आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’ भूमिका:मस्तवाल सरकारी यंत्रणेची हायकोर्टाकडून खरडपट्टी, निष्काळजी प्रशासनाला जागा दाखवली

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
23 जूनच्या अंकात दैनिक दिव्य मराठीने प्रकाशित केलेल्या विशेष वृत्तात यंत्रणेतील असमन्वयावर बाेट ठेवले हाेते. - Divya Marathi
23 जूनच्या अंकात दैनिक दिव्य मराठीने प्रकाशित केलेल्या विशेष वृत्तात यंत्रणेतील असमन्वयावर बाेट ठेवले हाेते.
  • ‘दिव्य मराठी’ची भूमिका उच्च न्यायालयानेही अधोरेखित केली
  • कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

कोरोनामुळे लोक मरत असतानाही यंत्रणा हलत नाही. मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या नाकर्तेपणामुळेच औरंगाबादची स्थिती भयंकर झाली आहे, ही दिव्य मराठी’ची भूमिका औरंगाबाद खंडपीठानेही शुक्रवारी (२६ जून) अधोरेखित केली.

‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांचा संदर्भ देत न्यायालयाने यंत्रणेला खडसावले, तर पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांना न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रतिवादी केले. कोरोना झपाट्याने वाढतो आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली आहे. औरंगाबाद महापालिकेने केरळ आणि धारावी पॅटर्नचा अवलंब करायला हवा, अशा बातम्या उमटत आहेत, त्याची न्यायालयाने दखल घेतली आहे.

धारावी-मालेगावात यश मिळते, तर मग आैरंगाबादेत का नाही ?

मनपा आयुक्त सध्या होम क्वॉरंटाइन आहेत. केरळ आणि धारावी पॅटर्नचा अवलंब केला जात नसेल तर मग दुसऱ्या कुठल्या मार्गांचा अवलंब केला जातो? जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्यात समन्वय नाही. अशा प्रकारच्या बातम्या उमटणे अत्यंत दुर्दैवी आहे. आयएएस दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांत समन्वयाचा आणि संवादाचा अभाव असणे हेही दुर्दैवी आहे. अशा वेळी हे दोन अधिकारी तसेच पोलिस यंत्रणेने एकत्रित काम करणे आवश्यक आहे. मात्र, औरंगाबादेत समन्वय नसल्याचे दिसत आहे, असे न्यायालयाने फटकारले. मालेगाव पॅटर्न हे अधिकाऱ्यांच्या समन्वयाचे यश आहे. त्यामुळे तिथे सक्सेस स्टोरी तयार होऊ शकली. औरंगाबाद व जळगावमध्ये मात्र ती अधिकाऱ्यांना निर्माण करता आलेली नाही. लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या धारावी-मालेगावात नियंत्रण मिळवता येते, मात्र औरंगाबादेत का नाही, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.

‘त्या’ खासगी रुग्णालयांची नावे कळवा

ज्यांनी कामचुकारपणा केला अशा कर्मचाऱ्यांची माहिती द्यावी, कोरोना आणि इतर रुग्ण यांच्यावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रुग्णालयांची नावे कळवावीत, जिथे रुग्ण क्वॉरंटाइन आहेत, अशा ठिकाणी पूर्ण सुविधा आहेत का याची माहिती द्यावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

पाेलिस आयुक्त, अधीक्षक प्रतिवादी

कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींवर निर्बंध आणले गेले नाहीत. अधिकारी आणि पोलिस यंत्रणा यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही परिस्थिती उद्भवलेली असू शकते. पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांना या कायदेशीर प्रक्रियेत प्रतिवादी करून घेतले जात आहे. आदेश मराठवाडा, नगर, जळगावसाठी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

काँटॅक्ट ट्रेसिंग याेग्य न झाल्याने संसर्ग वाढला

‘काँटॅक्ट ट्रेसिंग’ योग्य प्रमाणात न झाल्याने आैरंगाबादेत काेराेना झपाट्याने वाढल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही अधिकारी प्रामाणिकपणे करत नाहीत. अशा निष्काळजी आणि कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने फौजदारी झाली पाहिजे. अशा लोकांना कामावरून काढून टाकले पाहिजे, असेही न्यायालयाने सुनावले आहे.

‘दबावाला बळी न पडता प्रामाणिक काम करा’

साथरोग कायद्यामुळे सर्वाधिकार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्याकडे येतात. इतर कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक असते. अर्थात, लोकशाही व्यवस्थेत राजकीय नेत्यांशी संवाद साधतच अधिकाऱ्यांनी काम करणे अपेक्षित आहे. औरंगाबादसारख्या जिल्ह्यात मात्र याचा अभाव आहे. अधिकाऱ्यांचा राजकीय नेत्यांशी संवाद नाही. असा निष्काळजीपणा आणि ही अकार्यक्षमता दुर्दैवी आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

जळगावात काेराेनाबाधित महिलेचा मृतदेह शाैचालयात सापडणे हे अक्षम्य निष्काळजीपणाचे उदाहरण...

जळगावसारख्या ठिकाणी कोरोनाबाधित वृद्धेचा मृतदेह विलगीकरण केंद्राच्या शौचालयात सापडतो आणि दोन दिवस तो तसाच पडून राहतो ही बातमी अक्षम्य निष्काळजीपणाचे उदाहरण आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. खंडपीठाने न्यायालयाचे मित्र म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांची नियुक्ती केली. अॅड. देशमुख यांनी शासनाने कोविड प्रसार रोखण्यात मदतीसाठी वेबसाइट काढली मात्र त्याची कितपत मदत झाली हे स्पष्ट होत नाही. या वेबसाइटच्या माध्यमातून काय साध्य केले हेही सप्ष्ट व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...