आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही प्रश्न अनुत्तरित:धक्का लागून जळाल्याने कारमधील ‘त्या’ जोडप्याचा मृत्यू; घाटीत शवविच्छेदनानंतर प्राथमिक अहवाल

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घाटीत शवविच्छेदनानंतर प्राथमिक अहवाल; कुटुंबांना त्यांच्या मैत्रीची माहिती नसल्याने

गांधेली परिसरात बुधवारी दुपारी कारमध्ये महिला-पुरुषाचा मृतदेह आढळल्यानंतर शहरात खळबळ उडाली हाेती. गुरुवारी शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी जोडप्याचा मृत्यू ‘शॉक विथ बर्न इंज्युरीज’ म्हणजेच धक्का लागून जळाल्याने झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला आहे. कारमध्ये स्फोट कसा झाला, आगीचे नेमक्या कारणासाठी आरटीओ व फॉरेन्सिक विभागाला पत्र पाठवले असून दोन दिवसांत अहवाल येणे अपेक्षित असल्याचे पाेलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

बांधकाम व्यावसायिक जैन यांच्याकडे चालक असलेले रोहिदास गंगाधर आहेर (४८, रा. जवाहरनगर) हे भाजीपाला आणण्यासाठी कार घेऊन बाहेर गेले होते, तर उल्कानगरीत राहणाऱ्या शालिनी सुखदेव बनसोडे (३८) या सकाळी अकरा वाजता रेशनचे सामान आणण्यासाठी गेल्या होत्या. गांधेली शिवारात जनावरे चरणाऱ्या तरुणांना दुपारी दोन वाजता सहारा सिटीमागील परिसरात अचानक स्फोटसदृश आवाज आला. त्यांनी ग्रामस्थांना कळवून घटनास्थळाकडे धाव घेतली तेव्हा आहेर व बनसोडे हे मागील सीटवर गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आढळले. चिकलठाणा पोलिसांनी धाव घेत त्यांना घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दोन तास शवविच्छेदन : घाटीत दुपारी बारा ते दोन यादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सविस्तर अहवाल मिळाला नसला तरी प्राथमिक अहवालात गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. दोघांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाल्या आहेत. कारमध्ये एसी, परफ्यूमचा स्फोट झाला व आगीचे लोळ व धूर थेट त्यांच्या चेहऱ्यावर गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. गुरुवारी पोलिस त्या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते. मात्र, तज्ज्ञांच्या अहवालासाठी चिकलठाणा पोलिसांनी आरटीओ व फॉरेन्सिकला पत्र पाठवले.

तज्ज्ञांचा अहवाल महत्त्वाचा
कारमध्ये नेमका काय बिघाड झाला हे स्पष्ट झाल्यानंतरच अपघाताचे कारण समजू शकेल. त्यासाठी तज्ज्ञांना पत्र पाठवले असून येत्या दाेन ते तीन दिवसांमध्ये अहवाल अपेक्षित आहे. तोपर्यंत अपघाताचे नेमके कारण सांगता येणार नाही. सर्व अंगाने प्रकरणाचा तपास सुरू आहे. - देविदास गात, पोलिस निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...