आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौलताबादेत एसीबीचा पुन्हा ट्रॅप:मृताच्या टाळूचे लोणी खाणारा फौजदार अटकेत; मृताच्या पंचनाम्यासाठी दहा हजारांची लाच घेताना जाळ्यात अडकला

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाचखोर उपनिरीक्षक रविकिरण कदम - Divya Marathi
लाचखोर उपनिरीक्षक रविकिरण कदम

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाच्या विम्यासाठी त्याच्या मुलाला पंचनाम्याची गरज हाेती. यासाठी अडवणूक करून दहा हजार रुपयांची लाच घेताना दाैलताबाद पाेलिस ठाण्याचा उपनिरीक्षक रविकिरण आगतराव कदम (३९) याला मंगळवारी पकडण्यात आले. तक्रार प्राप्त हाेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अवघ्या २० तासांमध्ये ही कारवाई केली. ५ फेब्रुवारी रोजीच शहरातील पोलिस निरीक्षक लाच घेताना पकडला हाेता. दहा दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली.

२८ जानेवारी रोजी दौलताबाद परिसरात सुसाट चारचाकीच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अपघाताची नोंद होऊन चारचाकी चालकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला. त्या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक कदमकडे सोपवण्यात आला. परंतु, पंचनामा करण्यासाठी कदमने टाळाटाळ सुरू केली. वडिलांच्या निधनामुळे दु:खाचा डोंगर कोसळलेल्या ३० वर्षीय मुलाने कदम यांच्याकडे उर्वरित प्रक्रियेसाठी विनंती केली. मात्र, माणुसकीचा विसर पडलेल्या कदमने पंचनाम्यासाठी पैशांची मागणी सुरू केली. तक्रारदाराच्या वडिलांचा न्यायालयात क्लेम सादर करून अपघाताचा पंचनामा व विम्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची हाेती.

मात्र त्यासाठी दहा हजार रुपये मागण्यात आले. संतापलेल्या तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे १४ फेब्रुवारी रोजी तक्रार केली. निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांनी तक्रार प्राप्त होताच खातरजमा केली असता कदम लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस ठाण्यात जाण्याआधीच अडकला
पाेलिस उपनिरीक्षक कदम घरून नेहमीप्रमाणे दाैलताबाद ठाण्यात जाण्यासाठी निघाला होता. तक्रारदार तरुणाला दहा हजार रुपये घेऊन त्याने जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतीसमोर बोलावले. कदमने तरुणाकडून लाचेची रक्कम घेऊन खिशात ठेवताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने अटक केली. कदम २०१५ च्या बॅचचा उपनिरीक्षक आहे. सूर्यवंशी यांच्यासह अंमलदार विलास चव्हाण, मिलिंद इप्पर, सुनील बनकर, चंद्रकांत बागूल यांनी कारवाई पार पाडली.

अनेक अवैध धंद्यांना अभय
दाैलताबाद पाेलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बाेकाळले असून त्यांना पाेलिसांकडून अभय दिले जाते. विशेषत: फार्महाऊसमध्ये हाेणाऱ्या पार्ट्यांकडेही ‘साेयीस्कर’ दुर्लक्ष केले जाते.

वाळूजलाही लाच प्रकरणात झाली हाेती कारवाई
शहर पोलिस दलातील वाळूज वाहतूक निरीक्षक जनार्दन साळुंखे यांना एसीबीने वाळूसाठी पाच हजारांची लाच घेताना अटक केली. त्याच्या दहा दिवसांनंतर शहर पोलिस दलातीलच उपनिरीक्षक कदम लाचेच्या जाळ्यात सापडला. १४ डिसेंबर २०२१ रोजी दौलताबाद पोलिस ठाण्याचा कर्मचारी सुरेश कवडे वाळूच्याच प्रकरणात हॉटेलचालकाच्या मदतीने लाच घेताना पकडला गेला होता. त्याच्या बरोबर दोन महिन्यांनी त्याच ठाण्यात लाचेची कारवाई झाली.

बातम्या आणखी आहेत...