आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत दुपारनंतर आंदोलन मागे:जुनी पेन्शन योजना लागू करा, रिक्त दोनशे पदे भरण्याची मागणी; 700 नर्स संपावर; 40 शस्त्रक्रिया रद्द

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घाटी रुग्णालयातील नर्सेसनी विविध मागण्यासांठी बुधवारी सकाळी निदर्शने केली.

घाटी रुग्णालयातील नर्सेसनी बुधवारी (२३ फेब्रुवारी) पुकारलेल्या संपामुळे नियोजित ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. सकाळी आठ वाजता नर्सनी आंदोलन सुरू करून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे ऐनवेळी शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. काशीनाथ चौधरी यांनी दिली. प्रलंबित मागण्यांसाठी नर्सेसनी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केलेे. याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला. डॉ. चौधरी म्हणाले, ओपीडीत दिवसभरात १५४० रुग्ण तपासण्यात आले.

अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले की, आम्ही नर्सिंग महाविद्यालयाच्या १२५ विद्यार्थिनींना मदतीसाठी बाेलावले हाेते. मात्र, नर्सेस नसल्याने नियमित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. दुपारनंतर या नर्सेस कामावर रुजू झाल्या. परिचारिका संघटनेच्या सचिव इंदुमती थोरात म्हणाल्या, नर्सेसची रिक्त पदे भरण्याची गरज आहे. घाटीत दोनशे पदे रिक्त आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवर चर्चा केली जात नाही. शेवटी आम्ही संपाचा इशारा दिल्यामुळे सरकारने धावपळ केली. आम्ही त्यांना दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. आमच्या संपामुळे सर्व शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. या आंदोलनाचा रुग्णसेवेवर माेठा परिणाम झाला. या वेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनीदेखील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. संपाला पाठिंबा देत ते कामावर हजर झाले हाेते. अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष शुभमंगल भक्त, महेंद्र साबळे, द्रौपदी कर्डिले, प्रवीण व्यवहारे, हेमलता शुक्ला, मकरंद उदयाकार, सय्यद नवाज आदींची उपस्थिती होती.

या विभागांवर झाला परिणाम
प्रसूती विभागातील १५, ईएनटी, नेत्र ५, सर्जरी आणि हाडाच्या प्रत्येकी आठ अशा साधारण ४० शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...