आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकमा:केस-दाढी वाढवून, रूपडे बदलत चार हजार 780 आरोपींचा गुंगारा;  औरंगाबाद परिक्षेत्रातील 4 जिल्ह्यांतून गुन्हेगारांना पकडण्यास पोलिस सज्ज

जालना (लहू गाढे )18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फरार पकडण्यात जालना अव्वल

खून, अत्याचार, दरोडा, अत्याचार करून अनेक गुन्हेगार जिल्हा सोडून पळून जातात आणि केस, दाढी वाढवून आपले रूपडे पालटत नंतर सर्वसाधारण आयुष्य जगण्याचा प्रयत्नही करत असतात. परंतु, पोलिसांकडून अशा आरोपींवर नजर ठेवून त्यांना जेरबंद केले जाते. दरम्यान, केस, दाढी, कपड्यांच्या पेहरावासह रूप बदलून औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतून ५,५२६ आरोपी फरार झाले आहेत. यात ७४६ जणांना जेरबंद करण्यात आले. पण ४ हजार ७८० आरोपींनी पोलिसांना गुंगारा दिलेला आहे.

औरंगाबाद परिक्षेत्रात खून, अपहरण, खंडणी, चोऱ्या, घरफोड्या, लूटमार अशा प्रकारचे विविध गुन्हेगारी घडत असतात. यात प्रत्येक गुन्हा उघड होतोच असे नाही. अनेक गुन्ह्यांत आरोपी न सापडल्यामुळे पोलिसांनाही चार्जशीट दाखल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, एखादा गुन्हा वर्षभरापेक्षा मागे पडल्यानंतर त्या गुन्ह्याकडे काहीअंशी ठाण्यांकडून दुर्लक्ष व्हायला लागते. तीन वर्षांच्या काळानंतर पोलिस अधीक्षक, पाेलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक हे बदलून जातात. यामुळे जुन्या गुन्ह्यांवर जास्त लक्ष न राहता असे गुन्हे प्रलंबित पडून अनेकदा आरोपी ताठ मानेने फिरत असतात. तर मोठ्या गुन्ह्यातील आरोपी दुसऱ्या जिल्ह्यात राहून अथवा चेहरा बदलणे, केस, अंगावरील पेहराव बदलणे, साधे राहणे अथवा एकदम टापटीप राहणे, असे प्रकार करतात. यामुळे पाहिजे असलेला आरोपीही अनेकदा पोलिसांना सापडत नाही. औरंगाबाद परिक्षेत्रातून अशा प्रकारचे ५ हजार ५२६ आरोपी फरार आहेत. या आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश आयजींनी काढलेले आहेत. यामुळे विविध जिल्ह्यांतून सबंधित पोलिस अधीक्षकांनी पथके स्थापन करून आरोपींना पकडण्याचे कामही सुरू केले आहे.

फरार पकडण्यात जालना अव्वल
फरार आरोपी पकडण्यात जालना पोलिस आघाडीवर आहेत. वर्षभरात २८१ आरोपी त्यांनी पकडले. या जिल्ह्यात सातत्याने कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. जालना खालोखाल बीड पोलिस जास्त आरोपींना पकडतात.

केस -1
परतूर येथील आरोपी राजेंद्र ऊर्फ राजन बाबुराव मुजमुले ऊर्फ राजेंद्र बाबुराव राऊत अशी वेगेगळी नावे सांगून राहत होता. २०११ मध्ये त्याने चोरी व लुटमार करण्याचा प्रयत्नाचा गुन्हे आहेत. तेव्हापासून तो दाढी वाढवून चेहरा लपविण्यासह पोलीसांची दिशाभूल करीत होता. त्यास तालुका पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी पकडले आहे.

केस - 2
महापुरुषाच्या मिरवणुकीत फिरत हाेता तडीपार डिंगऱ्या
विविध गुन्ह्यात तडीपार असलेला ‘डिंगऱ्या’ म्हणून प्रसिद्ध असलेला आरोपी जालना शहरात आला होता. पोलिसांना ओळखू येऊ नये म्हणून त्याने केस वाढवले, कधी-कधी टोपीचा वापर करायचा. दरम्यान, एका महापुरुषाच्या मिरवणुकीत तो सहभाागी झाला होता. परंतु, सापळा रचून त्यास पकडल्याची माहिती पोलीस कर्मचारी अनिल काळे यांनी दिली.

केस 3
२०२० मध्ये सदर बाजार, चंदनझिरा या ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर संशयित सुभाष उत्तम जगधने (२६) हा फरार होता. भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील बहिणीकडे शेतात राहत होता. तो दीड वर्षांपासून फरार होता. ८ दिवसांपूर्वीच या आरोपीस पीआय अनिरुद्ध नांदेडकर, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे यांनी जेरबंद केले.

बातम्या आणखी आहेत...