आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय:नादुरुस्त व्हेंटिलेटर्स बदलावेच लागतील; दिल्लीतील रुग्णालयांचे डॉक्टर आज करणार तपासणी

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जादा दर आकारणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाई

पीएम केअर्स निधीतून घाटी रुग्णालयाला देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असतील तर ते बदलून घेतले पाहिजेत. दुरुस्त केलेल्या व्हेंटिलेटर्सचा वापर कोरोना रुग्णांसाठी करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी बजावले. नादुरुस्त व्हेंटिलेटरची तपासणी करण्यासाठी नवी दिल्ली येथील राममनोहर लोहिया व सफदरजंग रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर गुरुवारी शहरात येत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वत:हून दाखल करून घेतलेल्या फाैजदारी याचिकेच्या सुनावणीप्रसंगी केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिलसिंग यांनी ही माहिती दिली.

न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी तज्ज्ञांचा अहवाल ७ जून रोजीच्या सुनावणीप्रसंगी ठेवण्याचे आदेश दिले. व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असतील आणि या उत्पादनात दोष असल्याने वॉरंटी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो, असे नमूद करून अशा व्हेंटिलेटर्समुळे दुर्दैवाने काही बरेवाईट झाले तर कुणाला जबाबदार धरणार, अशी शंका खंडपीठाने उपस्थित केली. केंद्र सरकारकडून मिळालेल्या व्हेंटिलेटर्सची एचएचएल लाइफ केअर कंपनीच्या २६ जणांच्या पथकाने २९ मे राेजी पाहणी केली. याचा अहवाल सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी खंडपीठात सादर केला.

दरम्यान, म्यूकरमायकोसिससंबंधी ३ जूनला सुनावणी होत आहे. याचिकेत न्यायालयाचे मित्र म्हणून अॅड. सत्यजित बोरा यांनी काम पाहिले. मनपातर्फे अॅड. एस. जी. चपळगावकर, इतर प्रतिवादीतर्फे अॅड. एस. आर. पाटील, अॅड. के. एन. लोखंडे, अॅड. डी. एम. शिंदे, अॅड. आर. के. इंगोले, अॅड. गिरीश नाईक थिगळे यांनी काम पाहिले.

जादा दर आकारणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाई
रुग्णवाहिकेच्या दरासंबंधी उपविभागीय प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती सादर करण्यात आली. रुग्णांच्या नातेवाइकांकडून जास्तीचे पैसे आकारणाऱ्या रुग्णवाहिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...