग ईदगाह मशिदीजवळ उतरल्या.

तेथून पायी जात असताना एक जण दुचाकीवर जवळ आला. त्याने कडूबी यांना ‘पुढे दंगा सुरू आहे, तुमच्या गळ्यातील सर्व दागिने माझ्याकडे द्या,’ अशी थाप मारली. त्यावर कडूबी यांनी ‘मी तुला ओळखत नाही तर मी माझे दागिने का देऊ?’ असे म्हणाल्या. त्यावर त्याने ‘मी तुम्हाला ओळखतो. पुढे दंगा सुरू असल्याने ते तुम्हाला मारून टाकतील,’ असे धमकावत त्यांना शॉर्टकटने सोडून देतो, असे म्हणत त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमची पोत, मोबाइल आणि पिशवी दुचाकीच्या डिकीत ठेवली. त्यानंतर कडूबी यांना दुचाकीवर घेऊन औरंगपुऱ्याकडे निघाला. दुचाकीवर जाताना त्याने मी बालवाडीचे रेशन वाटण्याचे काम करत असल्याचे सांगून लहुगाव येथे येत असतो, अशी थाप मारली. औरंगपुरा येथे कडूबी यांना उतरवून एका टपरीवर चहा दिला.

चहा दिल्यानंतर चोरटा पळाला, सीसीटीव्हीत झाला कैद
कडूबी चहाचा ग्लास घेत असतानाच नजर चुकवून त्याने तेथून धूम ठोकली. कडूबी यांनी आरडाओरडा केली. मात्र, तोपर्यंत चोरटा तेथून पसार झाला होता. दरम्यान, सिटी चौक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात चोरटा कैद झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...