आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्नड तालुक्यातील औराळा येथुन 20 नोव्हेंबरपासुन बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह दहा दिवसानंतर सापडला. पेडकवाडी ते कोळवाडी रोडवरील पेडकवाडी घाटात म्हसोबा देवस्थानाजवळील पुलाच्या खाली हा मृतदेह आढळून आला.
साडीत गुंडाळला होता मृतदेह
सागर संतोष जैस्वाल (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. संबंधित मुलाची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असल्याने कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302, 201 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाचा मृतदेह नळ्यामध्ये साडी व प्लास्टिकच्या कव्हर मध्ये गुंडाळून टाकलेल्या व कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
एका संशयित ताब्यात
या तरुणाचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असल्याने एका संशयितांला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने औराळा गावासह परिसरात एकच खळबळ उडाली. सागर याने अगदी कमी वयात आपल्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये चांगलाच जम बसवला होता. परंतु 20 नोव्हेंबर रोजी सागर अचानक औराळा येथुन बेपत्ता झाला होता.
हरवल्याची दिली होती तक्रार
सागर हरवल्याबाबत देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार, पोलिस त्याचा शोध घेत होते. मित्र परिवार, नातेवाईक, ओळखीच्यांकडे त्याची चौकशी करूनही त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर 10 दिवसानंतर 1 डिसेंबर (गुरुवारी) रोजी दुपारी 2 वाजता पेडकवाडी येथील पोलिस पाटील यांच्याकडून एका तरुणाचा मृतदेह पेडकवाडी घाटात पुलाच्या पाईपमध्ये असल्याची माहिती समजली.
अन् तो सागरच होता!
सागरच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष जाऊन खात्री केली असता मृत व्यक्ती सागर संतोष जैस्वालच असल्याची खात्री पटली. त्याला साडी व प्लास्टिकच्या कव्हर मध्ये गुंडाळून टाकलेले होते. या घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साडी व प्लास्टिकच्या कव्हर मध्ये गुंडाळून टाकलेला मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसही चक्रावले.
जागीच उत्तरीय तपासणी
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जागेवरच बोलावुन उत्तरीय तपासणी पूर्ण केली. या प्रकरणी विनोद धन्नुलाल जैस्वाल (38) यांच्या फिर्यादीवरुन कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्धखुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक तातेराव भालेराव तपास करीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.