आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:टिप्या तीन दिवस कोठडीत, साथीदार पोलिसांच्या रडारवर; 19 गंभीर गुन्हे असलेला टिप्या समाजासाठी घातक असल्याचा पोलिसांचा कोर्टासमोर युक्तिवाद

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत दुपारी कोर्टात हजर केले; आई, बहीण, भावासह तीन मित्र हजर

‘कुख्यात गुन्हेगार शेख जावेद शेख मकसूद ऊर्फ टिप्या याच्यावर तब्बल १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो समाजासाठी घातक ठरत आहे. सहायक फौजदारासह महिलेच्या अंगावर गाडी घालून त्याने जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गुन्ह्यामागे कट असल्याचा संशय असून तो कुख्यात असल्याचे माहीत असतानादेखील अनेक जण त्याला मदत करतात,’ अशी भूमिका मांडत पोलिस व सरकारी पक्षांनी गुरुवारी न्यायालयाकडे त्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. पण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी ३ ऑक्टोबरपर्यंतच कोठडी मंजूर केली. आता टिप्याची कसून चौकशी करतानाच त्याला मदत करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

१७ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर भाजी मंडईमध्ये सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार सीताराम केदारे (५२) यांच्यासह एका महिलेच्या अंगावर गाडी घालून टिप्याने त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पुंडलिकनगर पोलिसांनी त्याच्याविराेधात खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात हस्तक्षेप करण्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १८ सप्टेंबर रोजी दुपारी हर्सूल कारागृहाचे पोलिस कर्मचारी सतीश तुकाराम उबरहंडे (३३) यांना टिप्याने २५ वर्षीय मैत्रीण व साथीदार अर्जुन राजू पवार-पाटील, दीपक दासपुते-पाटील यांच्या मदतीने अपहरण करून लुटले. गळ्याला चाकू लावून उबरहंडे यांच्याकडून बळजबरीने प्लॉट मैत्रिणीच्या नावावर करून घेतला. शिवाय, दोन लाख रुपयेदेखील उकळले होते. तेव्हापासून टिप्या फरार झाला. थेट पोलिसांवरही दादागिरी करणारी टिप्याची प्रकरणे बाहेर आल्यानंतर पोलिस अधिकारीही हादरून गेले. तब्बल आठ दिवस गुन्हे शाखेला त्याने पळवले, मात्र तो हाती लागला नाही. पोलिसांच्या प्रत्येक नियोजनाची माहिती टिप्यापर्यंत पोहोचत असल्यानेच तो दोन्ही वेळा पोलिसांच्या तावडीतून सुटला. त्यामुळे पोलिसही चांगलेच चिडले हाेते. या परिस्थितीत पोलिसांच्या तावडीत सापडल्यास खैर नाही याची जाणीव झाल्याने मग टिप्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार २८ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता थेट न्यायालयासमाेर शरणागती पत्करली.

गाडीत बसताना चिंताग्रस्त, चेहऱ्यावर दिसली भीती
सुरुवातीला किरकाेळ कारनामे करणारा टिप्या काही पोलिसांच्या लाडामुळेच कुख्यात गुन्हेगार बनला. किरकोळ गुन्ह्यांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने त्याची हिंमत वाढत गेली व तो लोकांचे जीव घेण्यापर्यंत धाडस करू लागला. पुंडलिकनगर भागात मध्यरात्री उघड्या जीपवर मद्यधुंद तरुणीसह बेधुंद नृत्य करणाऱ्या टिप्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हाही पोलिसांनी कारवाई केली नाही. पुढे थेट पोलिसावर हल्ला करण्यापर्यंत त्याने मजल मारली. तेव्हा कुठे गुन्हे शाखा व पुंडलिकनगर पोलिसांना जाग आली. जंग जंग पछाडूनही टिप्या सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. ‘डिपार्टमेंट’मधूनच त्याला सहकार्य मिळत असल्याचीही चर्चा सुरू होती. त्यामुळे वरिष्ठांनी ‘कायमचा बंदोबस्त’ करण्याची तयारी सुरू करताच टिप्या घाबरून न्यायालयात हजर झाला. सुरुवातीला त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. बुधवारी पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेण्यासाठी परवानगी मागितली. गुरुवारी सकाळी हर्सूल कारागृहातून त्याला ताब्यात घेतले तेव्हा मात्र प्रचंड घाबरला होता. पोलिस आपले काय करतात, याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर होती. गाडीत बसताना तो पोलिसांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देत होता. त्यानंतर दुपारी तीन वाजता सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, बाळाराम चौरे, गणेश वैराळकर, अजय कांबळे यांनी त्याला न्यायालयात हजर केले. या वेळी त्याची आई, बहीण, भाऊ व तीन मित्र आले होते.

अंगावर घातलेली गाडी कुणाची ?
टिप्याने सहायक फौजदार केदारे यांच्या अंगावर जी गाडी घातली होती त्या गाडीमालकाचा शोध पाेलिस घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गाडी एका हापशी खोदणाऱ्याच्या गाडीवर काम करणाऱ्याच्या नावावर आहे. यापूर्वी जवळपास चार जण या गाडीचे मालक राहिलेले आहेत. हा गुन्हा घडत असताना जाणीवपूर्वक व्हिडिओ काढण्यात आला. तो व्हिडिओ काढण्याचा उद्देश काय होता, त्याआधारे नंतर दहशत निर्माण करण्याचा उद्देश होता का, तो कट होता का? टिप्याला गुन्ह्यात कोण मदत करते, कोण संपर्कात असते या सर्व अंगाने पोलिस तपास करणार आहेत. त्या आधारावरच कोठडीची मागणी करण्यात आली होती. टिप्याची इंजिनिअर मैत्रीण व दाेन साथीदार यापूर्वीच अटक केलेले आहेत. या महिलेलाही पोलिस चौकशीला बोलावणार आहेत.

१९ गंभीर गुन्हे, तरीही टिप्या मोकाटच
टिप्यावर अपहरण, बलात्कार, खुनासारखे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्हे पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. परंतु त्यात पोलिसांनी योग्य तपास न केल्याने त्याचा टिप्याने वेळाेवेळी फायदा घेतला व गंभीर गुन्ह्यातदेखील ताे बाहेर राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता संवेदनशील होऊन टिप्याबाबत कडक भूमिका घ्यावी, अशा प्रतिक्रिया पुंडलिकनगर भागात त्याच्या दहशतीखाली वावरणारे व्यापारी, व्यावसायिकांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...