आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारा वाजताच होणार आहे. हा मुहूर्त बदला, अशी आग्रही मागणी शिवप्रेमींच्या विविध शिष्टमंडळांनी गुरुवारी (१७ फेब्रुवारी) मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी आपला निरोप शासनापर्यंत पोहोचवतो, असे उत्तर देत शिष्टमंडळांना वाटेला लावले. मात्र, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मध्यरात्रीची वेळ राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यात बदल होणार नाहीच. दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपपुढे झुकणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्याच धर्तीवर पांडेय यांची भूमिका असल्याची चर्चा शिवप्रेमींमध्ये होत आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून लाखो औरंगाबादकरांना पुतळ्याचे अनावरण नेमके कसे होणार? किती वाजता होणार? कुणाच्या उपस्थितीत होणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना तसेच सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केले जाणार की नाही? असे अनेक प्रश्न पडले होते. “दिव्य मराठी’ने जनतेच्या वतीने त्यांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रशासकांनी शासनाकडे बोट दाखवत मौन पाळले. अनावरणास दोन दिवस शिल्लक असताना मौन सोडत सोहळ्याला कोण उपस्थित राहणार याची माहिती दिली. दरम्यान, बुधवारी मराठा क्रांती मोर्चासह शिवप्रेमींनी मध्यरात्रीच्या मुहूर्ताबद्दल शिवसेनेवर संताप व्यक्त केला. गुरुवारी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीसह विविध राजकीय पक्ष, संघटनांनी विरोध करत मुहूर्त बदलाची मागणी प्रशासकांकडे केली. त्यांचे निवेदन ठेवून घेण्यापलीकडे पांडेय यांनी काही केले नाही. त्यावर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख म्हणाले की, आम्ही समितीकडून सर्वपक्षीय नेत्यांना तसेच छत्रपतींच्या दोन्ही वंशज राजांना निमंत्रण दिले आहे. काही प्रत्यक्ष तर काही ऑनलाइन उपस्थित असतील. मध्यरात्रीच अनावरण होणार असेल तर शिवप्रेमीही ही बाब लक्षात ठेवतील.
या मान्यवरांची असेल उपस्थिती
अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन सहभागी होतील. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई प्रत्यक्षात उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांना या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता औरंगाबादेत येतील. साडेदहा वाजता क्रांती चौकात पोहोचतील.
रोषणाई, आतषबाजीचे विशेष आकर्षण
सामान्यपणे कोनशिला अनावरण करून शासकीय उद्घाटने पार पडतात. मात्र, हा कार्यक्रम आगळावेगळा आणि शहरवासीयांसाठी पर्वणी असणार आहे. आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट, फटाक्यांची आतषबाजी हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. ज्याप्रमाणे मुंबईत महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते, तसाच हा सोहळा असेल.
पुतळा कामाचा आजपर्यंतचा प्रवास :
१९ जानेवारी २०१३, २० सप्टेंबर २०१६, ९ फेब्रुवारी २०१८ रोजी पुतळ्याची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर. खर्चास मंजुरी : १८ जुलै २०१९, ठेकेदार गायत्री आर्किटेक्टला ५ मार्च २०१९ रोजी रोजी कार्यादेश. पुण्यातील चित्रकल्पक स्टुडिओला ९ सप्टेंबर २०२० रोजी पुतळा निर्मितीचा कार्यादेश. स्ट्रक्चरल इंजिनिअर रवींद्र बनसोडे यांनी तयार केलेल्या चौथऱ्याच्या आरसीसी डिझाइनला शासकीय अभियांत्रिकीने १ ऑक्टोबर २०१९ रोजी मान्यता दिली. पोलिस आयुक्तांनी ३० ऑगस्ट २०१८, जिल्हाधिकाऱ्यांनी २९ जून २०१९, २२ जुलै २०२१ रोजी मुंबई कला संचालनालयाने उंची वाढवण्यास तर १४ आॅक्टोबर २०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने चौथरा संकल्पचित्रास मान्यता दिली.
असा झाला समिती अध्यक्ष, प्रशासकांतील संवाद
समिती अध्यक्ष : क्रांती चौकातील शिवजयंतीच्या निमित्ताने लावलेले विविध पक्ष-संघटनांचे बॅनर आपल्या आदेशाने काढण्यात आले.
प्रशासक : क्रांती चौकात राज्यभरातून पाहुणे येतील. त्यामुळे ही जागा रिकामीच असावी. बॅनरच्या बाबतीत राज्य शासनाचादेखील निर्णय आहे.
समिती अध्यक्ष : अनावरण सोहळ्याची वेळ मध्यरात्री १२ वाजता ठेवल्याने अनेकांना अडचण होऊ शकते. प्रशासक : हा सोहळा रात्री दहाच्या सुमारास सुरू होऊन साडेअकरापर्यंत चालेल असे नियोजन करण्यात आले आहे. महिला, लहान मुले या क्षणाला मुकणार
मध्यरात्रीच्या अनावरणामुळे हजारो महिला, लहान मुले या ऐतिहासिक क्षणाला मुकणार आहेत. मनपा प्रशासक शिवसेनेच्या रिमोटवर चालतात. वेळ बदलण्यासाठी आम्ही दिलेले निवेदन त्यांनी फक्त ठेवून घेतले. ठोस आश्वासन दिले नाही, असे भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले.
क्रांती चौकात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ढोलपथकांचा सराव सुरू होता. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. छाया : मनोज पराती
नाही बोलावले तरी आम्ही जाणार
शिवसेनेने आम्हाला नाही बोलावले तरी आम्ही उद्घाटन कार्यक्रमाला जाणार. आबालवृद्धांना सहभागी होता यावे म्हणून शिवजयंतीच्या दिवशी सकाळी पुतळ्याचे अनावरण व्हावे, ही आमची इच्छा होती. भाजप १८ फेब्रुवारीला रात्री होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होईल. मात्र, १९ रोजी सकाळी अभिवादनानेच आमची खरी शिवजयंती साजरी होईल. - भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
रात्री १० वाजेपासून सोहळा
रात्री दहाच्या सुमारास सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होईल. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मध्यरात्री १२ वाजताच होणार आहे. याची संपूर्ण तयारी झाली आहे. - सुभाष देसाई, पालकमंत्री
आज, उद्या वाहतुकीत बदल
१८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत तसेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत क्रांती चौक परिसर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. सिल्लेखाना ते क्रांती चौक, गोपाल टी ते क्रांती चौक, सतीश मोटर्स ते अमरप्रीत चौक आणि अमरप्रीत चौक ते सतीश मोटर्स हा पुलाच्या बाजूचा सर्व्हिस रोडही बंद असेल. गोपाल टी-संत एकनाथ रंगमंदिर-काल्डा कॉर्नर-अमरप्रीत चौक या मार्गासह सिल्लेखाना चौक-सावरकर चौक - सतीश मोटर्स तसेच शिवाजी हायस्कूल हा पर्यायी रस्ता आहे. क्रांती चौक उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.