आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. भागवत कराड यांच्यामुळे मिळाला मान:74 वर्षांत औरंगाबादला प्रथमच केंद्रीय मंत्रिपद; एमटीपी विधेयकाच्या मराठीतून केलेल्या प्रभावी मांडणीने उघडून दिले मंत्रिपदाचे द्वार

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक
  • आगामी महानगरपालिका निवडणुकीत मंत्रिपदामुळे भाजपला मिळेल बळ

या ठिकाणी सब्र का फल मीठा
१९९५ ला कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक. राजेंद्र दर्डांचे कट्टर समर्थक. पण भाजपकडून एकदा उपमहापौर, दोनदा महापौर. एप्रिल २०२० मध्ये अचानक राज्यसभेवर खासदार. २०२१ केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी... असा डाॅ. भागवत कराड यांचा अनेक वर्षे संथ पण गेल्या वर्षभरात कमालीचा ‘चमत्कारिक’ राजकीय प्रवास. कोणत्याही भाषणात या ठिकाणी असा वारंवार उल्लेख करणाऱ्या डॉ. कराडांच्या यशामागे अनेक कारणे आहेत. पण एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘या ठिकाणी सब्र का फल मीठा होता है’.१९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता असताना औरंगाबाद मनपाची दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली. शिवसेनेचे प्राबल्य व आधीच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला होता. त्यामुळे पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात भाजपला आठ जागा मिळाल्या.

शिवसेनेला सर्वाधिक जागा असल्याने काही अपक्ष नगरसेवक सेनेच्या संपर्कात होते. पण कोटला कॉलनीतून अपक्ष विजयी झालेले, त्या काळी दर्डांच्या वर्तुळात उठबस असलेले, लायन्स क्लबचे सदस्य अशी ओळख असणाऱ्या डॉ. कराडांनी भाजपला पाठिंबा दिला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. औरंगाबादची सामाजिक, राजकीय समीकरणे लक्षात घेता हा माणूस भाजपत फार काळ टिकणार नाही, असा कयास होता. पण कौटुंबिक पातळीपासून ते समाजकारणात सर्वत्र संयम ठेवला पाहिजे. काळ कितीही प्रतिकूल असला, विरोधक कितीही बलवान असला तरी एक दिवस आपला येईल,’ असे डॉ. कराड यांना ठामपणे वाटत होते. त्यानुसारच त्यांनी तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात वाटचाल सुरू केली. समोरच्या व्यक्तीने कितीही टीका केली, आरोप-प्रत्यारोप केले, कुभांड रचले तरी त्याला बोलून दुखवायचेच नाही. आपल्या जवळच्यांना सोबत घेऊन रस्ता शोधत राहायचा. अन्याय झाला तरी पक्षाविरुद्ध चकार शब्द काढायचा नाही.

सतत गोड बोलण्याचा मारा करत विरोधकांना आपलेसे करायचे. त्यांचा योग्य वेळी ‘साम- दाम- भेदा’ने प्रभावी वापरही करायचा असे तत्त्व कायम ठेवले. त्यामुळे भाजपमधील अनेक स्थानिक नगरसेवकांना बाजूला करत ते वरिष्ठांच्या नजरेत कायम भरत राहिले. गोपीनाथ मुंडे यांचा वरदहस्त होताच. त्यामुळे विरोधकांच्या फोडाफोडीचे कसब पणाला लावत त्यांनी २००० मध्ये शिवसेनेचे गनिमी काव्याने ऑपरेशन केले. डॉ. कराड तीन मतांनी महापौर झाले, पण शिवसेनेचे नंदकुमार घोडेले उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पराभूत हाेऊन राष्ट्रवादीचे वसंत नरवडे पाटील उपमहापौर झाले. डॉ. कराडांनी भाजप-राष्ट्रवादीचा असा प्रयोग यशस्वी करून दाखवला होता. २००६ मध्ये ते पुन्हा एकदा महापौर झाले. औरंगाबाद मनपाच्या इतिहासात दोनदा महापौर हाेण्याचा मान फक्त डाॅ. कराडांच्या नावे आहे.

