आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad । Jalna Road । The Rickshaw Stopped On Jalna Road At Night, In Which The Woman Gave Birth; The Mother And Baby Are Safe Due To The Timeliness Of The Traffic Police

दिव्य मराठी विशेष:जालना रोडवर रात्री रिक्षा बंद पडली, त्यातच महिलेची प्रसूती; वाहतूक पोलिसांच्या समयसूचकतेमुळे आई-बाळ सुखरूप

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी वेळीच अन्य रिक्षातून रुग्णालयात दाखल केल्याने वाचले प्राण

सोमवारी (१५ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास जालना रोडवरील वाहतूक तशी कमी झाली होती. उच्च न्यायालयाच्या थोडे पुढे एक रिक्षा थांबली होती आणि त्यातून एका महिलेच्या वेदनेचा आवाज ऐकू येत होता. बाजूलाच कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेतील पोलिस अंमलदार संतोष चंद्रसेन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा एका महिलेने रस्त्यावरच एका बाळाला जन्म दिल्याचे दिसले.

जाधव यांनी आपले सहकारी पोलिस नाईक रावसाहेब पचलोरे यांच्या मदतीने तत्काळ एका रिक्षाला थांबवून त्या महिलेला घाटीत पाठवले. जाधव स्वत: रिक्षाच्या मागे घाटीपर्यंत गेले. तिथे तत्काळ उपचार मिळाल्यामुळे बाळ आणि आई सुखरूप आहेत.

अनुराधा गणेश बरथरे या मुकुंदवाडीत राहतात. त्याचे पती गणेश मोलमजुरीचे काम करतात. गर्भवती असलेल्या अनुराधा यांना सोमवारी रात्री अचानक कळा सुरू झाल्या. त्यामुळे आई आणि नवऱ्यासोबत त्या एका रिक्षातून घाटीकडे जात होत्या. मात्र अचानक न्यायालयासमोर त्यांची रिक्षा खराब झाली.

वेदना मात्र वाढत होत्या. त्यामुळे त्या महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला, अशी माहिती बाळाच्या वडिलांनी दिली. या घटनेमुळे बरथरे घाबरले हाेते. ते रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. रिक्षा थांबवण्याच्या प्रयत्नात होते, मात्र त्यांना काहीही सूचत नव्हते. अखेर पोलिस अंमलदार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व रिक्षा थांबवून त्या रिक्षात आई व बाळाला घाटीत पाठवले. बाळाची प्रकृती चांगली आहे.

देवाच्या रूपाने पोलिस आले धावून
घाटीत गेल्यानंतर नाळ बाळापासून वेगळी करण्यात आली. अनुराधा यांनी गोंडस मुलीला जन्म दिला असून घाटीत सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मुलगी सव्वादोन किलोची आहे. आई आणि बाळावरचे मोठे संकट टळले. पोलिस देवरूपाने धावून आले, अशी प्रतिक्रिया बरथरे कुटुंबीयांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...