आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:प्रभागनिहाय निवडणुकीच्या अजितदादांच्या फाॅर्म्युल्याला शिवसेना, काँग्रेसचा विराेधच

मंदार जोशी | औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणाले, वॉर्डनिहाय निवडणूक हवी

भाजपला रोखण्यासाठी राज्यातील मनपाच्या निवडणुका वाॅर्डनिहाय न करता प्रभागनिहाय करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच मांडला आहे. मात्र, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मात्र या प्रस्तावाला विराेध दर्शवला आहे. सहा महिन्यांनी हाेणारी औरंगाबाद मनपाची निवडणूक एक सदस्यीय वाॅर्डनिहायच घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी वगळता इतर सर्वच पक्षांनी केली अाहे.

औरंगाबाद मनपातील नगरसेेवकांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्येच संपला. तेव्हापासून इच्छुक उमेदवार व सर्वच पक्षांनी वाॅर्डनिहाय निवडणूक लढवण्याची तयारी केली अाहे. मात्र काेराेनामुळे निवडणुका सुमारे दीड वर्ष लांबल्या. वर्षभरापूर्वी चार सदस्यीय प्रभाग निहाय निवडणुकांची चर्चा सुरू होती. त्यावेळी शहरातील शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वॉर्डनिहाय निवडणुकीचाच आग्रह धरला होता. त्यात आता पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी प्रभागनिहाय निवडणुकीचे सूतोवाच केल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांसमाेर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला अाहे. मनपा निवडणुकीच्या वाॅॅर्ड आरक्षणााला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले अाहे. १ जुलै रोजी त्याची पुढील सुनावणी आहे. सुनावणी होईपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय होऊ शकत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इच्छुक उमेदवारांना करावी लागणार अजून प्रतीक्षा
वाॅर्डरचना व आरक्षणाविराेधात सुप्रीम कोर्टात जी याचिका सादर करण्यात आली आहे त्यावर अजून सुनावणीला सुरुवात झालेली नाही. न्यायालयाने राज्य शासन व निवडणूक आयोगाला तीन वेळा शपथपत्र सादर करण्याची संधी दिली होती. मात्र ते सादर करण्यात आले नाही. त्यामुळे आता थेट सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या सर्व प्रक्रियेला अजून किती वेळ लागू शकतो हे सांगता येणार नाही. शिवाय नवीन प्रशासकांच्या नियुक्तीचा काळ हा एक वर्षापर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी २०२२ उजाडू शकते. त्यामुळे राज्यातील दहा महानगरपालिकेच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याची चर्चा आहे.

आमची तयारी आहे

राज्यातील परिस्थिती बदलते आहे. काम करणाऱ्यांच्या पाठीमागे जनता आहे. त्यामुळे निवडणूक कुठल्याही पद्धतीने होऊ दे आमची लढण्याची तयारी आहे. त्या पद्धतीने आम्ही कामही सुरू केले आहे. - अभिषेक देशमुख, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभागांमुळे विकासाला खीळ

प्रभागनिहाय निवडणुकीत भाजपला फायदा मिळाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपला फायदा मिळवून द्यायचा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रभागनिहाय निवडणुकीमुळे विकासकामांना खीळ बसते. - नासेर सिद्दिकी, माजी गटनेते, एमआयएम

...तर आणखी गाेंधळ हाेईल

वाॅर्डनिहाय रचना करण्यातच इतका घोळ घालण्यात आला आहे. तर प्रभागनिहाय रचना करताना किती गोंधळ होऊ शकतो. शिवाय न्यायालयाच्या निकालाशिवाय पुढील निर्णय घेता येऊ शकणार नाही. जे होईल ते पारदर्शीपणाने व्हावे ही अपेक्षा आहे. - समीर राजूरकर, याचिकाकर्ते
हा तर संविधानाचा अपमान

प्रभागनिहाय निवडणुका घेणे म्हणजे संविधानाचा अपमान आहे. संविधानाप्रमाणे एका व्यक्तीला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रभागात दाेन किंवा चार सदस्यांना मतदान करावे लागते. त्याला आमचा विराेध आहे. - अमित भुईगळ, वंचित बहुजन आघाडी

वाॅर्डनिहाय निवडणुका हव्यात

काँग्रेसने शहरात वाॅर्डनिहाय पक्षबांधणी केली आहे. तसेच निवडणुकीच्या तयारीला सुद्धा वॉर्डनिहाय करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका प्रभागनिहाय न घेता वॉर्डनिहाय घेण्यात याव्यात. प्रभागनिहाय निवडणुका आम्हाला मान्य नाही - हिशाम उस्मानी, शहराध्यक्ष, काँग्रेस

काेणत्याही पर्यायास तयार
मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेवर सुप्रीम कोर्टाची स्टे ऑर्डर आहे. हे अजितदादांना माहिती नसेल. कोर्टाच्या सुनावणीनुसार पुढील निर्णय होईल. आम्ही जनतेसाठी लढत आहोत, त्यांच्या समस्या सोडवतो. त्यामुळे निवडणूक कुठल्याही पद्धतीने होऊ दे आम्ही तयार आहोत. - अतुल सावे, आमदार, भाजप.

वाॅर्ड पद्धतच प्रभावी
नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठी वाॅर्डनिहाय पद्धत ही प्रभावी आहे. त्यामुळे वॉर्डनिहाय निवडणूक व्हावी हा आमचा आग्रह आहे. तशी भूमिका आम्ही यापूर्वी देखील वरिष्ठांसमोर मांडली होती. - नंदकुमार घोडेले, माजी महापौर, शिवसेना

अपयश लपवण्यासाठीचे प्रयत्न

आतापर्यंत जे सत्तेत होते त्यांनी कुठलेही भरीव काम केले नाही. त्यांचे अपयश झाकण्यासाठी प्रभागनिहायचे प्रयत्न सुरू आहेत. जर जनतेची कामे केली असती तर कुठल्याही पद्धतीने निवडणुका झाल्या तरी सत्ताधाऱ्यांना भीती नसती. - सुहास दाशरथे, जिल्हाध्यक्ष, मनसे

अजितदादांचे वैयक्तिक मत
अजितदादा जे बालले ते त्यांचे वैयक्तिक मत होते. त्यांनी कुठलाही शासनाचा निर्णय सांगितलेला नाही. सध्या तरी मनपा निवडणुकीचे नियोजन हे वाॅर्डनिहाय सुरू असून त्यानुसार आमच्या पक्षाचे काम देखील सुरू आहे. - अंबादान दानवे, जिल्हाप्रमुख शिवसेना.

बातम्या आणखी आहेत...