आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करुणा अन् शांतीसाठी:औरंगाबादमध्ये 17 डिसेंबरला धम्म मेळाव्याचे आयोजन; 'आप'चे माजी मंत्री लावणार हजेरी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनागरिक धम्मपाल प्रचार समितीच्या वतीने १७ डिसेंबरला टीव्ही सेंटर येथील मैदानावर सायंकाळी चार वाजेपासून धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध धम्माची शिकवण, मूल्य आणि तत्व यांची माहिती व्हावी, या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे समितीचे अध्यक्ष मुकुंद सोनवणे यांनी सांगितले.

श्रीलंकेतील अनागरिक धम्मपाल यांनी 1891 मध्ये भारतात येऊन बुद्धगयाच्या विहाराची स्थिती पाहिली. यानंतर 1893 मध्ये बुद्धगया येथील बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, अशी लेखी मागणी त्यांनी केली. त्यांच्याच नावाने बौद्ध धम्माची ही प्रचार समिती समाजात बौद्ध धम्माची शिकवण रुजवण्याचे काम करत आहे.

मेळाव्याला दिल्ली येथील आप सरकार मध्ये मंत्री राहिलेले आमदार राजेंद्र पाल गौतम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोबतच धुतांगधारी अर्थात पाठ न लावता विश्राम करणारे भिकू ज्ञानज्योती महास्थवीर यांचीही उपस्थिती मेळाव्यात राहणार आहे.

मेळाव्याची माहिती देताना, ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे म्हणाले की, मी भारत बुद्धमय करीन अशी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. त्यांच्या स्वप्नसिद्धीमध्ये योगदान म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात होणारा समितीच्या वतीने हा पहिलाच मेळावा आहे. यामध्ये भीम गीतांचे गायन होणार आहे. समितीची स्थापना दोन वर्षांपूर्वी शहरात झाली. समितीचे 25 सदस्य मेळाव्याच्या आयोजनासाठी कार्यरत आहेत. महिनाभरापासून या आयोजनासाठी प्रचार प्रसाराचे काम सुरू झाले होते. या अंतर्गत 97 बैठका घेण्यात आल्या आहेत. लोकसहभागातून चार लाखांचे दानही जमले आहे.

सोनवणे म्हणाले, या कार्यक्रमात बौद्ध धर्मीयांसोबतच बौद्धेत्तरांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. बौद्ध धम्म समजावून घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदनाही देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...