आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक वाढण्याची आशा:औरंगाबाद डीएमआयसीचे ब्रँडिंग करणार इन्व्हेस्टमेंट इंडिया

रोशनी शिंपी | औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील गुंतवणूकदारांना भारतात आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने इन्व्हेस्टमेंट इंडिया फोरमची स्थापना केली आहे. या फोरमने आता औरंगाबादच्या डीएमआयसीकडे लक्ष केंद्रित केले आहे. देशातील नऊ ठिकाणांचे जगभरात ब्रँडिंग करण्याचे या फोरमने ठरवले असून त्यात पहिल्या क्रमांकावर औरंगाबाद-मुंबई कॉरिडॉरला स्थान दिले आहे. यामुळे येत्या पाच वर्षांत औरंगाबादचे नाव देशातील उद्योगस्नेही महत्त्वाच्या शहरांच्या यादीत समाविष्ट होईल, असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला.

इन्व्हेस्ट इंडिया जगातील २१० देशांतील गुंतवणूक कार्यक्षम कंपन्यांचा अभ्यास करून त्यांच्यासमोर भारतीय बाजारपेठेची क्षमता, येथे गुंतवणुकीचे फायदे यांचे सादरीकरण करते. औरंगाबादेत शेंद्रा व बिडकीन डीएमआयसीत १० हजार हेक्टर जागा उद्योगांसाठी विकसित करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाने औरंगाबाद- मुंबई कनेक्टिव्ही, धुळे-सोलापूर हायवे आणि तिसरे म्हणजे पुण्याशी असलेली चांगली कनेक्टिव्हिटी ही औरंगाबादची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय ड्रायपोर्ट, रेल्वे, एअरपोर्ट आदी सुविधाही आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग, फार्मा, फूड, कापड अशा अनेक प्रकारचे उद्योग आहेत. मात्र आजवर या उद्योगनगरीचे योग्य ब्रँडिंग होत नसल्याने इथे फारसे मोठे उद्योग आले नाहीत.या पार्श्वभूमीवर चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) या संघटनेच्या वतीने शहराच्या ब्रँडिंगसाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. त्याला आता यश मिळाले आहेे, असे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले.

पाच हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणण्यावर लक्ष
पाच हजार कोटींच्या पुढील गुंतवणुकीला आपल्याकडे मेगा प्रॉजेक्ट म्हणून पाहिले जाते. अशा उद्योगांनी केलेली गुंतवणूक जीएसटीच्या स्वरूपात सात वर्षांत परत केली जाते. विशेष म्हणजे संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात १७ टक्के कमी इन्कमटॅक्स द्यावा लागतो, या प्रमुख बाबींच्या बळावर इन्व्हेस्ट इंडिया भारताची मार्केटिंग करते. त्यासोबतच ज्या शहराचे मार्केटिंग करायचे आहे तेथे उपलब्ध पायाभूत सुविधा व पूरक उद्योगांबाबतही तज्ज्ञांकडून जगभरातील उद्योगांना माहिती दिली जाते. त्याआधारे तेथील उद्योग गुंतवणुकीसाठी औरंगाबादला भेट देऊन पाहणी करू शकतील.

पाच वर्षांत देशातील महत्त्वाचे शहर
वाळूज, शेंद्रा, बिडकीन आणि पैठण या भागात ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, फूड, कापड, इंजिनिअरिंग असे सर्वच उद्योग उत्तमपणे विकासित झाले आहेत. आता इन्व्हेस्ट इंडियाने ब्रँडिंग केल्यास पाच वर्षांत गुंतवणूक वाढून औरंगाबाद देशातील महत्त्वाचे शहर होईल.
उमेश दाशरथी, संचालक, ऋचा इंडस्ट्रीज

पाच-सहा बड्या कंपन्या याव्यात

औरंगाबादमध्ये प्रचंड क्षमता आहे, फक्त मार्केटिंग आक्रमक असायला हवी, हे आम्ही वारंवार मांडत होतो. गेल्या महिन्यात मुंबईतील सर्व उच्चपदस्थांना भेटण्यामागील उद्देशही तोच होता. आता या माध्यमातून जगातील ५ ते ६ मोठ्या गुंतवणूकदार कंपन्या याव्यात. नितीन गुप्ता, अध्यक्ष सीएमआयए

या शहरांचे होणार ब्रँडिंग
१. मुंबई-औरंगाबाद कॉरिडॉर २. पुणे ३. गुरगाव-भिवाडी-निमराणा ४.नोएडा ५. बंगळुरू ६. चेन्नई ७. हैदराबाद ८. अहमदाबाद ९. वडोदरा

बातम्या आणखी आहेत...