आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:दानिशचा खुनी नितीन कोठडीत गप्पच, घरचेही माहिती देईनात; पोलिसांकडून खंडागळे कुटुंबाच्या घराची तपासणी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या जुन्या वादातून नितीन ऊर्फ गब्ब्या भास्करराव खंडागळे या सत्तावीस वर्षीय माथेफिरूने घराजवळच बसलेल्या तरुणांच्या घोळक्यावर प्राणघातक हल्ला केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत पोलिसांनी नितीननंतर त्याचा लहान भाऊ सोमनाथ, मोठी बहीण आणि आई अशा तिघांनाही अटक केली आहे. दरम्यान, गुरुवारी दुसऱ्या दिवशीही हल्लेखोर नितीन गप्पच राहिला. बहीण आणि भावानेही पोलिसांना काहीही ठोस माहिती दिली नाही. आईने मात्र नेमके काय घडले, असे विचारले व या तरुणांचे आपसात वाद झाल्याचे पोलिसांना सांगितले.

नितीनने केलेल्या या हल्ल्यात सय्यद दानिश सय्यद शफियोद्दीन (२२) याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चौघे जखमी झाले. घटनेनंतर मृत दानिशचे कुटुंब आणि त्याच्या जखमी मित्रांनी हल्ल्यात नितीनसह त्याची आई, बहीण व भावाचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यामुळे क्रांती चौक पोलिसांनी चौघांना अटक केली.

सलीमची प्रकृती धोक्याबाहेर : जखमींपैकी फय्याज ऊर्फ बाबा याला गुरुवारी रुग्णालयातून सुटी मिळाली. गंभीर जखमी असलेल्या सलीमची प्रकृती अद्यापही चिंताजनक असली तरी धोक्याबाहेर असून घटनेत त्याची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वडील भेटलेच नाहीत
खंडागळे कुटुंबाचा अंगुरीबाग परिसरात जवळपास चार गुंठ्यांमध्ये मोठा जुना वाडा आहे. पोलिसांनी गुरुवारी नितीनने चाकू कुठून नेला, घरी गेल्यानंतर काय संवाद साधला, याची तपासणी करण्यासाठी घराची पाहणी केली तसेच आरोपींच्या वागणुकीविषयी शेजारी, भाडेकरूंकडून माहिती घेतली. एकाच कुटुंबातील चार जण खुनाच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असल्याने आराेपी नितीनचे वडील अजूनही धक्क्यातून सावरले नव्हते. पोलिस ठाणे, न्यायालयातही ते घरच्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...