आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिरकोळ व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी 4 ते 5 दरोडेखोरांनी गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केल्याची घटना वाळूज येथील पंढरपूरमध्ये घडली आहे. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. पंरतू दरोडेखोऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एक विक्रेता जखमी झाला.
गर्दी वाढताच दरोडेखोर पळाले
औरंगाबाद-नगर महामार्गावर गरम कपडे विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्याचा या दरोडेखोरांचा उद्देश होता. स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या या 4 ते 5 दरोडेखोरांनी कपडे विक्रेत्यांना मारहाण करीत दोन राउंड फायर करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापारी घाबरत नसल्याने आणि गर्दी वाढत असल्याचे निदर्शनास येताच जीप घटनास्थळी ठेऊन दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले. मंगळवारी रात्री (ता. 13) 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
व्यापाऱ्याला मारहाण
औरंगाबाद नगर महामार्गावरील पंढरपूर, अब्बास पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली. येथे मध्यप्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात राहणारे गरम कपड्यांचे व्यापारी मागील महिन्यापासून स्वेटर्स, शाल, जॅकेट, हातमोजेंच्या विक्रीसाठी आले आहेत. रस्त्याच्या कडेला दुकान थाटून ते गरम कपड्यांची विक्री करतात. मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास या विक्रेत्यांनी दुकाने बंद केली. याच वेळी औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ क्रमांक (एम एच 20, ए जी 6001) जीप या दुकानाजवळ येऊन थांबली. यानंतर जीपमधील 4 ते 5 जणांनी एका दुकानातील शाल जीपमध्ये ठेऊन पैसे देण्यास नकार देत व्यापारी असिफ रसूल शहा (वय ३२) याच्याशी वाद घातला. तसेच, व्यापाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीमुळे शहा यांनी आरडाओरडा केला असता चैनसिंग मांगीलाल बंजारा, मुकेश बंजारा व इतर विक्रेते मदतीसाठी धाऊन आले.
यांची दगडफेक, त्यांचा गोळीबार
दरोडेखोरांनी विक्रेत्यांना लाकडी दांडा, लोखंडी रॉड व हातोड्याने मारहाण सुरू केली. ही मारहाण सुरू असताना विक्रेत्यांच्या इतर सहकाऱ्यांनी दरोडेखोरांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यावर दरोडेखोरापैकी एकाने जमावाच्या दिशेने दोन राउंड फायर केल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घटनेनंतर जीप जागीच सोडून पसार झालेल्या दरोडेखोरांच्या जीमध्ये मिरची पूड, धारदार चाकू, लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या आढळून आल्या.
चौघे संशयित ताब्यात
दरोडेखोरांच्या मारहाणीत राजू गोवर्धन हा विक्रेता किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दिपक गिरहे, सहायक आयुक्त अशोक थोरात, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगोले, उपनिरीक्षक चेतन ओगले, धनराज राठोड, पोलिस कॉन्सटेबल अविनाश ढगे, योगेश शेळके, यशवंत गोबाडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. जीप सोडून पसार झालेल्या दरोडेखोरांच्या जीप मध्ये मिरची पूड, लाकडी दांडे, लोखंडी रॅड आदी दरोड्याचा साहित्य मिळून आले आहे. या घटनेतील चौघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.