आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबादमध्ये ईडीची कारवाई:सिडकाेतील बड्या व्यावसायिकाचा बंगला, कार्यालयाची 16 तास झाडाझडती, 62 लाख रुपये, 7 किलाे साेने जप्त

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडकोतील या बंगल्यात ईडीचे पथक दिवसभर तळ ठाेकून हाेते.
  • कारवाईपासून स्थानिक पोलिस अनभिज्ञ; इतर व्यावसायिकांमध्ये घबराट

शहरातील एक बडे व्यावसायिक व प्रसिद्ध केटरर्सच्या मालमत्तेवर गुरुवारी ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) पथकाने छापे टाकले. सिडकाेतील त्यांचा बंगला, गाेदाम व कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. सायंकाळपर्यंत ६२ लाख रुपये व सात किलाे साेन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.

ईडीच्या १२ अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास शहरात दाखल झाले. सकाळी साडेसातच्या सुमारास या व्यावसायिकाचे कार्यालय, गाेदाम व सिडको एन-३ मधील बंगल्यात या पथकाने एकाच वेळी छापा टाकला. या कारवाईसंदर्भात दिवसभर गुप्तता पाळली जात हाेती. स्थानिक पोलिसही अनभिज्ञ हाेते. दिवसभर बंगल्यात जाण्यास व बंगल्यातून बाहेर जाण्यास काेणालाही परवानगी नव्हती. अवैध संपत्ती, सोने जमवल्याप्रकरणी तसेच परकीय चलन प्रकरणात रात्री उशिरापर्यंत मुगदिया यांच्याकडील संपत्ती, गुंतवणुकीची कसून चाैकशी केली जात हाेती. रात्री उशीरापर्यंत पथकाने या व्यावसायिकाचे नाव जाहीर केले नव्हते. त्याच्या दोन मजली बंगल्यात अर्धे अधिकारी तळ मजल्यावर तर उर्वरित पहिल्या मजल्यावर तपासणी करत होते. घराची सर्व दारे, खिडक्या बंद करून पडदेदेखील लावण्यात आले होेते. दुपारी सव्वाचार वाजता कारवाईची त्राेटक माहिती ईडीकडून देण्यात आली. त्यानंतर ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली व इतर व्यावसायिकांचेही धाबे दणाणले.

फेमा कायद्यांतर्गत केली कारवाई
फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) (परकीय मुद्रा व्यवस्थापन अधिनियमन, १९९९) अंतर्गत ही कारवाई झाली. दुपारपर्यंतच्या चाैकशीत ६२ लाख रोख व ७ किलो सोने बिस्किट स्वरूपात आढळले. याशिवाय बंगला, कार्यालय व गोडाऊनमध्ये महत्त्वाची बिले, कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली हाेती. ‘फेमा’अंतर्गत केलेली कारवाई दिवाणी प्रकरणाअंतर्गत चालते. ईडीचे अधिकारी प्रकरणाची चौकशी करतात. गुन्हा सिद्ध झाल्यास रकमेच्या तीनपट दंड वसूल केला जाऊ शकतो. २०१९ मध्ये शहरात बड्या उद्योग समूहाच्या कार्यालयावर ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात छापे टाकले होते. त्यानंतर ही ईडीची दुसरी कारवाई आहे.

अवैध प्रकारे व्यवहारात नाव आल्याने कारवाई
ईडीने मागील काही दिवसांपासून अवैध परकीय गुंतवणुकीसंदर्भात तपास सुरू केला होता. त्यात परराज्यातील काही कंपन्यांच्या गैरव्यवहारात झालेल्या देवाणघेवाणीत या व्यावसायिकाचे नाव समोर आल्यानंतर गुप्त तपास सुरू करण्यात आला. त्या अनुषंगाने काही संशयास्पद व्यवहाराचे पुरावे हाती लागल्याने ही कारवाई झाल्याचे समजते.

चार गाड्या, महिला अधिकाऱ्यांचा समावेश
स्थानिक लाेकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान एकामागाेमाग एक अशा चार मुंबई पासिंगच्या इनोव्हा कार सोसायटीत आल्या. गाडीतून उतरताच सर्व अधिकाऱ्यांनी तडक संबंधित व्यावसायिकाच्या बंगल्यात प्रवेश केला. यात चार ते पाच महिलांचाही समावेश होता. संध्याकाळी परिसरात माध्यम प्रतिनिधींनी गर्दी केल्यानंतर स्थानिकांना कारवाईची नेमकी माहिती मिळाली. कॉलनीच्या दोन्ही बाजूस पथकाच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. संध्याकाळी पाच वाजता सर्व वाहने कॉलनीतून दुसरीकडे हलवण्यात आली.

आयकर अधिकाऱ्यांचा सहभाग
स्थानिक आयकर विभागाचे तीन अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित झाले. बंगल्यात आधीपासून असलेल्या अधिकाऱ्यांसोबत आयकर अधिकाऱ्यांनी मराठीत संवाद साधत आत प्रवेश केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ईडीच्या छाप्यात मिळालेल्या सोने व इतर मिळालेल्या चलनाच्या स्राेताची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभाग दाखल झाले.