आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेराफेरी:भारत पेट्रोलियमचे बनावट संकेतस्थळ बनवून शहरातील व्यापाऱ्याला 56 लाखांना गंडवले

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात वाँटेड असलेला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा आरोपी पकडण्यात औरंगाबाद सायबर पोलिसांना यश

स्पर्धा परीक्षेची तयारी करून आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न पाहणारा एक तरुण गावातील गुन्हेगारी तरुणांमुळे सायबर गुन्हेगारीकडे वळला. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी त्याने भारत पेट्रोलियम कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार केले. त्यातून अनेकांना एजन्सी देण्याचे आमिष दाखवून स्वत: कोट्यधीश झाला. बंगला, दोन चारचाकी व उच्च राहणीमान असलेला नितीशकुमार जितेंद्र प्रसाद (रा. हाथियारी, बिरनवाँ, नवादा, बिहार) याचा चार राज्यांचे पोलिस शाेध घेत हाेते. अखेर औरंगाबाद सायबर पोलिसांनी दुसऱ्या प्रयत्नात त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली अाहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीत चांगदेव सोमीनाथ तांदळे (४९) यांची रविकिरण एंटरप्रायझेस नावाची कंपनी आहे. १ ऑगस्ट २०१९ रोजी वर्तमानपत्रात भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या गॅस एजन्सीची जाहिरात प्रकाशित झाली होती. त्यावरून तांदळे यांनी बीपीसीएलच्या कार्यालयात संपर्क साधला असता एजन्सीसाठी ऑफलाइन अर्ज करण्यास सांगण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी त्यांनी जळगावातील कंपनीच्या मुख्य कार्यालयात अर्ज केला. २१ जानेवारी २०२० रोजी तांदळे मुलाखतीसाठी तेथे गेले. निकालात त्यांची दुसऱ्या क्रमांकावर निवड झाल्याचे कंपनीने सांगितले.

५ मे २०२० रोजी अचानक त्यांना संदीप पांडे नामक व्यक्तीने कॉल करून ‘तुम्ही गॅस एजन्सीसाठी अर्ज केला आहे का?’ असे विचारले. गॅस एजन्सीच्या डीलरशिपची ऑफर देत ५६ लाख ६६ हजार रुपयांचा खर्च सांगितला. चार वेगवेगळ्या बँक खात्यांवर ६ मे ते ७ ऑगस्टदरम्यान तांदळे यांनी त्याला ५६ लाख ६१ हजार सातशे रुपये पाठवले. मात्र, नंतर संपर्कच कमी झाल्याने तांदळे २ सप्टेंबर रोजी जळगाव कार्यालयात गेले. तेथे चाैकशी केल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. १९ सप्टेंबर २०२० रोजी सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

चार राज्यांतील लाेकांना कोट्यवधी रुपयांना फसवले

  • नितीशकुमारने बंगळुरू, नवी दिल्ली, आंध्र प्रदेश आदी राज्यांत अनेकांना लाखोंना गंडवले. तो राहत असलेला नवादा यासाठी कुख्यात आहे. बी.कॉम. उत्तीर्ण होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सोबतचे तरुण अल्पावधीत श्रीमंत होत असल्याचे पाहून तोदेखील वाममार्गाला लागला.
  • दिल्लीच्या एका कंपनीकडून त्याने व त्याच्या भावाने भारत पेट्रोलियमच्या संकेतस्थळासारखेच संकेतस्थळ तयार केले. त्यात कुणीही अर्ज करताच ते दोन दिवसांत संपर्क करून नंतर गंडवत होते. त्याच्या गावात अत्याधुनिक यंत्रणा आहे. पश्चिम बंगालमधून सिमकार्ड गावात खरेदी केले जातात. पंधरा हजारांमध्ये बँक खाते उघडले जाते. शिवाय गुगलवर जाहिरात देतात. त्यात “सर्च ऑप्टिमायझेशन टेक्निक’चा वापर करतात. त्यामुळे गुगलवर एखाद्या व्यक्तीने शोधले तर पहिला पर्याय त्यांच्या बनावट संकेतस्थळाचा येतो. औरंगाबादच्या तांदळेंकडून घेतलेल्या पैशांतून त्याने झारखंड व नवादात जमीन विकत घेतली. त्याशिवाय त्याच्याकडे स्कॉर्पिओ, बोलेरो गाड्या, अालिशान घर आहे.

नऊ महिने, तीसपेक्षा अधिक मोबाइल क्रमांकांवर पाळत
सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण हे मागील नऊ महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास करत हाेते. नितीशकुमारने वापरलेले संकेतस्थळ, तांदळे यांना फाेन केलेल्या क्रमांकावर पाळत ठेवली. नितीशकुमार मुरलेला सायबर गुन्हेगार असल्याने तो सतत मोबाइल बदलत होता. त्यामुळे प्रत्येक वेळी नव्या मोबाइल क्रमांक, संकेतस्थळाचा तपास पहिल्यापासून सुरू करावा लागायचा. या साखळीतील झारखंडच्या चार जणांना यापूर्वी अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून हा प्रकार नितीशकुमारने केल्याचे डिसेंबर २०२० मध्ये सिद्ध झाले. त्यानंतर चव्हाण पथकासह त्याच्या गावी जाऊन आले. मात्र, तेव्हा स्थानिक पोलिस, ग्रामस्थांच्या असहकारामुळे रिकाम्या हाताने परतले. पथक पुन्हा सहा दिवसांपूर्वी बिरनवाँमध्ये दाखल झाले.

आरोपीने तयार केलेली बनावट वेबसाइट.
आरोपीने तयार केलेली बनावट वेबसाइट.

पोलिसांनी अशा अावळल्या आरोपीच्या मुसक्या

  • पथकाने त्याच्या दिनक्रमाचा अभ्यास केला. तो संपर्क साधत असलेले क्रमांक, मोबाइल बदलण्याचा काळ, फिरत असलेल्या ठिकाणांचे निरीक्षण केले. स्थानिक पोलिसांच्या असहकारामुळे स्वत: पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी तेथील पोलिस अधीक्षक सायली धुरत यांना संपर्क साधला. चार राज्यांत वाँटेड असलेल्या आरोपीच्या अटकेसाठी सहकार्य करण्यास सांगितले. पुण्याचे सहायक आयुक्त सुनील पवार यांचे या प्रकरणात मार्गदर्शन घेण्यात आले. मराठमोळ्या व २०१० च्या बॅचच्या आयपीएस धुरत यांनी पथक दाखल होताच सर्व प्रकार समजून घेतला. दोन दिवस मुक्कामी राहून नितीशकुमारला पकडण्यासाठी आराखडा ठरवण्यात आला.
  • तीन दिवसांपूर्वी नितीशकुमार त्याच्या मूळ गावातून पाटण्याला निघाला. त्याआधीच गावात जाणाऱ्या तीन मार्गांवर नाकेबंदी लावण्यात आली. काही तासांनंतर नितीशकुमार परत येत असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पकडल्याचे कळताच अर्धेअधिक गाव, मुखिया, स्थानिक राजकारण्यांनी धाव घेतली. मात्र, एसपी धुरत स्वत: उपस्थित असल्याने ते फार काही करू शकले नाही. पोलिस आयुक्त गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली बागवडे, चव्हाण, संजय साबळे, विवेक औटी, गोकुळ कुतरवाडे, मन्सूर शहा, विजय घुगे, अमोल सोनटक्के, कृष्णा सावध, छाया लांडगे यांनी कारवाई पार पाडली.
बातम्या आणखी आहेत...