आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:जिगरबाज महिला अधिकाऱ्याने परतवून लावला चंदन चोरांचा हल्ला, 100 नग चंदनासह शस्त्रसाठा जप्त

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौताळा अभयारण्यातील अंबाला-ठाकूरवाडी परिसरातील घनदाट जंगलात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चंदन चोर आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. नि:शस्त्र कर्मचाऱ्यांवर सशस्त्र चोरट्यांनी हल्ला केला. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी तो परतवून लावला. पण चोरटे पसार झाले. त्यांच्याकडून चंदन आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. अंबाला-ठाकूरवाडी भागात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. शुक्रवारी चोरटे येणार असल्याची माहिती खबऱ्यांनी विभागीय अधिकारी (वन्यजीव) विजय सातपुते यांना दिली. त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याची सूचना केली हाेती. त्यानुसार रात्री १ वाजेच्या सुमारास कन्नडच्या सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) आशा चव्हाण १४ जणांचा फौजफाटा घेऊन जंगलात रवाना झाल्या.

अंधारात २ तास झटापट
चव्हाण व त्यांच्या पथकाने जंगलात पावसात पायी गस्त केली. त्यांना पाहताच ८ ते १० चोरट्यांनी डोंगराच्या दिशेने पळायला सुरुवात केली. पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चोरट्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडी, काठ्या आणि टॉमीने हल्ल्याचा प्रयत्न केला. नि:शस्त्र कर्मचारी तो परतवून लावत चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात होते. दोन तास झटापट सुरू होती. नंतर अंधार व पावसाचा फायदा घेत चोरटे पसार झाले.

महत्त्वाची ७ रिक्त पदे भरण्याची गरज
सशस्त्र चंदन चोरांना पकडण्यासाठी आशा चव्हाण यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. वन खात्यातील महत्त्वाची ७ पदे रिक्त असल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ही पदे तत्काळ भरण्याची गरज आहे. - विजय सातपुते, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग, औरंगाबाद

- चंदनाचे ११.६०० किलोग्रॅम वजनाचे अर्धा ते दोन फूट आकाराचे १०० नग, करवत, टॉमी,कानस आणि गुलेर जप्त करण्यात आली. आरोपींविरुद्ध वन गुन्हे नोंदवण्यात आले असून वनपाल मनोज उदार तपास करत आहेत.

यांनी टाकली धाड : विजय सातपुते, चाळीसगावचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, वनपाल एस.आर.मोरे, के.बी.रायसिंग, वनरक्षक दांडगे, लटपटे, समाधान पाटील, राम डुकरे, अनिल चव्हाण, सोनार, चंदवडे, कल्याण खोकड, काकरवाल, अजय मेहर आणि हरीश उप्पलवाड.

बातम्या आणखी आहेत...