रावसाहेब दानवेंच्या समर्थकांमध्ये मात्र संभ्रम
औरंगाबाद | केंद्रीय मंत्रिमंडळात डाॅ. भागवत कराड यांची वर्णी लागल्याचे संदेश दुपारी पाेहाेचले अन‌् भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह टिपेला पाेहाेचला. सायंकाळी ६ वाजता शपथविधी समारंभ सुरू झाला तेव्हा कार्यकर्त्यांनी उस्मानपुरा येथील कार्यालयाबाहेर एकच जल्लाेष केला. कार्यालयाबाहेर माेठा एलईडी स्क्रीन लावून त्यावर शपथविधी पाहण्याची साेय केली हाेती. कार्यकर्त्यांनी नृत्य करून आनंदाेत्सव साजरा केला व महिलांनी फुगडी खेळली.​​​​​​​काेराेना नियंत्रणासाठी प्रशासनाने सायंकाळी पाच वाजेनंतर शहरात संचारबंदी लागू केली आहे.

मात्र आनंदाच्या भरात भाजप कार्यकर्त्यांना त्याचे भान राहिले नव्हते. निर्बंधांचे उल्लंघन हाेत असताना पाेलिसांनीही त्याकडे साेयीस्कर दुर्लक्ष केले. डाॅ. कराड यांच्या मंत्रिपदाची बातमी येत असताना दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याच्या अफवाही झळकल्या. त्यामुळे कराड यांच्या आनंदाेत्सवात सहभागी व्हावे की नाही या संभ्रमात असलेल्या दानवे समर्थकांनी घरीच राहणे पसंत केले. मात्र काही वेळातच दानवेंनी राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट झाले अन‌् मग हे समर्थकही जल्लाेषात सहभागी झाले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत मंत्रिपदामुळे भाजपला मिळेल बळ
भाजपचे खासदार डाॅ. भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षात प्रथमच औरंगाबादला केंद्रात मंत्रिपदाचा मान मिळाला. डाॅ. कराड यांना अर्थ राज्यमंत्रिपद मिळाले. देशात काँग्रेसची सत्ता असली तरी औरंगाबादेतील काँग्रेसचा खासदार धर्म, सामाजिक समीकरणात फारसा प्रभावी ठरत नाही, असे गणित प्रारंभीच्या काळात होते. १९८४नंतर ज्या पक्षाची देशात सत्ता त्याच्या विरोधातील खासदार देणारा मतदारसंघ अशीही औरंगाबादची ओळख बनली.

अटलजींच्या नेतृत्वाखालील देशात प्रथमच भाजपचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा एनडीएतील मित्रपक्ष शिवसेनेचे चंद्रकांत खैरे खासदार हाेते. चार टर्म त्यांनी हे पद भूषवले. मात्र त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकले नाही. रावसाहेब दानवे, जयसिंगराव गायकवाड हे औरंगाबादचे रहिवासी मंत्री झाले, पण त्यांचे मतदारसंघ अनुक्रमे जालना व बीड होते. त्यामुळेच आता डाॅ. कराड हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात औरंगाबादचे प्रतिनिधित्व करणारे पहिले खासदार ठरले आहेत.

उस्मानपुरा येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर माेठा एलईडी स्क्रीन लावून कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.
मनपाच्या राजकारणातून बाहेर पडत डाॅ. कराड यांनी २००९ मध्ये पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू राजेंद्र दर्डांविरुद्ध औरंगाबाद पूर्वमधून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. पण दुसऱ्याच दिवशीच पुन्हा पक्षकार्यात मग्न झाले. २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तारूढ झाले. काळाची बदलती पावले लक्षात घेऊन डाॅ. कराड यांनी पंकजा मुंडेंशी निष्ठा कायम ठेवतनााच फडणवीसांशी जवळीक वाढवली. त्यामुळे त्यांना २०१८ मध्ये मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्षपद मिळाले. या पदाला प्रशासकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नसले तरी त्यात समाधान मानत ते पक्षकार्य करत राहिले. याच संयमी व निष्ठेने केलेल्या कार्याची त्यांना पावती मिळाली.

बातम्या आणखी आहेत...